पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



तो उत्तम प्रतीत होतो.
  मोहन गुंजाळ हे शेतकरी संघटनेचे येवल्यातले एक तडफदार कार्यकर्ते. अकालीच त्यांचे निधन झाले. त्यांच्यावरती एक सुरेख स्मृतिग्रंथ त्यांचे शेजारी आणि अनुष्टुभ या मराठी वाङ्मयीन त्रैमासिकाचे संस्थापक प्रा. गो. तु. पाटील यांनी संपादित केला आहे. त्यात गुंजाळ यांनी जोशींना ३ जानेवारी १९८६ रोजी लिहिलेले एक मनमोकळे पत्र छापले आहे. जोशी हृदयविकाराच्या पहिल्या झटक्यानंतर पुण्याच्या जहांगीर नर्सिंग होममध्ये दाखल असल्याची बातमी ऐकून त्यांच्या तब्येतीविषयी वाटणारी काळजी या पत्रात गुंजाळ यांनी व्यक्त केली होती. त्याला जोशींनी दिलेले उत्तरही स्मृतिग्रंथात छापले आहे. त्या पत्रोत्तरात जोशी लिहितात,

तुझे पत्र कालच सुरेशचंद्र म्हात्रे यांनी दाखवले. पत्रातील तुझी भावना पाहून दाटून आले. दहा वर्षांपूर्वी आल्प्समध्ये गिर्यारोहण करणारा, खरोखरच सणसणीत प्रकृतीचा मनुष्य पार संपायच्या आसपास येतो, हे कसे काय? तीन उपोषणे, सोळा तुरुंगवास, चार हजारावर सभा, रात्रीचा प्रवास, राहण्यासाहण्याच्या गैरसोयी, खाण्यापिण्यातला अनियमितपणा, एवढी दगदग लक्षात घेतली तरी प्रकृतीवर एवढा विपरीत परिणाम व्हायला नको होता असे वाटते. जनसामान्यांच्या बाजूने उठणाऱ्यांना हा काय शाप आहे?...

इस्पितळात इथे पडल्या पडल्या या प्रश्नांची उत्तरे मीही शोधतो आहे. काही काही प्रकाशकिरण सापडतातही. संघटनेच्या कामाला काहींनी संन्याश्याचे वैभव म्हटले होते. त्या वर्णनात एकेकाळी मीही खूप सुखावलो होतो. आमच्या विचारांच्या मस्तीत आम्ही सर्वतोपरी तयारी केली, ती आपापले जीव उधळून देण्याची. मग परिणाम हाच निघाला, की आमचे जीवच उधळले जाऊ लागले...
आम्ही वस्तुवादी रणनीती म्हणून केवळ सत्याग्रह, कायदेभंग स्वीकारला. पण ही साधने हाताळता हाताळता त्यातल्या अध्यात्माने आम्हालाच गिळून, पछाडून टाकले की काय? कळीकाळालाही नमवून मृत्युंजय होऊ या भावनेऐवजी पराभवातली काव्यमय रोमांचकता आम्हाला रुचू लागली आहे की काय?...

गेल्या काही वर्षांत मी आयुष्याच्या उतरंडीला लागलो आहे अशा मनाच्या अवस्थेत गेलो होतो. उरलेल्या काळात हाती घेतलेले काम जितके पुढे नेता येईल तितके न्यायचे, या कल्पनेतच समाधान मानू लागलो होतो. आज मी ठरवतो आहे – या राखेतून मी उड्डाण घेणार आहे. अगदी वैयक्तिक पातळीवरसुद्धा मी उताराला लागलेलो नाही. नव्या टेकडीवर चढायला सुरुवात करतो आहे.


 'राखेतूनही पुन्हा उड्डाण घ्यायचा' हा जबरदस्त आत्मविश्वास हे जोशींचे कायम टिकलेले वैशिष्ट्य होते. त्याचे रहस्य होते, आपला विचार बरोबरच आहे याची खात्री. ही अचल


सांजपर्व - ४८९