पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे दोघे होते. विषयाला सुरुवात करताना जोशी म्हणाले,
 "शेतीमालाच्या प्रश्नावर आपण अनेक वर्षं आंदोलन करतो आहोत व पुढेही करू, पण संघटना आता स्त्रियांचे स्त्री म्हणून काय प्रश्न आहेत तेही समजून घेऊ इच्छिते. आजची आपली भेट ही त्यासाठी आहे. तुम्ही अगदी मोकळ्या होऊन बोला. इथे दुसरं कोणी ते ऐकणारं नाही; सगळं आपल्यातच राहील."
 पण कोणी एक शब्दही बोलेना. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची धास्ती. हा एवढा मोठा नेता, पण आपल्यासोबत अशी मांडी घालून बसलाय, आपल्याशी गप्पा मारतोय, हा काय प्रकार आहे! खरे सांगायचे तर त्यांना पुरुषांसमोर गप्पा मारायची कधी सवयच नव्हती; अगदी नवऱ्याबरोबरदेखील कामाव्यतिरिक्त संभाषण असे घरात फारसे होत नसे.
 हा असा अनुभव जोशींना पूर्वीही आला होता; आंबेठाणला आपल्या शेतमजुरांची दुःखे जाणून घेण्यासाठी ते त्यांच्याशी गप्पा मारायला बसत त्यावेळी. मग तेव्हाचीच युक्ती त्यांनी आता पुन्हा केली. भजने म्हणायची कल्पना मांडली. सुरुवात त्यांनी स्वतःच केली. 'जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुखदुःखं, देव निवारील भूक' हा आपला स्वतःचा आवडता अभंग त्यांनी शक्य तितक्या तालासुरात म्हटला. “आता तुम्हीही तुम्हाला आवडेल ती भजनं म्हणा," नंतर ते म्हणाले.
 आता मात्र वातावरण बरेचसे निवळले, हलकेफुलके झाले. एकेकीने किंवा दोघी-तिघींनी मिळून मग आपापली आवडती भजने म्हणायला सुरुवात केली. हळूहळू कंठ सुटत गेले, धास्ती व परकेपणा दूर होत गेला. त्या संधीचा फायदा घेत जोशींनी मग एक सूचक प्रश्न विचारला. ते म्हणाले, “तुम्ही सगळ्यांनी इतकी आर्जवून भजनं म्हटलीत, की देव अगदी नक्की प्रसन्न होईल! समजा तो आत्ता तुमच्यापुढे उभा ठाकला आणि म्हणाला, की तुला हवा तो एक वर माग' तर तुम्ही काय वर मागाल?"
 पुन्हा साऱ्या सावध. देवादिकांची भजनांतून आराधना करणे सोपे, व्यक्तिगत बोलणे अवघड! 'देवा, माझं कुंकू तेवढं शाबूत ठेव', 'देवा, माझ्या लेकीचं लग्न लौकर होऊ दे', 'देवा, माझ्या पोराला मास्तर म्हणून नोकरी लागू दे' अशी साचेबद्ध, अपेक्षित उत्तरे येऊ लागली. ह्या सगळ्या इच्छा परंपरेने स्त्रीसुलभ ठरवलेल्या. कुठल्याही बाईने कोणासमोरही सहजगत्या व्यक्त कराव्यात अशा. मग जोशींना एक भारूड आठवले - 'सत्वर पाव गे मला, भवानी आई, रोडगा वाहीन तुला, सासु माझी गावी गेली, तिथंच खपू दे तिला!' या परखड, प्रसिद्ध भारुडाच्या पाच-सहा ओळी जोशींनी हसत हसत म्हटल्या. तेव्हा मग सगळ्याच बायकाही मोकळेपणे हसू लागल्या. जरा धाडस करून मग जोशींनी विचारले, "जन्मल्यापासून आजपर्यंत आपण बाईच्या जन्माला आलो, ह्याचा आनंद कधी झाला होता का?"
 एक उत्तर लगेचच आले, "झाला व्हता ना, पहिला मुलगा झाला तेव्हा असाच लई आनंद झाला व्हता." इतरही चार-पाच उत्तरे पाठोपाठ आली; साचेबद्ध आणि अपेक्षित अशी.

 मग अचानक एका बाईच्या तोंडून एक ओळ उमटली, "अस्तुरी जल्मा नको घालू

किसानांच्या बाया आम्ही...२८३