पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रदेशामागून प्रदेश काबीज केले. जसजसा तो राजधानी पॅरिसच्या जवळ येऊ लागला, तसतसे वर्तमानपत्रांचे मथळे बदलू लागले! आणि नेपोलिअन जेव्हा पॅरिसच्या वेशीपाशी आपल्या सेनेसह आला, तेव्हा वर्तमानपत्रांनी 'सम्राट नेपोलिअनचे भव्य स्वागत' असे ठळक मथळे दिले!


 त्यांनी नेपोलियनचा संदर्भ द्यावा यावरून जोशींना स्वतःच्या कामाविषयी सुरुवातीपासून किती प्रचंड आत्मविश्वास होता हे दिसते; पण त्यांना अपेक्षित होते त्याप्रमाणे वृत्तपत्रांनी त्यांची नंतरही कधी भलावण केली नाही. किंबहुना नेपोलियनच्या वाटचालीत आला तसा पुनर्मूल्यांकनाचा योगही कधी जोशींच्या आयुष्यात आला नाही.

 माध्यमांनी शरद जोशींची पाठराखण केली नाही याचे कदाचित सर्वाधिक मोठे कारण म्हणजे शरद जोशींनी १९९०नंतर केलेला खुल्या अर्थव्यवस्थेचा उत्साही पुरस्कार.
 केवळ पत्रकारच नव्हे तर देशातील बहुतेक विचारवंत, लेखक, राजकारणी, नोकरशहा, कामगारनेते. सामाजिक कार्यकर्ते हे सारेच निर्णायक घटक त्याकाळात समाजवाद आणि एकूणच डावी विचारसरणी यांच्या प्रचंड प्रभावाखाली होते. प्रत्यक्षात तुम्ही एस्टॅब्लिशमेंटचाच एक अविभाज्य भाग असलात, आणि एस्टॅब्लिशमेंटचे सारे फायदे तुम्ही घेत असलात, तरीही तुमची समाजातील प्रतिमा मात्र अँटी-एस्टॅब्लिशमेंट असणे आवश्यक होते. व्यक्तिगत जीवनात तुम्ही कितीही ऐश्वर्यात राहत असलात आणि भ्रष्ट असलात तरी जाहीर वक्तव्यांत मात्र तुम्ही डाव्या, तथाकथित पुरोगामी विचारांचे आहात असा देखावा निर्माण करणे आवश्यक होते.
 खुद्द जोशींना याची जाणीव होती. "लालूप्रसाद यादव गुपचचूप रेल्वेत प्रायव्हेटायझेशन आणू शकले; पण लोकांपुढे मात्र त्यांनी 'कुल्हडमधून चहा देणारा' हीच स्वतःची 'खेडवळ' प्रतिमा माध्यमांतून दृढ केली. मला तसं करता आलं नाही," आमच्या एका मुलाखतीत जोशी म्हणाले होते.
पण मग हे सारे जाणवूनसद्धा त्यांनी आपल्या माध्यमसंपर्क धोरणात काहीच फरक का केला नाही? स्वतःशी प्रामाणिक राहायच्या आग्रहामुळे? अंतिमतः आपलीच भूमिका खरी ठरेल व सगळ्यांना स्वीकारावी लागेल या आत्मविश्वासामुळे? अहंकारामुळे? नेमके सांगणे अवघड आहे.
  पण यात नुकसान माध्यमांचे नाही झाले, तर जोशींचे व एकूण शेतकरी आंदोलनाचेच झाले. कारण परिणामतः जोशींच्या एक दशांशही माणसे ज्यांच्या मागे नव्हती अशा अनेकांनी वृत्तपत्रांतील ठळक मथळे काबीज केले आणि जोशी कुठेतरी मागच्या पानावरच अडकले. त्याकाळी सोशल मिडिया हा प्रकार अर्थातच नव्हता, आजच्याएवढ्या टीव्ही वाहिन्याही नव्हत्या. त्यातल्या त्यात ग्रामीण वृत्तपत्रांनी शेतकरी आंदोलनाला थोडीफार प्रसिद्धी दिली, पण मोठ्या शहरांतल्या वृत्तपत्रांनी त्या आंदोलनाकडे जवळजवळ दुर्लक्षच केले. बहुतेक अभिजनवर्ग शहरातच राहत असे व तोच मतप्रवर्तक वर्ग होता, देशाची धोरणे ठरवणारा किंवा

४८० - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा