पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कळकळीची विनंती." एवढे बोलून त्या वृद्ध महिला ढसाढसा रडू लागल्या. त्यांचा दागिना परत करत जोशी म्हणाले, "मी स्त्रीधनाला हात लावणार नाही."
 अशा प्रकारच्या त्यागातून दिल्या गेलेल्या रकमा आत्मबळ वाढवणाऱ्या होत्या, पण त्यातून जोशींना अपेक्षित असलेला एक कोटीचा निधी संघटना तेव्हा किंवा नंतरही कधी उभारू शकली नाही.
 पंचवीस हजार महिला या निवासी मेळाव्याला पूर्णवेळ हजर होत्या व त्याहून कितीतरी अधिक खुल्या अधिवेशनाला हजर होत्या. नेमक्या किती महिला खुल्या अधिवेशनाला उपस्थित होत्या ह्याबद्दल तीन लाखांपासून पाच लाखांपर्यंत वेगवेगळे अंदाज व्यक्तवले गेले आहेत; इतक्या मोठ्या प्रमाणावर पूर्वी कधी महिला एखाद्या मेळाव्याला उपस्थित राहिल्या असतील असे वाटत नाही.
 अधिवेशनात संमत केले गेलेले महत्त्वाचे ठराव पुढीलप्रमाणे होते :

१. दुष्काळ पडला तर शेतकऱ्याचे हाल सर्वांत जास्त होतात. कारखाना एक वर्ष बंद झाला, तरी कारखानदार खडी फोडायला जात नाही. नोकरदार म्हातारा झाला, तरी त्याला पेन्शनचा आधार असतो. पाऊस पडला नाही तर ती नैसर्गिक आपत्ती आहे, त्यात शेतकऱ्याचा काहीच दोष नसतो; पण तरीही पाऊस पडला नाही आणि त्यामुळे दुष्काळ पडला तर शेतकरी व त्याच्या कुटुंबाला दुष्काळी कामावर जाणे भाग पडते. पण रोजगार हमी योजनेंतर्गत चालणाऱ्या कामांमध्ये यापुढे आयाबहिणी खडी-माती वाहणे, खड्डे खणणे असली कामे करणार नाहीत. खडी फोडण्याचे काम म्हणजे जणू काही सक्तमजुरीची शिक्षा. महिलांवर ते लादू नये. त्याऐवजी शासनाने सूत कातण्याचे चरखे, कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे छोटे छोटे उद्योग रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू करावे.

२. ज्या ज्या भागात पाणी भरण्याची जागा दोनशे मीटरपेक्षा जास्त अंतरावर असेल, तेथे अनुदानाची वाट न पाहता गावकऱ्यांनी तातडीने नळ-व्यवस्था करावी, लांबचे पाणी नळाने गावात आणावे व महिलांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा.
३. स्त्रिया शेतावर राबतात त्याच्या दुप्पट काम त्यांना घरात करावे लागते. शेतीवर जगणाऱ्या कुटुंबात घरकाम आणि शेतीकाम अशी निश्चित विभागणी करणे अवघड आहे, कारण ही दोन्ही कामे तशी परस्परपूरकच असतात. रोज साधारण १५ ते १६ तास या महिला काम करत असतात. इतर कामगारांना मिळतात त्याप्रमाणे बाळंतपणाची रजा, पाळणाघरे, आजारपणाची रजा, जेवणाची सोय, निवृत्तिवेतन अशा कुठल्याच सुविधांचा त्यांच्या जीवनाला स्पर्शही होत नाही. या सर्व स्त्रियांना शेतीवरील कामाचा व शेतीबाहेरील कामाचाही योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे.

४. सर्व महिलांनी राजीवस्त्रांचा वापर बंद करावा. अगदी लग्नकार्यातसुद्धा राजीवस्त्राचे बस्ते बांधू नयेत. राजीवस्त्रे विक्रीकरिता ठेवलेल्या दुकानांतून कपड्यांची खरेदी करू नये व

२९२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा