पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिवसेनेचा एक आमदार निवडून आला, १९९० मध्ये ५२ आमदार निवडून आले, तर १९९५ मध्ये ७३ आमदार निवडून आले आणि त्याच वर्षी सेना सत्तेवर आली. ही वाढ मुख्यतः विदर्भ व मराठवाड्यात झालेली आहे.
 शरद जोशींच्या राजकारणातील सहभागासंदर्भात एक गोष्ट नमूद करायला हवी. राजकीय सोय पाहून त्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेला मुरड घातली किंवा आपल्याला न पटणाऱ्या भूमिकेचा पुरस्कार केला असे घडल्याचे दिसत नाही.
 उदाहरणार्थ, आरक्षण अधिष्ठित मंडल आयोग स्वीकारणारे व्ही. पी. सिंग यांच्याशी खरेतर जोशींची राजकीय जवळीक होती; पण तरीही मूलतः स्वतंत्रतावादी असलेल्या जोशींनी सतत राखीव जागांना विरोधच केला. आपली ही मते राजकीय सोय पाहायची म्हणून जोशींनी कधीच लपवलीही नाहीत. २८ फेब्रुवारी १९८७ रोजी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ केलेल्या भाषणात जोशी म्हणतात,

राखीव जागांचा प्रश्न हा गरिबी हटवण्याशीही संबंधित नाही आणि बेकारी दूर करण्याशी तर नाहीच नाही. बहुजनसमाजातील बेकारांच्या पोटातील भूक ही काही दलित समाजाच्या पोटातील भुकेपेक्षा वेगळी नसते. हिंदूच्या पोटातील भूक मुसलमानाच्या पोटातील भुकेपेक्षा वेगळी नसते. भुकेला जात नाही, भाषा नाही आणि धर्मही नाही. देशात शंभर तरुण दरवर्षी नोकरीला तयार होत असले, तर सरकारी धोरणाप्रमाणे दहाच नोकऱ्या तयार होतात. त्या दहा नोकऱ्यांचे वाटप कशाही पद्धतीने झाले तरी नव्वद तरुण, मग ते कोणत्याही जातीचे असोत, बेकार उरणारच आहेत. मग त्या वादावर गरिबांनी एकमेकांची डोकी का फोडावीत?"

(शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख, पृष्ठ १८६-७)

याच प्रश्नावर आपल्या दुसऱ्या एका परखड लेखात जोशी लिहितात,
दिल्लीला मंत्रालयामध्ये राहून आपल्या हाती सत्ता येईल असे जर दलितांना, मागासवर्गीयांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. हीच गोष्ट महिला आणि शेतकऱ्यांनाही लागू आहे. आर्थिक प्रश्नाला हात न घालता, कुणाचीही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला तर सुधारणेचा फक्त भास तयार होतो. त्याचा फायदा एकाच वर्गाला मिळतो. काही वेळा तर ते विपर्यस्त होते. वर गेलेले शेतकरी बाकीच्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू नये म्हणून प्रयत्न करतात. नोकरीत गेलेले दलित खालच्या वर्गाला मदत करण्याऐवजी त्यांचे धंदे सुधारू नयेत म्हणून प्रयत्न करतात.

 काँग्रेसची स्थापना पहिल्यांदा कुणी केली? हिंदुस्तानातील शहरांमध्ये उद्योगधंदे करणाऱ्या एतद्देशीय लोकांनी पहिल्यांदा अशी मागणी केली, की आयसीएसमध्ये

राजकारणाच्या पटावर३३९