पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सेनेत सर्व निर्णय बाळासाहेब ठाकरेच घेत. स्वतः ठाकरेंनीही आंबेठाणला जाऊन शरद जोशींशी चर्चा केली होती. पण दर्यापूर येथील पोटनिवडणुकीत शेतकरी संघटनेने शिवसेनेला पाठिंबा दिला नाही म्हणून आणि मुंबईतले आपले शत्रू दत्ता सामंत यांच्याशी संबंध ठेवायचा नाही ही अट शेतकरी संघटनेने पाळली नाही म्हणून दोघांचे फिसकटले. एकदा 'मातोश्री वरील बैठकीत हे सगळे ढवळे बगळे (बाळासाहेबांच्या शब्दांत काँग्रेसवाले) फक्त दोघांनाच भितात – तुम्हाला आणि आम्हाला. तुम्ही गावं सांभाळा, आम्ही शहरं सांभाळतो. आपण मिळून निवडणूक जिंकू,' असे बाळासाहेब जोशींना म्हणाले होते आणि शरद जोशींना त्यांनी मुख्यमंत्री बनवायचीही 'ऑफर' दिली होती, असे त्यावेळी तिथे हजर असणाऱ्या एका व्यक्तीने प्रस्तुत लेखकाला सांगितले. अर्थात अशा विधानांची शहानिशा करणे अशक्यच असते; पण ते म्हणणे अशक्य कोटीतले नक्कीच वाटत नाही. प्रत्यक्षात त्यांची तशी युती कधीच होऊ शकली नाही हे मात्र खरे.
 हाच प्रकार भाजपच्या बाबतीतही झाला. खूप नंतर जोशी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक घटक म्हणून भाजपशी जुळवून घेतले, भाजपच्या व शिवसेनेच्या पाठबळावरच ते राज्यसभेचे सदस्यही बनले; पण त्यावेळी त्यांनी थेट वाजपेयी व अडवाणी यांच्याशीच संबंध ठेवला होता. वाजपेयांच्या उदारमतवादी विचारांविषयी, सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायच्या कौशल्याविषयी त्यांना आदर होता. स्थानिक भाजपनेत्यांपैकी प्रमोद महाजन, प्रकाश जावडेकर वगैरे मंडळी जोशींच्या अनेक भाषणांना हजर असायची पण त्यांच्यासमवेत राजकीय पातळीवर युती व्हावी या दिशेने कधी बोलणी झाली नव्हती.
 निवडणुकीच्या राजकारणातील संघटनेचे पुढचे पाऊल म्हणजे मार्च १९८७ सालची नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक, ८४ साली ही जागा तेव्हा केंद्रात मंत्री असलेल्या शंकरराव चव्हाण यांनी जिंकली होती, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नेमणूक झाल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला व ही पोटनिवडणूक घ्यावी लागली. या निवडणुकीत भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रकाश आंबेडकर यांना शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला. केवळ पाठिंबा दिला असे नव्हे, तर सर्वशक्तीनिशी संघटनेने त्यांचा प्रचारही केला. स्वतः जोशी यांनी नारळ फोडून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. आपल्या भाषणात ते म्हणाले,

 "प्रकाश आंबेडकर ऊर्फ बाळासाहेब भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून किंवा केवळ दलितांचे नेते म्हणून ही निवडणूक लढवत नसून आमच्या सर्वांचे नेते म्हणून ते ही निवडणूक लढवत आहेत. ज्या दिवशी निवडणुकीची भूमिका आम्ही ठरवली, त्याच दिवशी आम्ही निवडणूक जिंकलो आहोत. या प्रचाराच्या निमित्ताने राजवाड्यात आणि गावठाणात कोंडले गेलेले हजारो कार्यकर्ते एकत्र आले आहेत. निवडणुकीच्या या निमित्ताने त्या भिंती तोडून ते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून महिनाभर फिरले, तरी मला पुरे. हजारो वर्षांच्या या भिंती आम्ही दूर करू शकलो, राजवाडा आणि गावठाण एकत्र आले, तर आमचा विजय निश्चित आहे. गरिबांची लढाई प्रभावी करण्यासाठी आज एकाच घोषणेची आवश्यकता आहे

राजकारणाच्या पटावर३२९