पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तेव्हाही मिडियाला पर्याय नव्हता हेही तितकेच खरे आहे. मिडियाच तुमची larger than life प्रतिमा बनवू शकतो – मग तुम्ही नेता असा वा नट, उद्योगपती असा वा विचारवंत. सत्तेसाठी मिडिया 'सांभाळणे' आजच्याइतकेच तेव्हाही अपरिहार्य होते. इंदिरा गांधींपासून एखाद्या स्थानिक नगरसेवकापर्यंत बहुतेक सर्व नेते तेव्हाही ते करतच होते; पण ते जोशींना कधीच जमले नाही.
 सुरुवातीपासून ज्यांनी शेतकरी आंदोलनात रुची दाखवली अशा पुण्यातील एका पत्रकाराने सांगितलेल्या आठवणीनुसार, ऐंशीच्या दरम्यान आपली निळी जीन्स घालून आणि मोटारसायकलवर बसून जोशी खूपदा त्यांच्या कचेरीत जात, संपादकीय विभागात समोर दिसणाऱ्या कुणाच्याही टेबलावर एखादे कार्यक्रमाचे पत्रक ठेवत आणि बघा, वेळ मिळाला तर वाचा; आणि वाटलं तर छापा' असे म्हणून लगेच आल्या पावली निघून जात; गप्पा मारणे नाही. छापण्याबद्दल विनंती करणे नाही. संपर्क वाढावा म्हणून कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही.
 पुढे पुढे तर जोशींनी वृत्तपत्रांच्या कार्यालयात जाणेही थांबवले. अनेकदा काही कार्यकर्ते एखाद्या खास सभेसाठी 'पत्रकारांना मुद्दाम जाऊन भेटावं, त्यांच्याशी चर्चा करावी व त्यांना आमंत्रण द्यावं' असे सुचवत. जोशी त्यांना उत्तेजन देत नसत. ते म्हणत,
  "आपण असा जंगी बार उडवायचा की पत्रकार आपणहूनच आले पाहिजेत. आपण कशाला कोणाचं लांगूलचालन करायचं?"
 याचा अर्थ त्यांना प्रसिद्धी नको होती असा नाही; पण आपले काम इतके महत्त्वाचे आहे, की त्याची दखल माध्यमांना घ्यावीच लागेल असा त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता.
 सुरुवातीच्या काळात शेतकरी आंदोलनाकडे अनेक वृत्तपत्रे, विशेषतः शहरी मराठी वृत्तपत्रे, दुर्लक्ष तरी करत वा टीका तरी करत व त्यामुळे आपले कार्यकर्ते खचून जायची किंवा चिडायची शक्यता आहे ह्याची जोशींना जाणीव होती. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचा मतदारसंघ शेतकरी हाच आहे व नेमका तोच वर्ग आपल्यामागे येत असल्याने सत्ताधारी आपल्या कायम विरोधात असणार, येन केन प्रकारेण सरकारी आश्रयावर अवलंबून असणारी वृत्तपत्रेही आपल्या विरोधातच राहणार; पण एक ना एक दिवस त्यांना आपले महत्त्व मान्य करावेच लागेल हे जोशींचे गृहीतक होते. वर्धा येथील १९८० सालच्या अगदी सुरुवातीच्या प्रशिक्षण शिबिरातील भाषणात ते म्हणाले होते :

हल्लीचे संपादक क्रिकेटपासून शेतकरी आंदोलनापर्यंत सगळ्याच विषयांवर सारख्याच अधिकाराने सल्ले देत असतात. त्यांतल्या बहुतेकांची धोरणं ही परिस्थितीनुरूप बदलत असतात. युरोपमधील फ्रान्सचा बादशहा सम्राट नेपोलिअन याच्या राज्यात एकदा बंड झालं आणि त्याला पकडून दूरवरच्या एल्बा नावाच्या बेटावर तुरुंगात ठेवलं गेलं. नेपोलिअनने तिथून आपली सुटका करून घेतली. त्यावेळी पॅरीसच्या वर्तमानपत्रांनी 'दरोडेखोर नेपोलिअनचे तुरुंगातन पलायन' अश मथळ्याखाली ही बातमी प्रसृत केली. पुढे नेपोलिअनने सैन्य गोळा करून



सांजपर्व - ४७९