पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पंजाबमधील असंतोषाचे मूळ कारण आहे. पंजाबमधील असंतोष हे केवळ इंडियाभारत दरीचे पूर्ण प्रतिबिंब आहे.

(शेतकरी संघटक, २७ जुलै १९८४)


 भविष्यातही पंजाबातील शेतकरी आंदोलनात शरद जोशींचा नेहमीच सहभाग राहिला. उदाहरणार्थ, अन्नधान्याचा व्यापार खुला असावा यासाठी वाघा येथील भारत-पाकिस्तान सीमेवरील सत्याग्रह किंवा भारतीय शेतकऱ्यांची कर्जे अनैतिक आहेत व म्हणून त्यांतून शेतकऱ्यांना मुक्त करायला हवे यासाठी अॅड. राम जेठमलानी यांच्या सहकार्याने त्यांनी पंजाबमधील हायकोर्टात दिलेला प्रदीर्घ लढा. याविषयी नंतर विस्ताराने लिहिलेलेच आहे. या साऱ्यांतून जोशींचा पंजाबमधील शेतकऱ्यांशी असलेला स्नेह वृद्धिंगत होत गेला.
 बाबा आमटे यांनी काही वर्षांनंतर पंजाबात शांतियात्रा काढली होती; अगदी अलीकडे २०१५ साली पंजाबात घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते; आणि ह्या दोन्ही प्रसंगी पंजाबच्या आतिथ्यशीलतेचा उत्तम अनुभव आला होता. पण जोशी यांना पंजाबात मिळालेला प्रतिसाद हा खूपच अधिक व्यापक होता; अक्षरशः लक्षावधी शेतकरी त्यांचे भक्त बनले होते. पंजाबात त्यांना जे स्थान मिळाले ते अन्य कठल्याही मराठी माणसाला त्या पूर्वी वा नंतर कधीच मिळालेले नाही; संत नामदेव हा अपवाद मानावा लागेल, कारण त्यांचे माहात्म्य मुख्यतः धार्मिक स्वरूपाचे आहे.
 महाराष्ट्राबाहेर आंदोलन पसरणे ही शरद जोशींची ज्या काळात नितांत गरज होती, त्याच काळात सदैवाने हे पंजाब प्रकरण घडले. बाजीरावाने ज्याप्रमाणे थेट अटकेपार झेंडा रोवला, तशीच जोशींनी ही एक महाराष्ट्राबाहेर मोठीच उडी घेतली. शेतकरी संघटनेच्या विस्तारालाही एक नवीच दिशा त्यामुळे मिळाली. त्यांचे आंदोलन आता स्थानिक राहिले नव्हते. दिल्लीपासून, आणि म्हणून राष्ट्रीय मंचापासून, ते अगदी जवळ जाऊन पोचले होते. अर्थात नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

 पंजाबसारख्या शेतीप्रधान प्रांतात शेतकरी संघटनेचे आंदोलन पसरणे हा भाग महत्त्वाचा आहेच, पण व्यक्तिशःदेखील पंजाबमधले अनेक शेतकरी आजही जोशींना खूप मानतात. स्वतः भूपिंदर सिंग यांची तर जोशींवर श्रद्धाच आहे. त्यांच्या बटाला येथील घरात डायनिंग टेबलाच्या बाजूच्या भिंतीवर दोनच फोटो आहेत – एक फोटो आहे अमृतसर येथील पवित्र सुवर्णमंदिराचा, आणि त्याला जोडूनच असलेला दुसरा फोटो आहे शरद जोशी यांचा.

२७८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा