पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समावेश केला गेला होता. शोभा डे यांनी कौतुकाने त्यांचा उल्लेख 'जीन्सधारी गांधी' ('Gandhi in Denim') असा केला आहे. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे निपाणी आंदोलनात मुंबईच्या ओल्गा टेलिस हिरीरीने सहभागी झाल्या होत्या, त्याविषयी त्यांनी मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रांत लिहिलेही होते. इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया या त्याकाळी देशात सर्वाधिक खप असलेल्या साप्ताहिकानेही त्यांच्या १ ते ७ जानेवारी १९८९ अंकात 'Watch Out! People capable of making it to the big, big league' या शीर्षकाखाली केलेल्या पन्नास भारतीयांच्या सचित्र यादीत जोशींचे नाव घेतले होते. चंडीगढ आंदोलनाची दखलही पंजाबातील व दिल्लीतील वृत्तपत्रांनी बऱ्यापैकी घेतली होती. दिल्लीच्या बोट क्लबवर भरवलेला हा प्रचंड शेतकरी मेळावा ही राष्ट्रीय मंचावर प्रकाशझोतात यायची एक मोठीच संधी होती. तसे झाले असते, तर महाराष्ट्रातील पत्रकारांनी आपल्याला न्याय दिला नाही ही त्यांची खंत दूर झाली असती व एकदा दिल्लीत तुम्ही चमकू लागलात, की मग राज्यातील माध्यमे तुम्हांला टाळूही शकली नसती. पण त्याहून खूप अधिक महत्त्वाचे म्हणजे कदाचित शरद जोशी हे देशाचे भावी पंतप्रधान असतील, अशीही चर्चा तेव्हा सुरू झाली होती.
 दुर्दैवाने अगदी हातातोंडाशी आलेली ही संधी हुकली. त्यानंतर जोशींचे नाव राजकीय वर्तुळात आणि मिडीयाच्या दृष्टीने मागे पडले ते कायमचेच. शेतकरी संघटनेनेदेखील राष्ट्रीय पातळीवर एवढी उंची नंतर कधीच गाठली नाही.

 पंजाबचा अपवाद सोडला तर अन्य कुठल्याही प्रांतापेक्षा शरद जोशींनी गुजरातमध्ये सर्वाधिक काम केले. २ ऑक्टोबर १९८४ रोजी गुजरातेतील बारडोली येथून ज्या दोन प्रचारयात्रा निघाल्या; त्यांतील एक गुजरातेत गेली व एक महाराष्ट्रात आली, याचा उल्लेख पूर्वी झालाच आहे. जोशी स्वतः गुजरातेतील यात्रेत सामील झाले होते. गुजरातमधील यात्रेचा समारोप ९ ऑक्टोबर रोजी अहमदाबादजवळ साबरमती आश्रमात एका प्रचंड सभेने झाला.
 व्ही. पी. सिंग यांच्याबरोबर त्यांनी महाराष्ट्राप्रमाणे गुजरातचा दौराही केला होता व त्या दरम्यान अहमदाबादमध्ये मोठी जाहीर सभाही घेतली होती. अहमदाबादला झालेल्या प्रचंड सभेनंतर तेथे किसान समन्वय समितीची राष्ट्रीय बैठक भरली होती व तिलाही सिंग हजर होते. एका भावी पंतप्रधानाला शेतकऱ्यांच्या बाजूने वळवायचा जोशींचा तो प्रयत्न होता.

 शरद जोशी यांचे शेतकरी आंदोलनातले दोन अतिशय जवळचे मित्र म्हणजे सुरतचे बिपीनभाई देसाई व गुणवंतभाई देसाई. दोघेही स्वतः शेतकरी व शेतकरी आंदोलनात सक्रिय. दोघेही हाडाचे गांधीवादी. गांधीविचारानुसार आयुष्यातील प्रत्येक पाऊल टाकणारे. बिपीनभाई गुजरात खेडूत समाजाचे वर्षानुवर्षे अध्यक्ष होते. (गुजरातीत खेडूत म्हणजे शेतकरी.) एका विद्यापीठाचे उपकुलगुरूही होते. दोघांमध्ये रक्ताचे नाते असे काहीच नाही; पण सख्ख्या भावांहून अधिक प्रेम. दोघांची आयुष्ये एकात एक मिसळून गेलेली. दोघांची शेतीही एकत्र. त्यांची मैत्री म्हणजे एक जगावेगळा प्रयोग होता. त्यांच्या गुजरातीतील एकत्रित चरित्राचे नाव 'अमीट ऐक्य' आहे. सुरत-भरूच-बारडोली-नवसारी परिसरात घरोघरी दोघांच्या मैत्रीची चर्चा

३५६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा