पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 माधवराव मोरे अध्यक्षस्थानी होते. दांडेकर व जोशी ह्यांच्याप्रमाणे मोरे व दुसरे एक वक्ते प्रल्हाद कराड पाटील यांचीही भाषणे झाली व त्या चारी भाषणांचे संकलन ३० एप्रिल १९८३ रोजी शेतकरी संघटनेचे अर्थशास्त्र - खंडनमंडन या शीर्षकाखाली प्रकाशित झाले. पुढे या प्रसंगी केलेली दांडेकर व जोशी यांची भाषणे 'केसरी'च्या एका विशेषांकातही (कृषी वार्षिक १९८३) प्रकाशित झाली होती.
 सगळे सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरले होते आणि दुपारी चार वाजता सुरू झालेली ही भाषणे रात्री सव्वा आठला संपली; पण शेवटपर्यंत सर्व श्रोते अगदी तल्लीन होऊन ती ऐकत होते. जोशींच्या पुस्तकांचे असे जाहीर प्रकाशन समारंभ नंतर कधी झाले नाहीत.
 आपल्या भाषणात दांडेकर यांनी काही चांगले मुद्दे मांडले होते. उदाहरणार्थ, ग्राहकांच्या क्रयशक्तीवरही शेतीमालाचा भाव आधारित असतो, केवळ उत्पादनखर्चावर नव्हे. 'इंडिया' विरुद्ध 'भारत' ऐवजी 'शेतीवर अवलंबून असलेली जनता' विरुद्ध बिगरशेती व्यवसायावर अवलंबून असलेली जनता' असे विभाजन त्यांच्या मते अधिक योग्य होते. त्यांच्यातील दरी मिटवण्यासाठी बिगरशेती भागातील श्रीमंत वर्गाचे थोडे कमी करून शेती भागाच्या तळातील घटकास ते मिळावे, असे ते म्हणाले. "शरद जोशी यांच्या कोत्या, एकांगी व एकार्थी विचारसरणीमुळे शेतकरी संघटनेतील तरुण कार्यकर्त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व वैचारिक प्रगतीला तर मर्यादा पडतीलच, परंतु विधायक कार्यक्रमाच्या अभावी, नाकर्तेपणामळे त्यांच्यात विद्ध्वंसकता घर करू लागेल. समाजाच्या उन्नतीस हे हितकारक नाही," असा गंभीर इशारा देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला. पुस्तकांचे प्रकाशन करतानाच त्यांनी ही टीकाही केलीच. पण जोशींनी शेवटी आपल्या भाषणात टीकेचे स्वागतच केले व टीकेला समर्पक उत्तरेही दिली.
 जिथे दोन्ही बाजू मांडल्या जातील अशा प्रकारचा असला जाहीर कार्यक्रम शेतकरी संघटनेच्या संदर्भात नंतर कोणीच कधी आयोजित केला नाही.
 जाहीररीत्या टीका करणे टाळणारी, पण मनात जोशीविषयी दुरावा बाळगणारी माणसेही साहजिकच होती. प्रत्येकाची दुराव्यामागची कारणे अर्थातच वेगवेगळी असणार; कधी वैचारिक, कधी व्यक्तिगत तर कधी संमिश्र. अशा टीकेबद्दल काही लिहिणे अवघड आहे. पण त्यांच्यावरील प्रकाशित लेखनात केल्या गेलेल्या काही टीकेची इथे नोंदतरी घेणे अप्रस्तुत ठरू नये, कारण त्यातलेही काही वाचकाच्या लक्षात येणे उपयुक्त ठरू शकेल.
  चंद्रकांत वानखडे पत्रकार व लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक वर्षे ते जोशींबरोबर कार्यरत होते. त्यांच्या आपुला चि वाद आपणांसी या पुस्तकातील एक संपूर्ण प्रकरण (पृष्ठ १३२ ते १४३) शरद जोशी व शेतकरी आंदोलन यांविषयी लिहिलेले आहे. "नेत्याच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेने आंदोलनाचा बळी घेतला." हा त्या लेखाचा समारोप आहे.
 विद्युत भागवत या पुणे विद्यापीठातील स्त्रीअभ्यास केंद्राच्या भूतपूर्व प्रमुख. सुरुवातीच्या काळात शेतकरी महिला आघाडीच्या कामात त्यांनी बराच पुढाकार घेतला. पुढे मात्र त्यांनी

                                                                         ३९८ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा