पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



असते. पहाटेच्या अंधारात ती पत्रके घेऊन फुलो चालला असताना काही सैनिक त्याला बघतात. घाबरून फुलो पळत सुटतो. पण कुठे लपावे हे त्याला कळत नाही. एका मोठ्या बंगल्याच्या दाराशी येऊन तो थबकतो. ते घर एखाद्या युरोपियन माणसाचे वाटत असते. इथे आपल्याला आसरा मिळणार नाही हे त्याला लगेचच जाणवते. दुसरीकडे कुठे पळावे याचा विचार करत तो उभा असतानाच मागून हळूच बंगल्याचे दार उघडते, आतून एक हात बाहेर येतो, फुलोला आत खेचतो आणि अस्फुट आवाजात कोचाखाली लपायला सांगतो. विसावे पान इथे संपते!
 पुढे हाच फुलो स्वतःच्या हिमतीवर, जगभरातील वेगवेगळ्या देशांत घरोघर पेपर टाकणाऱ्या मुलांच्या एका आंतरराष्ट्रीय संघटनेत उच्चपदी पोचतो, असे लक्षात येते. मुळात ह्या मुलांची अशी एखादी आंतरराष्ट्रीय युनियन असू शकते ही कल्पनाच खूप वेधक वाटते. अशा युनियनच्या हाती किती मोठी ताकद असू शकेल तेही जाणवते; कारण हा व्यवसाय करणारे नसतील, तर जगभरातील वृत्तपत्रे वाचकांपर्यंत कधीच पोचणार नाहीत.
 हे टीव्ही किंवा संगणक यांच्या आधीच्या कालखंडातील कथानक आहे. सगळ्या बड्या वृत्तपत्रांच्या नाड्या ह्याच युनियनच्या हाती असतील, ही कल्पना थरारक वाटते. जोशींच्या अक्षरातील निळ्या शाईने लिहिलेली, जागोजागी सुधारणा केलेली, ए फोर आकाराची ही फक्त वीस पाने आहेत; पुढचा मजकूर उपलब्ध नाही. तो त्यांनी लिहिला की नाही, हेही कळायला मार्ग नाही. मला स्वतःला ती अर्धवट सोडून दिलेली कादंबरी पूर्ण झाली असती तर खुप आवडली असती; तिची भाषा व निवेदनशैली तर सुरेख वाटलीच, पण तिचा एकूण आवाकाही प्रचंड वाटला.
 त्यांना दोन इंग्रजी पुस्तके लिहायची होती. Metaphysics of Market (बाजारपेठेचे अध्यात्म) आणि Metaphysics of Leadership (नेतृत्वाचे अध्यात्म).
 पहिल्या पुस्तकात बाजारपेठेत सर्व संबंधितांचे हित आपोआप कसे साधले जाते याचे विवरण त्यांना अपेक्षित होते. मुक्त अर्थव्यवस्थेचा मुख्य प्रणेता मानला गेलेल्या अ‍ॅडम स्मिथने आपल्या 'वेल्थ ऑफ नेशन्स'मध्ये असे म्हटले आहे, की मांस विकणारा (बुचर), ताडी गाळणारा (ब्रुअर) आणि भट्टीत पाव भाजणारा (बेकर) हे काही परोपकारासाठी आपापली कामे करत नाहीत, स्वतःचे पोट भरण्यासाठीच ते आपापला व्यवसाय करत असतात; पण त्यांच्या कामातून आपल्याही गरजा भागतात, आपल्यालाही आपले जेवण मिळते. ("It is not from the benevolence of the butcher, the brewer, or the baker, that we can expect our dinner, but from their regard to their own interest.") हे घडते कारण एक कुठलातरी 'अदृश्य हात' (“an invisible hand") असतो, ज्याच्यामुळे स्वार्थ साधता साधताच आपोआपच परमार्थही साधला जातो; व्यक्तिगत गरजा भागवतानाच सामूहिक गरजाही भागतात.
 सामूहिक हित साधणाऱ्या या 'अदृश्य हाताचे स्पष्टीकरण करणारे पुस्तक लिहायची


४४८ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा