पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खरे सरकारचे सर्वाधिक महत्त्वाचे काम आहे. ब्रिटिशांनीही आधी ठग व पेंढाऱ्यांचा पक्का बंदोबस्त केला, 'काठीला सोने बांधून खुशाल काशीस जावे' इतका विश्वास जनतेमध्ये निर्माण केला व मगच रस्ते-रेल्वे-टपालसेवा-महसूल यंत्रणा वगैरेंची उभारणी सुरू केली ह्याकडे ते लक्ष वेधत. बाकी गरिबी हटवण्याचे वगैरे प्रयत्न सरकारने लोकांवरच सोपवावे; फक्त त्यात अडथळे निर्माण करू नयेत, असे ते म्हणत.
 क्रांती कोणापासून सुरू होते याविषयीदेखील जोशींचे विचार प्रचलित धारणांपेक्षा अगदी वेगळे आहेत. आजपर्यंत असे सांगण्यात आले, की जो सर्वांत जास्त शोषित आहे, तो उठून क्रांती करतो. प्रत्यक्षात सर्वाधिक शोषण ज्याचे होते त्याच्यात उभे राहायचेही बळ उरलेले नसते. त्याची प्रतिकार करण्याची सगळीच शक्ती कुपोषणामुळे व मानसिक दुबळेपणामुळे निघून गेलेली असते. अत्यंत हलाखीत जगणारी माणसे आपण पाहिली तर ती क्रांतीच्या तयारीत असल्याचे अजिबात दिसत नाही. उलट शोषकांकडे ती दयेची भीक मागताना दिसतात. ज्याला क्रांती करायची आहे त्याच्याजवळ काही किमान स्वास्थ्य लागते, काही किमान साधनसामग्री लागते. भाकरी न मिळाल्यामुळे माणसाला होणाऱ्या वेदना ह्या लोणी न मिळालेल्यांपेक्षा जास्त असतात, असे चुकीचे गृहीत धरून 'शोषितांच्या क्रांतीचा' फसवा व प्रचारकी सिद्धांत मांडला गेला. पण इतिहासात शिरल्यावर कळते, की आजपर्यंत घडवून आणलेल्या क्रांत्या ह्या प्रामख्याने ज्यांना लोणी मिळाले नाही त्यांनी घडवून आणल्या होत्या! ज्यांना भाकरी मिळाली नाही ते तसेच अन्याय व उपासमार सहन करत दिवस रेटत राहिले. बंगालच्या दुष्काळात ज्यांना भाकरीही मिळाली नाही असे हजारो शोषित शेतकरी धान्याच्या सरकारी गोदामासमोर जाऊन उपाशी मेले; पण त्यांनी गोदाम फोडायचा प्रयत्न केल्याची कुठेही नोंद नाही. क्रांतीचा अग्रदूत म्हणजे शोषित, हा समाजमनात स्थिर झालेला गैरसमज जोशींनी दूर केला.
 १५ ऑगस्ट १९९७ रोजी भारतीय स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली. पण पन्नास वर्षांपूर्वी देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशात जे प्रचंड उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते त्याचा मागमूसही या सुवर्णमहोत्सवी क्षणी नव्हता. या पन्नास वर्षांत आपण जी काही समृद्धी मिळवली, ती रुपयाच्या घसरलेल्या मूल्यामुळे आणि लोकसंख्या चौपट झाल्यामुळे नगण्य ठरली; सत्तेचाळीसच्या तुलनेत रुपयाचे मूल्य अवघे तीन पैसे एवढे उरले होते, तर लोकसंख्या पस्तीस कोटीहून शंभर कोटीच्या पुढे गेली होती. त्यामुळे उत्पादनातील वाढीचे सरकारी कागदपत्रांतील दावे अतिशयोक्त किंवा फसवे होते. पन्नास वर्षांपूर्वी भारताच्या तुलनेत मागासलेले असलेले इंडोनेशिया, मलेशिया यांसारखे कितीतरी देश या काळात आपल्या खूप पुढे निघून गेले. याची जाणीव सामान्य जनतेला आणि राज्यकर्त्यांनाही होती. म्हणूनच यावेळी त्यांच्यात जरासुद्धा उत्साह नव्हता; सगळा सोहळा मारूनमुटकून जमवून आणलेला. संसदेच्या खास भरवलेल्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाला जेमतेम शंभर खासदार सभागृहात हजर होते, त्यावेळी कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसलेल्या खासदारांची संख्या त्याहून


४५२ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा