पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लाहोटी हे दुसरे टोक म्हणावे लागेल. एकेकाळी त्यांना ' वाया गेलेला मुलगा' असेच सगळे म्हणत. शाळा लहानपणीच सोडलेली. मटक्याचे व्यसन. पण जोशींच्या सहवासात आल्यावर ह्या 'वाल्याचा वाल्मीकी' झाला. संघटनेच्या कामात त्यांनी स्वतःला इतके वाहून घेतले, की स्वतःच्या आजोबा-भाऊ-पुतण्या यांच्या अंत्यविधीलाही ते त्यापायी हजर राहिले नाहीत. वाघा बॉर्डरपासून सरदार सरोवरापर्यंत जिथे जिथे जोशी जात, तिथे तिथे एखाद्या सुरक्षारक्षकाप्रमाणे लाहोटीही जात; सतत सावलीसारखे जोशींच्या मागे राहत. लाहोटींसारख्यांनाही जोशींनी आपले प्रेम दिले.
 कार्यकर्त्यांनी केवळ पुस्तकी अभ्यास न करता माणसांत रमावे असा जोशींचा आग्रह असे. अमरावतीचे दिनेश शर्मा यांची एक आठवण बोलकी आहे. व्यवसायाने शर्मा एक वकील. हिंदीभाषक, फर्डे वक्ते आणि तितकेच चांगले लेखक. आपली वाणी आणि लेखणी त्यांनी संघटनेच्या प्रसारासाठी कायम वापरली. शर्मा लिहितात, "माझ्या हातात नेहमी कुठले ना कुठले नवे पुस्तक असते हे लक्षात आल्यावर ते मला एकदा म्हणाले, 'माणसे म्हणजे जीवन. जीवनातील सत्य माणसांमध्ये शोधा, पुस्तकांत नाही. त्यानंतर माझे पुस्तकांवर अवलंबून राहणे कमी झाले आणि जीवनाबद्दलचे प्रेम वाढू लागले." (अंगारमळा – फेब्रुवारी २०१६ अंक, संपादन : गंगाधर मुटे, पृष्ठ १३३)
 सध्या राज्यमंत्री असलेले सदाभाऊ खोत यांची एक आठवण सांगण्यासारखी आहे. एकेकाळी ते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते; पुढे राजू शेट्टी यांच्या संघटनेत ते गेले. एकदा शरद जोशींबरोबर ते सोलापुरात होते. तेथील एका सराफी दुकानात कोणाबरोबर तरी भेट ठरली होती. दुकानातच उभ्या राहून सदाभाऊंच्या पत्नी काचेच्या कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र न्याहाळत होत्या. जोशींच्या ते लक्षात आले होते. गप्पा संपल्यावर जोशी त्यांना म्हणाले, "वहिनी, हा सदा तुम्हाला दोन वाट्या आणि काळे मणी यापलीकडे काही देऊ शकणार नाही." मग त्यांनी दोन-अडीच तोळ्यांचे ते मंगळसूत्र स्वतःच्या खिशातून पैसे काढून विकत घेतले आणि वहिनींना भेट दिले.
 कार्यकर्ते आयुष्यभरासाठी जोडले जातात ते अशा हृदयस्पर्शी क्षणांनी. जोशी अशा क्षणांची कायम उधळण करत राहिले. शेतकरी संघटना उभी राहिली ती अशा असंख्य क्षणांच्या गुंफणीतून.

 एखाद्या कार्यकर्त्याने आपल्या वागण्यात काही चूक असल्याचे दाखवून दिले, तर ती चूक सुधारून घ्यायचा खिलाडूपणाही जोशींमध्ये होता. त्याचे एक उदाहरण. चेतना गाला सिन्हा ह्यापूर्वी छात्र युवा संघर्ष वाहिनीत होत्या. जोशींशी नुकताच परिचय झालेला. खुलताबादला कार्यकारिणीची सपत्निक बैठक जोशींनी बोलावली होती व तिला त्याही हजर होत्या. त्यावेळी जोशी सिगरेट ओढतः त्या बैठकीतदेखील ते अधूनमधून सिगरेट ओढत होते.चेतना गालांन ते खटकत होते. पण दुसरे कोणीच काही बोलत नव्हते. शेवटी धीर करून त्या एकदम म्हणाल्या, "मला वाटतं. या मीटिंगमध्ये कोणीही स्मोकिंग करू नये. ही शिस्त आपण पाळायला हवी."

३९०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा