पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेल्या फेब्रुवारीत चाकणच्या बाजारपेठेत शेतकऱ्यांना आपला टोमॅटो अवघ्या तीन पैसे किलो भावाने विकावा लागला. अनेकांनी तर तोही भाव येत नाही म्हणून आपल्या टोमॅटोचे ढीगच्या ढीग रस्त्यावर फेकून दिले. नंतर फक्त चार महिन्यांनी तोच टोमॅटो दोन रुपये किलो झाला. पण नाशवंत पीक असल्याने शेतकरी चार महिने थांबू शकत नव्हता. इथे तंत्रज्ञान आपल्या उपयोगी पडू शकते. बाजारात चांगला भाव मिळेस्तोवर टोमॅटो शीतग्रुहांत साठवता आला पाहिजे. म्हणजे मग योग्य वेळी तो बाजारात आणून आपल्याला उत्तम भाव मिळू शकेल. तसेच त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचा रस, सॉस, सूप, चटणी करता आली पाहिजे. ते तयार खाद्यपदार्थ मग आपल्याला जगभर कुठेही विकता येतील.
हा केवळ तंत्रज्ञानाचा एक छोटासा भाग झाला. त्याचे खरे तर अनंत उपयोग शेतकरी करू शकतो. नैसर्गिक आपत्तीवरही तंत्रज्ञान मार्ग काढू शकते. आज मनुष्य चंद्रावर जाऊ शकतो किंवा जिथे दहा-दहा, बारा-बारा फूट बर्फ वर्षभर असते अशा सैबेरियासारख्या ठिकाणीसुद्धा चांगली शेती होऊ शकते. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग आपण करायला हवा.


 भारतातील साठाव्या दशकातील हरितक्रांती ही मुख्यत: मेक्सिकोमध्ये तयार केलेल्या गव्हाच्या-तांदळाच्या सुधारित बियाणांमुळे आणि खतांच्या सढळ वापरामुळेच शक्य झाली याविषयी त्यांच्या मनात तिळमात्र संदेह नव्हता. जनुकीय क्रांतीमुळे (जेनेटिकली मॉडिफाइड बियाणांमुळे) भारताचा तसाच फायदा होईल, असे ते म्हणतात. पण त्या बियाणामुळे रासायनिक खतांचा व केमिकल्सचा वापर अनावश्यक ठरतो, म्हणून अशा खतांचे व केमिकल्सचे निर्माते व व्यापारी काही मुठभर भारतीयांना हाताशी धरून आदळआपट करत आहेत, असे त्यांना वाटते. एका व्याख्यानात जोशी म्हणतात,

गेल्या वर्षी आंध्र प्रदेशात १,५०० हुन अधिक कापूस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एका लहानशा अळीने - बोंडअळीने - त्यांना आत्महत्या करायला लावली. बोंडअळीचा इतका प्रचंड हल्ला झाला, की कापसाचे पीक नाहीसे झाले आणि त्यांना आत्महत्या करणे भाग पडले. आता कापसाचे एक नवीन बियाणे असे निघाले आहे. की त्या बियाण्यातन उगवलेल्या रोपांवर बोंडअळी येतच नाही कपाशीच्या बियाण्याच्या विशिष्ट जनुकात काही बदल करून शास्त्रज्ञांनी हे बोंडअळीला प्रतिबंध करण्याची अंगची ताकद असलेले बियाणे तयार केले आहे. आज हे बियाणे अमेरिकेतील ३५ टक्के शेतकरी वापरतात. त्याचा परिणाम असा झाला, की तेथील कापसाचे उत्पादन वाढले आणि औषधांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे उत्पादनखर्चही कमी झाला. आणि त्यामुळे पहिल्यांदा अशी परिस्थिती तयार झाली आहे, की कापसाचा जागतिक बाजारपेठेतला भाव



४५८ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा