पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

एक्स्प्रेसचे चंडीगढ येथील प्रमुख वार्ताहर विनोद मिश्रा यांनी जोशींची विस्तृत मुलाखत घेतली व ती दुसऱ्या दिवशी पेपरात छापूनही आली. या मुलाखतीदरम्यान मिश्रांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना जोशींनी एक अतिशय महत्त्वाचे व काहीसे धक्कादायक असे विधान केले होते. ते म्हणाले होते, "शेतीमालाच्या रास्त भावाची आणि योग्य मार्गाने उत्पादनखर्च काढायची कल्पना जर शासनाने कायदा म्हणून मान्य केली तर ही संघटना व चळवळ विसर्जित करायचा मी सल्ला देईन.”
  यावेळी तिथे उपस्थित असलेले कुळकर्णी लिहितात (शरद जोशींबरोबर ... पंजाबात, पृष्ठ ५९-६०):

जोशींच्या ह्या बोलण्याने मिश्रांसह सर्व जण एकदम चमकले. जोशींना आपल्या अशा बोलण्याच्या संभवनीय परिणामांची कल्पना असावी. कुणाकडेही न बघत त्यांनी शांतपणे सिगरेट पेटवली आणि एक झुरका घेतला. थोड्या वेळाने त्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले. त्यावेळी किंवा त्यानंतरच्या प्रवासात मी प्रकट न केलेली वस्तुस्थिती मला इथे सांगायलाच हवी. जोशींचे ते उत्तर ऐकून मी पुरा हबकून गेलो होतो. अशी विसर्जनाची भाषा करायची म्हणजे मग उभ्या केल्या जाणाऱ्या संघटनेचे, तिच्यासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांचे काय? पण थोड्या विचारान्ती लक्षात आले, की हे वाटणे योग्य नाही. कारण जोशी संघटित करीत असलेल्या चळवळीचा जीवित हेतू केवळ आर्थिक आहे नि एक-कलमी आहे. शेतीमालाचा उत्पादनखर्च ठरविण्यासाठी यथायोग्य आराखड्यास मान्यता आणि त्यानुसार शेतीमालास रास्त भाव देण्यास मान्यता या गोष्टी शासकीय पातळ्यांवर मान्य झाल्यानंतर या चळवळीचे निर्मितिकार्य पूर्ण होणार आहे. तिच्या जीवितहेतूची पूर्तताच अशा मान्यतेत सामावलेली आहे. मग या चळवळीला वेगळे असे कोणते कार्य शिल्लक राहते? मग जे काही प्रसंगोपात्त प्रश्न उभे राहतील त्यांचे स्वरूप मामुली असेल; त्यांची सोडवणूक इतर मार्गांनी करताही येईल. हे असे जाणवून गेले नि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेस विसर्जित करा' असा सल्ला देणारे महात्मा गांधीजी माझ्या नजरेसमोर उभे राहिले!


 'शेतकरी संघटनेची आज आवश्यकता आहे का?' असा प्रश्न 'शेतकरी संघटक' या मुखपत्रात जोशींनी स्वत:च अनेकदा उपस्थित केला होता. त्यावर भरपूर चर्चाही झाली होती. त्यासाठी ३ ऑगस्ट १९८८ रोजी त्यांनी अंगारमळा येथे आपल्या जवळच्या सहकाऱ्यांची एक बैठकही बोलावली होती. या बैठकीबद्दल डॉ धनागरे यांनी आपल्या उपरोक्त इंग्रजी पुस्तकात विस्ताराने लिहिले आहे. आपल्या संघटनेचे कार्य आता संपले आहे, अशी भूमिका जोशींनी प्रास्ताविकात मांडली; पण त्या बैठकीत प्रस्तावित विसर्जनाला कार्यकत्यांपैकी निदान काहींचा प्रखर विरोध आहे हे त्यांच्या लक्षात आले. 'शरद जोशी मुर्दाबाद' अशी घोषणा भास्करराव बोरावके यांच्या पुतण्याने, शशिकांतने, याच बैठकीत दिली. जोशींनी मग हा मुद्दा

सहकारी आणि टीकाकार - ४०५