पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नक्कीच असणार, कोण बरोबर कोण चूक हा वाद खूप वाढवता येईल; पण लक्ष्मीमुक्ती अभियानाच्या संदर्भात मुद्दा एवढाच असायचा, की एवढी मोठी राणी असूनही स्वत:च्या नावावर जेमतेम आधारापुरतीही काही संपत्ती नसल्यामुळे शेवटी तिला पुन्हा एकदा वनवास भोगावा लागला.
 ज्या गावाने लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम अमलात आणला असेल, त्या गावातील आपल्या भाषणाच्या शेवटी जोशी म्हणत, "रामाला जे धनुष्य पेललं नाही, ते या बहाद्दरांनी उचलून दाखवलं आहे, म्हणून मी तुमच्या या गावात आलो. भूमिकन्या सीतेला जे भाग्य लाभलं नाही, ते लक्ष्मीमुक्तीच्या प्रत्येक गावातील शंभरेक मायाबहिणींना लाभलं, त्याचा आनंदसोहळा पाहण्यासाठी मी गावागावांत फिरतो आहे."
 लक्ष्मीमुक्ती कार्यक्रमाला मिळत गेलेल्या ह्या प्रतिसादाने स्वतः जोशी विलक्षण भारावून जात असत. आपल्या एका लेखात ते लिहितात,

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या गेल्या बारा वर्षांत कितीक दुःखाचे प्रसंग कोसळले. घर उजाड झाले. कधी यश मिळाले, कधी अपयशाचा सामना करावा लागला. आपण हाती घेतलेले हे सतीचे वाण कसे निभावते या चिंतेने कितीकदा व्याकूळ झालो. पण लक्ष्मीमुक्तीच्या या लोकविलक्षण यशाने सगळा शीण आणि सगळे दुःख दूर होऊन जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते आहे.

(शेतकरी संघटक, २१ फेब्रुवारी १९९२)


 लक्ष्मीमुक्तीबद्दल लिहिताना मधु किश्वर यांच्याविषयी लिहिणे आवश्यक वाटते. दिल्लीतील ह्या एक नामवंत प्राध्यापिका, विचारवंत, लढवय्या समाजकार्यकर्त्या, 'मानुषी' या महिलाप्रश्नांना वाहिलेल्या नियतकालिकाच्या संस्थापक-संपादिका. १९८६ साली जोशींनी त्यांना नुकत्याच स्थापन झालेल्या शेतकरी महिला आघाडीच्या कामात सहभागी व्हायचे आमंत्रण दिले. किश्वर यांचे मत असे होते, की शेतीमालाला वाजवी भाव मिळाल्याने ज्याप्रमाणे शेतकरी अधिक स्वतंत्र होईल, त्याचप्रमाणे त्याच्या पत्नीला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले, तर ती अधिक स्वतंत्र होईल आणि त्यासाठी सरकारने कायदा करायची वाट पाहत बसायचे कारण नाही; त्यासाठी संघटनेनेच शेतकऱ्यांना पत्नीच्या नावे जमीन करून द्यायला व त्यातून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून द्यायला प्रवृत्त करावे. त्यासाठी कायदा पुरेसा नाही असे त्यांचे म्हणणे होते व जोशींना ते पटले. जवळजवळ तीन वर्षे किश्वर महाराष्ट्रातील अनेक गावांमधून जोशींबरोबर फिरल्या, त्यांनी भाषणेही दिली. 'मानुषी'मधील एका लेखात (अंक क्रमांक १३६, २००६) किश्वर यांनी या आंदोलनाविषयी विस्ताराने लिहिले आहे.

 किश्वर यांच्या मते आंदोलनाला इतका प्रतिसाद मिळाला ह्याची सर्वांत महत्त्वाची कारणे म्हणजे, शेतकरी समाजात जोशी यांच्या शब्दाला असलेला मान, त्यांच्या निष्कलंक चारित्र्याबद्दल शेतकऱ्यांना असलेला विश्वास व हा माणूस आपल्याला फसवणार नाही ही त्यांची श्रद्धा.

किसानांच्या बाया आम्ही...३०१