पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रीची हालचाल मंदावते आणि स्वसंरक्षणाची तिची शक्ती कमी होते. साहजिकच त्या काळात तिला निवारा आणि संरक्षण यांची अधिक जरुरी पडते. पण त्या बदल्यात ती जे योगदान देते ते केवळ अमूल्य असेच आहे. कारण हे करत असतानाच मातृत्वाची निसर्गाने दिलेली जबाबदारी स्त्री पार पाडत असते. मुलांचे संगोपन करण्यातही स्त्रीची भूमिका पुरुषापेक्षा अधिक मोलाची आहे. एकवेळ बापाशिवाय आई जन्मजात अर्भक वाढवू शकेल, पण आईशिवाय जन्मजात अर्भक वाढवणे बापाला फारच अवघड आहे. स्त्रीशिवाय वंशसातत्य अशक्य आहे. किंबहुना, म्हणूनच स्त्री ही पुरुषापेक्षा कुठल्याही प्रकारे कनिष्ठ नाही, आणि तशी दोघांची तुलना करायचीच झाली, तर कदाचित ती अधिक श्रेष्ठ मानावी लागेल असेही जोशी म्हणतात. महात्मा फुले यांनीही पुरुषापेक्षा स्त्री अधिक श्रेष्ठ मानली होती ह्याचीही जोशी आठवण करून देतात.
 निसर्गाने स्त्री-पुरुषांची योजना ही एकमेकांशी संघर्ष करण्यासाठी किंवा एकमेकांवर मात करण्यासाठी केली असावी असे जोशी अजिबात मानत नाहीत. निसर्गाच्या कुठल्याही योनीत असा संघर्ष दिसत नाही, याकडे ते लक्ष वेधतात. स्त्री-पुरुष तत्त्वे एकत्र यावीत आणि त्यातून निर्मिती व्हावी यासाठी अद्भुत वाटावा असा खटाटोप निसर्ग सातत्याने चालवत असतो. मार्क्स आणि एंगल्सने केलेल्या मांडणीपेक्षा जोशींची ह्या प्रश्नाची मांडणी मूलतःच वेगळी आहे. मुळात शेतीचा शोध हा स्त्रियांनीच लावला हे ते प्रथमतःच स्पष्ट करतात.
 तरीही स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान प्राप्त झाले, ह्याचे आदिकारण शोधताना जोशी पुन्हा शेतीतील पहिल्या बचतीची लुटालूट सुरू झाली, त्या कालखंडाकडे जातात. या काळात जो समाज तयार झाला, तो या बचतीतून तयार झालेल्या मालमत्तेचा वारसा कोणाकडे जाईल, याची चिंता वाहणारा समाज नव्हता; तर प्रामुख्याने या हिंसक कालखंडात तगून कसे राहायचे याचीच काळजी वाहणारा समाज होता. शेतकरी गाई-म्हशींच्या जिवावर जगत होता, त्याचप्रमाणे हे लुटारू शेतकरी समाजाच्या जिवावर जगत होते. शेतीतील धान्य लुटून न्यावे, गुरेढोरे ताब्यात घ्यावीत, स्त्रियांनाही उचलून न्यावे असा एकच हैदोस सुरू झाला. शेतकरी समाजात लुटारूंच्या दृष्टीने अनुपयुक्त गोष्ट एकच - ती म्हणजे पुरुष. गाई-म्हशींच्या गोठ्यात जशा कालवडी तेवढ्या राखल्या जातात आणि गोऱ्हे-रेडे निरुपयोगी म्हणून काढून टाकले जातात, त्याचप्रमाणे गावावर धाड पडली, की पुरुषांची सरसकट कत्तल होत असे. स्वसंरक्षणासाठी हाती हत्यार घेऊन लढाई करण्याचे काम याच कारणाने पुरुषांकडे आले. अशा परिस्थितीत समाजात एक नवीन समाजव्यवस्था तयार झाली. या व्यवस्थेत लढाई करू शकणाऱ्या पुरुषांची उत्पत्ती जास्तीत जास्त व्हावी हे प्रमुख उद्दिष्ट बनले. पुरुषांची संख्या वाढावी, त्यांच्यातील लढाऊ गुणांना उत्तेजन मिळावे, तसेच युद्धकाळातही स्त्रियांनी पुरुषांनाच साथ द्यावी, अशी रचना तयार झाली. स्त्रियांच्या दुय्यम स्थानाचा हा उगम आहे.

 आजच्या काळाशी ह्याचा संबंध जोडताना जोशी म्हणतात, की आजही ती लुटीची व्यवस्था कायम आहे; आज लूट होते ती हत्यारांचा वापर फारसा न करता. पण त्याकाळी होती, तशीच असुरक्षितता आजही गावोगावी आहे. घराबाहेरची असुरक्षितता ही आजही

२८६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा