पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



नवे काही उत्पन्न नसताना केवळ साठवलेल्या पुंजीवर दिवस काढणे तसेही अवघडच होते. लौकरच ती संपली. खूपदा महिन्याचा घरखर्च भागवण्याइतकेही पैसे हाती नसत. अधूनमधून घरातील वस्तू विकून दिवस काढायची पाळीही त्यांच्यावर आली होती. आईच्या मृत्यूनंतर तो राहत असलेला सदिच्छा बंगला विकायचा निर्णय सर्व भावंडांनी मिळून १९९२-९३च्या सुमारास घेतला. त्या वाट्याचे आलेले पैसेही थोडे थोडे करत संपलेच. दरम्यान स्वतःचाऔंधच्या सिंध सोसायटीतील मृद्गंधबंगला त्यांनी भाड्याने दिला होता; घरखर्चासाठी काही नियमित उत्पन्न मिळावे म्हणून. पण लौकरच तो बंगला त्यांनी विकूनही टाकला व सेनापती बापट रोडवर बिना अपार्टमेंट येथे एक फ्लॅट खरेदी केला होता. या दोन्ही व्यवहारांतील फरकाची रक्कमही पुन्हा उदरनिर्वाहासाठी उपलब्ध झाली होती. जोशींची एकूण आर्थिक परिस्थिती किती बेताबाताची झाली होती याची यावरून कल्पना यावी.
 आंदोलनासाठी अनेकदा जोशींनी स्वतःच्या बचत खात्यातून पैसे दिलेले आहेत. त्यांची दैनंदिन राहणी इतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांसारखीच होती. तेही एसटी बसने व ट्रेनच्या तृतीय श्रेणीने प्रवास करत. 'तुम्हीसुद्धा या वयात. आजारी असताना वर्धा स्टेशन ते रवीच्या घरापर्यंत भल्या मोठ्या बॅग्स हातात घेऊन, मध्यरात्रीनंतर पायी जाण्याचा, पाच-पाच तास सलग बोलण्याचा रोमॅटिसिझम धकवून नेता तो यापुढे बंद करावा, असे मोहन गुंजाळ यांनी एका पत्रात त्यांना लिहिले होते. पंजाबला जाताना इतरांबरोबर तेही कसे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोपले हे अनंत उमरीकर सांगतात. 'दोन हातात दोन बॅगा घेऊन रेल्वेच्या डब्यात शिरणाऱ्या जोशींना बघून अ. वा. कुळकर्णी आश्चर्य व्यक्त करतात. भंडारदऱ्याहून पुण्याला परतताना दोन्ही मुलींना विनाआरक्षित एसटी बसमध्ये कसेबसे बसवून स्वतः ड्रायव्हरशेजारी बसणाऱ्या जोशींचे म्हात्रेना अप्रूप वाटते. पुन्हा हे सारे जराही कुरकुर न करता किंवा कुठल्याही प्रकारचे अवडंबर न माजवता जोशी वर्षानुवर्षे करत गेले.
 इथे हेही नमूद करायला हवे, की १९७६ मध्ये भारतात परतल्यानंतरच्या चाळीस वर्षांत स्वतः जोशीदेखील फक्त पाच-सहा वेळाच परदेशी गेले. केवळ काही महत्त्वाच्या परिषदांसाठी. तेही बहुतेकदा अगदी सात-आठ दिवसांसाठी. अनेक सेवानिवृत्त मध्यमवर्गीय नागरिकदेखील हल्ली वर्षातून एखादी परदेशवारी करताना दिसतात आणि अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते तर त्या बाबतीत अगदी कॉर्पोरेट अधिकाऱ्यांशी स्पर्धा करताना दिसतात. त्या पार्श्वभूमीवर स्वतः आठ वर्षे परदेशी वास्तव्य केलेले असून आणि स्वतःच्या दोन मुली परदेशी स्थायिक झालेल्या असूनही जोशींनी इतका कमी विदेश प्रवास करावा हे अधिकच उठून दिसणारे आहे.
 आर्थिक चणचणीबद्दल त्यांनी चुकूनही कधी कोणापाशी तक्रार केली नव्हती, पण निकटचे कार्यकर्ते एकूण परिस्थिती ओळखून होते व खूपदा शक्य ती मदतही करत असत. उदाहरणार्थ, सांगलीचे जयपाल फराटे (पुढे जे संघटनेचे अध्यक्षही झाले) यांची एक जोशींनी स्वतःच सांगितलेली आठवण. “जयपालअण्णा यांनी ते एकदा पुण्याला माझ्या घरी आले


सांजपर्व - ४६५