पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बोलीत अस्सल शिव्याही हाणत असत. हा त्यांचा विक्षिप्तपणाही माध्यमांना आवडत असे! थोडक्यात म्हणजे, टिकैतना उत्तम न्यूज व्हॅल्य' होती.
 टिकैत यांचा भाग म्हणजे पश्चिम उत्तर प्रदेशातील मीरतपासून ते मुझफ्फरनगरपर्यंतचा. हा भाग तसा खूप सुपीक आहे. शिवाय दिल्लीपासून तो तुलनेने बराच जवळ आहे. तिथे बारीकशी काही घटना घडली तरी लगेच दिल्लीत तिचे पडसाद उमटतात. बहुतेक मुख्य माध्यमसमूह व पत्रकार दिल्लीत असल्याने ती बातमी लगेच देशभर पसरते. टिकैत यांच्या अनुयायांनी अनेकदा दिल्लीत निदर्शने केली, वेढे घातले व त्याच्या बातम्या सर्वदूर पसरल्या. त्यामुळे आपोआपच किसाननेता ही टिकैत यांची प्रतिमा देशभर सहजगत्या पसरली. हा फायदा जोशींना (पंजाब आंदोलनाचा अपवाद सोडला तर) किंवा दिल्लीपासून दूर असलेल्या अन्य कुठल्याच शेतकरीनेत्याला मिळाला नाही.
 एकदा टिकैत आणि जोशी या दोघांमध्ये उघड उघड फूट पडल्याचे दिसून आले. ही घटना दिल्लीची. ११ व १२ सप्टेंबर १९८८ रोजी दिल्लीला किसान समन्वय समितीची बैठक भरली होती. “तुम्ही व्ही. पी. सिंग यांना सामील आहात, मी तुमच्याबरोबर काम करू शकणार नाही" असे जोशींना म्हणत टिकैत यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह सभात्याग केला. आपली भूमिका जोशींनी पुनःपुन्हा सांगूनही टिकैतना काही पटत नव्हती. त्यांना अशी शंका येत होती, की शरद जोशी ह्यांना व्यक्तिगत राजकीय महत्त्वाकांक्षा आहे व त्यासाठी ते आपला वापर करून घेतील. पत्रकारांनीही ह्या फुटीला जास्तच प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतायचेच काम केले. खूप मनधरणी करून शेवटी जोशींना त्यांच्याशी पुन्हा जुळवून घ्यावे लागले. पुढे २००३ साली स्वतः टिकैत यांनीही काँग्रेसमध्ये व पुढे भाजपामध्ये प्रवेश केला; खरेतर शरद जोशींच्या राजकारणप्रवेशाला पूर्वी विरोध करणाऱ्या अनेकांनी स्वत:ही पुढे तेच केले; पण तो बऱ्याच नंतरचा भाग झाला.

 राष्ट्रीय पातळीवर सगळ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी दोघांनी मिळून दिल्लीच्या बोट क्लबवर शेतकऱ्यांचा एक विशाल मेळावा घ्यायचे ठरवले. त्याच्या पूर्वतयारीसाठी ३ जून ८९ रोजी टिकैत त्यांच्या साथीदारांसह आंबेठाणला आले व दोन दिवस राहिलेसुद्धा. त्यांचे बंदूकधारी शरीररक्षक बैठकीत हजर असता कामा नयेत, हे जोशींचे म्हणणे बराच वाद घातल्यानंतर एकदाचे त्यांनी मान्य केले; हे शरीररक्षक अंगारमळ्याच्या प्रवेशद्वारापाशी थांबले. चर्चा आपापसातले मतभेद कायम ठेवूनही तशी विधायक झाली. मेळाव्यात निवृत्त जवानांनादेखील सामील करायचे ठरले. अनेक जवान काही वर्षे नोकरी केल्यानंतर पुन्हा आपल्या वडिलोपार्जित शेतावर काम करू लागत. देशाच्या बहुतेक सर्वच भागांत ही परिस्थिती होती. लष्करातले अधिकारी जरी शहरातील असले, तरी जवान मात्र खेड्यापाड्यांतीलच असतात, हे जोशींचे एक जुनेच निरीक्षण होते. या निवृत्त जवानांचे काही प्रलंबित प्रश्न होते. एक हुद्दा, एक निवृत्ती वेतन (One Rank, One Pension) ही त्यांची एक प्रमुख मागणी होती. कारण एकाच हुद्द्यावरून निवृत्त झालेल्या जवानांच्या निवृत्ती

राष्ट्रीय मंचावर जाताना३५३