पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असूनही गार पाण्याने अंघोळ करून मुक्कामी परत येत. रोजचे चालणे सरासरी तीस किलोमीटर होई. ह्या अनुभवाविषयी बोलताना नंतर एकदा जोशी म्हणाले,
 "शरीर कष्टवणे ह्यालाही आपल्या संस्कृतीत एक आध्यात्मिक महत्त्व आहे. सर्वच साधक म्हणून शरीराला कष्ट देत असतात. हाही एक आयुष्यातला अनुभव आहे व तो मला घ्यायचा होता."
 २६ मार्च २००३पर्यंत, म्हणजे पुढच्या १३० दिवसांत, त्यांनी ३००० किलोमीटरची परिक्रमा पूर्ण केली; आता फक्त शेवटचा ५०० किलोमीटरचा टप्पा बाकी होता. दुर्दैवाने त्या दिवशी खलघाटनंतरच्या ठिकरी या मुक्कामी अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला; बोलणेही अस्पष्ट होऊ लागले. घाईघाईने सहकाऱ्यांनी त्यांना इंदोरला हलवले व तेथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्वरित उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी पुढे प्रवास करायला सक्त बंदी केली. पुढचे तीन आठवडे त्यांनी त्या हॉस्पिटलमध्येच काढले. तेथून शेवटी ४ एप्रिलला ट्रेनने पुण्याला परतले. तब्येतीने शेवटपर्यंत साथ दिली नाही याचे शल्य होते, पण जवळजवळ ऐंशी टक्क्यांहून अधिक परिक्रमा आपण पूर्ण केली ह्याचे समाधानही जोशींना होते. एका अर्थाने माझी ती स्ट्रेस टेस्ट झाली!' ते म्हणाले. ह्या प्रवासातला एक गमतीचा भाग म्हणजे जोशींसकट सर्वांनीच दाढी वाढवली होती! त्यावेळच्या फोटोंत जोशी ओळखताच येत नाहीत!

 ह्या अखेरच्या काही वर्षांत जोशी अध्यात्माकडे वळले होते ह्याचा इथे उल्लेख करायला हरकत नाही. त्यांचे एक सहकारी धुळ्याचे रवी देवांग हे विपश्यना केंद्र चालवतात. दोन वेळा जोशी त्यांच्या शिबिरांना हजर राहिले. विपश्यनेत मौनाला खूप महत्त्व. जोशींना ते अवघड वाटले. २००० साली पहिल्या प्रयत्नात पाचच दिवसात त्यांनी साधना सोडली. दोन वर्षांनी पुन्हा प्रयत्न केला व दहा दिवसांची साधना पूर्ण केली. पण त्यात त्यांना विशेष लाभदायक असे काही जाणवले नाही. रोज दोनदा ते संध्या करत. उपनिषदे, गीता, योगसूत्रे तासन्तास वाचत. त्यांच्यासारख्या निरीश्वरवादी माणसाला ह्या सगळ्यातून नेमके काय साधायचे होते हे सांगणे अवघड आहे. त्यांचे एक स्नेही, नागपूरचे प्रसिद्ध विधिज्ञ व आता सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायाधीश शरद बोबडे यांनी त्यांना ह्या मार्गाविषयी सांगितले, असे ते एकदा मला म्हणाले होते; पण त्यावर त्यांनी अधिक काही नेमके भाष्य केले नव्हते. अर्थात दुसऱ्या कोणीतरी सुचवले म्हणून काही करणाऱ्यांपैकी जोशी नव्हते; कुठेतरी त्यांनाही ह्या मार्गाने एकदा जाऊन पाहावे असे वाटत असणार. इतरांच्या मनात त्यांची जी प्रतिमा होती, तिच्याशी अगदी विसंगत असेच त्यांचे हे नवे अध्यात्मप्रेम होते. अनेक सहकाऱ्यांना ते खटकतही असे. पण एकदा एखादी गोष्ट करायची ठरवल्यावर, काहीही झाले तरी ती करायचीच, हा त्यांचा स्वभावच होता. नर्मदा परिक्रमेच्या वेळीही अनेकांनी त्यांना तुम्ही अलीकडेच मोठ्या दुखण्यातून उठले आहात. तरुणांनाही खूप दमवणारी अशी ही यात्रा आहे. कशाला उगाच हे करता?' असे पुनःपुन्हा सांगितले होते. त्याकडे दुर्लक्ष करत जोशी परिक्रमेला


सांजपर्व - ४६३