पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या संसदेचे पंतप्रधान व्हा. You are the Prime Minister material!'

ह्या बैठकीला मनासारखा प्रतिसाद मिळाला नाही. शंकर गुहा नियोगींसारख्या झुंजार नेत्याने छत्तीसगडाबाहेर पडण्याबाबत असमर्थता व्यक्त केली. पंजाबचे नेते दिल्लीतील शीखविरोधी दंग्यांच्या पार्श्वभूमीवर सूर्यास्ताआधी तासभर दिल्ली सोडायच्या मागे असायचे. एकूणच प्रचंड बहुमत मिळालेल्या राजीव गांधी सरकारविरुद्ध उठवलेला कोणताही आवाज लोकांना आज आवडणार नाही, ही भावना प्रबळ होती.

(शेतकरी संघटना आणि मी : १९८४ ते १९८८,

अंतर्नाद, ऑक्टोबर २००९, पृष्ठ ४१)

 वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान व उजळ प्रतिमा असलेल्या लोकांची एक यादी तयार करायची, त्यांना निवडणुकीला उभे राहण्यासाठी तयार करायचे व सर्वतोपरी पाठिंबा देऊन निवडून आणायचे असाही जोशींचा प्रयत्न करून झाला. दिल्लीतील पत्रकार व लेखक कुलदीप नायर यांच्या घरी अशी यादी तयार करण्यासाठी अनेक बैठका झाल्या. पत्रकार मृणाल पांडे, सुरेंद्र मोहन, स्वामी अग्निवेश, 'मानुषी'च्या संस्थापक-संपादिका मधु किश्वर अशी सात-आठ जणांची एक अनौपचारिक समिती त्यासाठी कार्यरत होती. सुमारे चारशेच्या आसपास नावे त्यांनी जमाही केली होती; त्यांच्याशी प्राथमिक स्वरूपात संपर्कही साधला होता. पण त्यातूनही फारसे काही निघाले नाही.
 या सर्व कालखंडात शेतकरी संघटनेचे कामही चालूच होते. उदाहरणार्थ, भ्रष्टाचाराविरुद्ध उभारलेले 'Q' आंदोलन, वीज महामंडळाविरुद्ध आंदोलन, हातोडा मोर्चा, ज्वारी परिषद इत्यादी. पण ते आता स्वतंत्र काम उरले नव्हते, तर राजकीय हालचालींशी ते जोडले गेले होते. राजकारण हा जोशींच्या दृष्टीने आंदोलनांच्या पलीकडचा असा पुढचा टप्पा होता. या टप्प्यात आपला लढा देशव्यापी करणे आवश्यक होते. त्यादृष्टीने अखिल भारतीय पातळीवर शेतकऱ्यांचे संघटन उभारायचा प्रयत्न ते सतत करत राहिले.

 खरे पाहता तामिळनाडूच्या नारायणस्वामी नायडू यांना अशी अखिल भारतीय पातळीवरील किसान संघटना सर्वप्रथम निर्माण करायचे श्रेय दिले पाहिजे. आधुनिक भारतातील शेतकरी चळवळीचे त्यांना भीष्माचार्य म्हणता येईल. जोशी परदेशात होते त्याचवेळी, १९७० सालच्या सुमारास, त्यांनी आपल्या शेतकऱ्यांमधील कामाला सुरुवात केली. 'व्यावसायीगल संघम' हे त्यांच्या तामिळनाडूमधील संघटनेचे नाव. पुढे त्यांनीच पुढाकार घेऊन १४ डिसेंबर १९८० रोजी हैद्राबाद इथे वेगवेगळ्या प्रांतांतील शेतकरीनेत्यांना एका बैठकीसाठी यायचे आमंत्रण दिले. बरीच मेहनत घेऊन त्यांनी अशा शेतकरीनेत्यांची माहिती गोळा केली, त्यांच्याशी संपर्क साधला. जोशी त्या बैठकीला हजर नव्हते. त्या पहिल्या

राष्ट्रीय मंचावर जाताना ३४७