पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सलग चौदा वर्षे ते कृषिमंत्री होते. शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा मार्ग दोघा भावांना तितकासा मान्य नव्हता, पण दोघांनाही जोशींबद्दल खूप आदर होता. रावसाहेबांच्या ज्येष्ठ कन्या म्हणजे शुभांगी; बद्रीनाथांच्या पत्नी. आपले जावई पूर्णवेळ शेतकरी संघटनेचे काम करतात याचा रावसाहेबांना अभिमान होता.
 शेतीतील एकूण दुर्दशा आयुष्यभर अनुभवल्यानंतर बद्रीनाथांनी एक निश्चय केला; कसेही करून निदान आपल्या मुलांना शेतीतून बाहेर काढायचे. तेच उद्दिष्ट समोर ठेवून ते पुण्याला राहायला आले. अनंत कष्ट उपसले, तब्येतीच्या व इतर प्रापंचिक अडचणी झेलल्या, संसाराचा गाडा चालवण्यासाठी बरीचशी शेती देवकरांना थोडी थोडी करत विकावीही लागली. जेमतेम तीनेक एकर शेती आणि राहते घर तेवढे राहिले. पण तिन्ही मुले आता परदेशात सुस्थितीत आहेत. कधी कधी महिना महिना बद्रीनाथ संघटनेच्या कामासाठी घराबाहेर असत, पण शुभाताईंनी सर्व भार विनातक्रार वाहिला. जोशींचा बद्रीनाथांवर पूर्ण विश्वास. आपली अनेक व्यक्तिगत कामेही जोशी त्यांच्यावर निःशंकपणे सोपवत. पुण्यात जेव्हा जोशींचा स्वतःचा फ्लॅट नव्हता, तेव्हा पुण्यात आले, की खूपदा त्यांचा मुक्काम देवकरांच्या पुण्यातल्या घरीच असायचा. पुण्यातील देवकरांचे सध्याचे घर आमच्या शेजारच्याच इमारतीत आहे. त्यांच्याकडे गेल्यावर जोशींना भेटायचा, त्यांच्याबरोबर जेवायचा योग मलाही आला आहे.

 सुरेशचंद्र म्हात्रे मूळचे अलिबागचे. गणिताचे प्राध्यापक. पण पिंड समाजसेवकाचा. त्यांचे एक सहकारी प्राध्यापक अरविंद वामन कुळकर्णी यांच्यासोबत ते जोशींना निपाणी येथे प्रथम भेटले. पहिल्या भेटीतच जोशी व त्यांचे विचार यांनी म्हात्रेच्या मनाची पुरती पकड घेतली. अलिबागची उत्तम नोकरी सोडून त्यांनी स्वतःहूनच पूर्णवेळ विनावेतन शेतकरी संघटनेचे काम करायचा निर्णय घेतला. जोशींना खरे तर ते तितकेसे पसंत नव्हते; पूर्णवेळ कार्यकर्त्यांची आर्थिक जबाबदारी अप्रत्यक्षपणे तरी आपल्यावर पडते व आजवर त्याबाबतीत आपल्याला फारसे यश मिळालेले नाही याच्या जाणिवेमुळे. 'माझा कुठचाही भार तुमच्यावर कधीच पडणार नाही' असे आश्वासन म्हात्रेनी दिले तेव्हाच जोशींचा विरोध मावळला. शेवटपर्यंत म्हात्रेनी ते आश्वासन पाळले. शरद जोशींनी चाकण येथे सुरु केलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्यपद त्यांनी काही काळ नाइलाजाने सांभाळले. खादीचे, घरी धुतलेले, बिनइस्त्रीचे साधे कपडे घालणारे, किरकोळ चणीचे, चष्मा लावणारे म्हात्रे नेहमी गंभीर असतात, पण साहित्य व कलांचे ते भोक्ते आहेत; स्वतः उत्तम हार्मोनियम वाजवतात. आधुनिक तंत्रज्ञानाची त्यांना नितांत आवड आहे व त्यातले बरेच काही त्यांना जमतेही.

 'शेतकरी संघटक'ची धुरा त्यांनी सव्वीस वर्षे वाहिली; मधला अमर हबीब यांनी सांभाळलेला व नंतर श्रीकांत उमरीकर यांनी सांभाळलेला कार्यभार सोडला तर जवळजवळ सर्वच काळ. अंकाची अक्षरजुळणी (डीटीपी) करायला अमोघ आर्ट्सच्या हरीश घाटपांडे यांच्याकडे ते येत व त्यांच्याकडेच अंतर्नाद मासिकाच्या अक्षरजुळणीचे कामही होई. चाळीस

३८६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा