पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जोशींचे नाव झळकू लागले होते. 'भक्ती, युक्ती आणि शक्ती – तीन वर्षांत मुक्ती' ह्या त्यांच्या पिंपळगाव बसवंतला २० सप्टेंबर १९८१ रोजी भरलेल्या विराट मेळाव्यातील घोषणेलाही त्याचवेळी तीन वर्षे पूर्ण होत होती. त्यामुळेही संकल्पपूर्तीचा क्षण आता अगदी जवळ येऊन ठेपला होता अशी त्यांची भावना होती.
 या संकल्पित देशव्यापी आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून १९८४च्या २ ऑक्टोबरला, म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी, गुजरातमधील सरदार पटेल यांच्या बारडोली गावापासून दोन मोठ्या प्रचारयात्रा सुरू झाल्या. बारडोली हे सरदार पटेल यांचे गाव. ब्रिटिश काळात त्यांनी तिथे केलेल्या साराबंदी सत्याग्रहामुळेच त्यांना 'सरदार' हा किताब प्राप्त झाला होता. बारडोली ते सुरत या दोन्ही यात्रा एकत्र होत्या. सुरतमध्ये त्या पोहोचल्या तेव्हा त्यांची संयुक्त लांबी तेरा किलोमीटर होती, ह्यावरून त्यांच्या भव्यतेची कल्पना येते.
 सुरतपासून त्या दोन यात्रा स्वतंत्र झाल्या; एक यात्रा गुजरातमध्ये गेली, तर दुसरी महाराष्ट्रात. जोशी स्वतः दोन्ही यात्रांबरोबर थोडे थोडे दिवस होते; सुरुवातीला ते गुजरातमधील यात्रेबरोबर निघाले. ती यात्रा साबरमती येथे समाप्त झाली. तिथे एक विशाल सभा झाली व त्यानंतर जोशी महाराष्ट्रातील यात्रेत दाखल झाले.
 महाराष्ट्रातली प्रचारयात्रा धुळे, जळगाव, अकोला, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद या मार्गे गेली. प्रत्येक ठिकाणी त्यावेळी शेतकरी संघटनेतर्फे चालू असलेल्या कर्जमुक्ती, काही नेत्यांना गावबंदी, सुती कापडाचा वापर, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई या कार्यक्रमांचा दणकून प्रचार केला गेला. महाराष्ट्रात जागोजागी छोट्यामोठ्या प्रचारयात्रा निघाल्या व पुढे मुख्य यात्रेला मिळाल्या. प्रत्येक जिल्ह्यात यात्रेबरोबर उत्साहाची लाट उसळत होती. तसे ते दिवस ऐन दिवाळीचे; पण शेतकऱ्यांना दिवाळीचे काय! वामनाने त्यांच्या बळीराजाला पाताळात गाडल्यानंतरचा तो जल्लोष!

 यात्रेचा समारोप नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील टेहरे या गावी झाला. तेथे एक मोठी सभा आयोजित केली होती. ही सभा म्हणजे पूर्वतयारीचा कळसाध्याय व्हायचा होता. 'तुफान आले आहे' असे शीर्षक जोशींनी तिच्याविषयी लिहिलेल्या आपल्या लेखाला दिले होते व त्यावरून त्यांची त्यावेळची आशादायी मनःस्थिती लक्षात येते. सुमारे चार लाख शेतकरी ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी भरलेल्या त्या सभेला हजर होते. संघटनेच्या आजवरच्या इतिहासातली ही सर्वांत भव्य सभा होती.

 पूर्वीप्रमाणे कांदा, ऊस, तंबाखू अशा एकेका पिकासाठी स्वतंत्र लढे न उभारता सगळा शेतकरी समाजच त्यांना आता उभा करायचा होता; सगळी शेतकरीविरोधी व्यवस्थाच बदलून टाकायची होता. महाराष्ट्रात सुरू झाले तरी लवकरच हे आंदोलन देशभर पसरेल असा त्यांचा कयास होता. देशातल्या १४ राज्यांतील जवळजवळ ४० लाख शेतकरी सत्याग्रह करून तुरुंगात जातील इतकी जय्यत तयारी झाली होती. ३१ ऑक्टोबरच्या त्या सभेत तो देशव्यापी

३१८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा