पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



काळात वारकऱ्यांवर खूप टीका केली हे खरे आहे व प्रकरण नऊमध्ये तो भाग आलाच आहे. शेतीला सुरुवात केली त्यावेळच्या त्यांच्या अनुभवावर ती टीका आधारलेली होती. पण वारकरी संप्रदायाची चांगली बाजूही त्यांनी पुढे आठ-दहा वर्षांनी लिहिलेल्या आपल्या शेतकऱ्यांचा राजा शिवाजी (प्रकाशन १८ एप्रिल १९८८) या छोट्या पण महत्त्वाच्या पुस्तकात अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. त्यांची त्या संदर्भातली काही काही विधाने इथे उदधृत करण्याजोगी आहेत.
  "जयजय रामकृष्ण हरी' आणि 'पुंडलिक वरदा'च्या घोषाने दुःखे संपली नाहीत तरी, या दुःखांपलीकडे पाहण्याची ताकद समाजाला मिळाली."
  "ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी जातिव्यवस्थेतील उच्चनीचतेवर आपल्या लिखाणाने आणि वागणुकीने उघडपणे आघात केले. शूद्रातिशूद्रांना समाज पारखा झाला होता. संतांनी उपदेशिलेल्या भक्तिमार्गामुळे त्यांच्या मनात आसपासच्या समाजाशी आपले काहीतरी लागेबांधे आहेत अशी भावना तयार होणे शक्य झाले."
 "संतांनी बजावलेली आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे अध्यात्म व धर्म जनसामान्यांच्या मराठी भाषेत मांडणे. संतांनी जनसामान्यांना धर्मविचाराचे एक नवीन दालन उघडून दिले. धर्म म्हणजे निरर्थक वटवट नाही,धर्मविचार सामान्य जीवनातही महत्त्वाचा आहे याची जाणीव जनसामान्यांना पहिल्यांदी झाली. तुकडे तुकडे झालेल्या समाजाला एकत्र जोडण्याकरिता संतांनी केलेले हे काम अद्वितीय मानावे लागेल."
 "पंढरपूरची वारी हा निराधारांचा आधार आहे. वारकरी पंथाने या चलनवलनातील लाचारीचे रूप काढून टाकले. पंढरपूरला जाणारे पोटार्थी भिकारी राहिले नाहीत; पंढरीनाथाचे पुण्यवान भक्त झाले. त्यांना भाकरतुकडा घालणारे श्रीमंत दाते राहिले नाहीत; विठोबाच्या भक्तांच्या सेवेचे मानकरी झाले. महाराष्ट्रातील भक्तिमार्ग हा एक अत्यंत बिकट दैन्यावस्थेत समाजाला तगवून ठेवणारा चमत्कार ठरला.”
 दुर्दैवाने जोशींची ही वारकरी संप्रदायाचा अत्यंत तार्किक व वस्तुनिष्ठ गौरव करणारी मांडणी फारच कमी लोकांपढे पोचली.

 जोशींबद्दल अगदी विनाकारण प्रचलित असलेला आणखी एक गैरसमज म्हणजे त्यांच्यामागे फक्त बडे बागाईतदार होते. मुळात 'कसेल त्याची जमीन' हे धोरण सरकारने अमलात आणल्यानंतर महाराष्ट्रात मोठी शेती अशी जवळजवळ नव्हतीच. जी काही होती तिच्याही पुढील पिढ्यांत वाटण्या होऊन प्रत्येक कुटुंबाचे उर्वरित क्षेत्र हे छोटेच होते. त्यातल्या त्यात जे शेतकरी धनिक होते, त्यांचा पैसा हा शेतीतून नव्हे तर अन्य उत्पन्नाच्या साधनांतून किंवा राजकारणातून आला होता. तशी मंडळी सहकारी साखर कारखाने किंवा पतपेढ्या किंवा दूधसंघ यांच्यामागे होती; शेतकरी आंदोलनात त्यांच्यापैकी क्वचितच कोणी आले असेल; किंबहुना त्या मंडळींचा जोशींना व शेतकरी संघटनेला कायम विरोध होता. ही मंडळी बहतांशी काँग्रेससमर्थक होती.


४७६ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा