पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



17
सांजपर्व

 शरद जोशींनी शेतीला सुरुवात केली तेव्हापासूनच्या त्यांच्या एकूण आयुष्याचे स्थूलमानाने तीन टप्पे दिसतात.
 पहिला म्हणजे, १९७७ ते १९९० हा शेतीतील प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा, शेतकरी संघटना उभारण्याचा, वेगवेगळी आंदोलने करण्याचा, राजकारणात सहभाग घेण्याचा. दुसरा टप्पा म्हणजे, उदारीकरणाचे धोरण सरकारने स्वीकारले, संघटनेच्या कामाला वेगळे आयाम द्यायची गरज निर्माण झाली, खुल्या अर्थव्यवस्थेचे त्यांनी हिरिरीने समर्थन केले, स्वतंत्र भारत पक्षाची निर्मिती केली तो सगळा १९९१ ते २००० पर्यंतचा.
  आणि तिसरा टप्पा म्हणजे, २००१ ते २०१६ मध्ये हे जग सोडून जाईस्तोवरचा कालखंड; ज्या काळात आंदोलनाचा व एकूणच जीवनाचा वेग मंदावला होता, ज्याला आपण सांजपर्व म्हणू शकू असा टप्पा.
 अर्थात कोणाच्याच आयुष्याचे हवाबंद कप्पे पाडता येत नाहीत; ही विभागणी केवळ मांडणीच्या सोयीसाठी केलेली आहे हे उघड आहे.
 आयुष्याच्या या तिसऱ्या कालखंडात शेतकरी प्रश्नाशी संबंध नसलेला, पण जोशींनी जिद्दीने हाती घेतलेला एक व्यक्तिगत उपक्रम म्हणजे नर्मदा परिक्रमा. ही परिक्रमा करायचे तसे त्यांच्या खूप वर्षे मनात होते, पण चळवळीच्या व्यापामुळे सवड मिळत नव्हती. ती आत्ता मिळाली. १५ नोव्हेंबर २००२ रोजी जोशींनी प्रस्थान ठेवले. एकूण ३५०० किलोमीटरची ही यात्रा होती. तेव्हा जोशींचे वय ६७ होते. तशी ही परिक्रमा फार अवघड. तीन राज्यांतून जाणारी. रस्त्यात सोयीसुविधा काहीच नाहीत. सगळा ग्रामीण भाग.वाटेत वस्ती व दुकानेही तुरळक. औषधपाण्याची तर काहीच सोय नाही. परिक्रमेत त्यांच्याबरोबर प्रथमपासून शेवटपर्यंत दर्शिनी भट्टजी व बबन शेलार होते, तसेच त्यांचे बंधू ज्ञानेश्वर शेलारही ४ मार्चपासून २१ दिवस होते. कायम राहिलेली अशी आठ-दहाच मंडळी होती; पण इतरही काही जण वेळोवेळी येत. एका वेळी साधारण तीस-चाळीस यात्रेकरू असत. ज्ञानेश्वर शेलारांनी त्या दिवसांचा वाचनीय वृत्तान्त शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत लिहिला आहे. त्यावेळी रोज जोशी यात्रेकरूंसमोर एक व्याख्यानही देत; पण व्याख्यान न म्हणता त्याला प्रवचन म्हणत. स्थानिक लोकही प्रवचनासाठी येत. रोज पहाटे तीन वाजता जोशी उठत; इतर कोणी उठायच्या आत. नदीवर जात व कडाक्याची थंडी


४६२ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा