पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पटले. म्हटले, माणूस प्रामाणिक आहे; देशाच्या भल्याचेच बोलतो आहे. आमचे संपादक शशिकांत टेंभे यांना मी नंतर बोलावून घेतले आणि माझे मत सांगितले. त्यांनाही ते पटले. देशदूत आणि सार्वमत अशी आमची दोन वृत्तपत्रे आहेत. आवृत्त्या अनेक आहेत. ह्या विचारांची पाठराखण करायचे आम्ही ठरवले. टेंभे यांचे सहकारी सुरेश अवधूत (जे पुढे संपादकही झाले) हे जिल्ह्यात जिथे जिथे संघटनेचा कार्यक्रम असेल, तिथे तिथे हजर राहत आणि सविस्तर वृत्तान्त लिहीत. नाशिक, सटाणा, श्रीरामपूर, शिर्डी, अहमदनगर वगैरे सगळ्या साखरउत्पादक परिसरात आमचे वाचक मोठ्या संख्येने आहेत. पुढची पंधरा-वीस वर्षे आम्ही सातत्याने शरद जोशींच्या आंदोलनाला भरपूर प्रसिद्धी दिली."
 दुर्दैवाने शेतकरी आंदोलनाची अशी पाठराखण मुंबई-पुण्याच्या कुठल्या वृत्तपत्राने केली नाही.
 मुंबईचे राजीव बसर्गेकर, नाशिकचे मिलिंद मुरुगकर, पुण्याचे विनय हर्डीकर, औरंगाबादचे मानवेंद्र काचोळे, यवतमाळचे सुधाकर जाधव, कोल्हापूरचे अजित नरदे, नागपूरचे शरद पाटील, मेटाखेड्याचे चंद्रकांत वानखडे ही विचारवंत मानली गेलेली मंडळी. म्हणजे शेतकरी संघटनेचे थिंक टॅक. आपल्या लेखनातून त्यांनी संघटनेचे विचार सर्वदूर पोचवले.
 घरंदाज मराठा घराण्यातल्या असूनही घराबाहेर पडून दारूदुकान बंदी आंदोलनात नेतृत्व देणाऱ्या व पुढे महिला आघाडीच्या अध्यक्ष बनलेल्या अमरावतीच्या विमल पाटील,वर्ध्याच्या सरोज काशीकर व सुमन अगरवाल, आर्वीच्या शैला देशपांडे, मुंबईच्या पत्रकार ओल्गा टेलीस, अमेरिकन असून ग्रामीण महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या गेल ऑमवेट, मुंबईच्या लेखिका व लघुपटनिर्मात्या अंजली कीर्तने, दिल्लीच्या मधु किश्वर, पुण्याच्या विद्युत भागवत, म्हसवडच्या चेतना गाला सिन्हा ह्या सर्व महिला सहकाऱ्यांचे योगदानही मोठे आहे. क्वचितच कुठल्या पक्षाला वा संघटनेला इतका कर्तृत्ववान व गुणसंपन्न महिला विभाग लाभला असेल.

 अनंतराव देशपांडे, बद्रीनाथ देवकर, सुरेशचंद्र म्हात्रे व दर्शिनी भट्ट हे चार कार्यकर्ते अखेरच्या काही वर्षांत जोशींच्या सर्वाधिक निकट राहिले. त्यांच्या निष्ठेविषयी व सेवावृत्तीविषयी लिहावे तेवढे थोडेच आहे.

 अनंतराव देशपांडे मूळचे लातूरचे. परभणी अधिवेशनापासून ते शेतकरी आंदोलनात सामील झाले. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची एक सभा उधळून लावण्याइतके 'धाडस' संघटनेत आल्यावर त्यांच्यात निर्माण झाले. शिवार योजनेत त्यांनीही एक शाखा लातूरला उघडली होती; पण ती सगळी योजनाच पुढे फसली. त्यांची उसाची शेती होती. तशी मोठी होती, पण पूर्ण तोट्यात.सामान्यतः शेतमजुरावर होणाऱ्या अत्याचाराच्या कहाण्या आपण ऐकतो. अनंतरावांची कहाणी वास्तवाच्या अगदी वेगळ्या अंगावर प्रकाश पाडते. त्यांचा पूर्ण तयार झालेला ऊस तोडायला ऊसतोडणी कामगारांनी नकार दिला. कितीही मनधरणी केली, कितीही मजुरी देऊ केली, अगदी हातापाया पडून विनवणी केली, तरी कोणी यायला तयार होईना. शेवटी तो सगळा तयार झालेला ऊस अनंतरावांना चक्क जाळून टाकायला लागला. शेतकरी किती मोठ्या

३८४अंगारवाटा... शोध शरद जोशींचा