पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



गेल्या ऑलिंपिकमध्ये भारताची दुर्दशा झालेली आपण पाहिली. एरवीही भारतीय पुरुषांचे उच्चांक जागतिक महिलांच्या उच्चांकाच्या खालचे असतात. विद्या, कला, क्रीडा, नेतृत्व, वक्तृत्व या सगळ्याच क्षेत्रांत परिस्थिती अशी आहे, की आमची राष्ट्रीय शिखरे जगाच्या तुलनेत खुजी वारुळे दिसू लागावीत. मागासलेल्या देशात सारीच चणचण असली तरी महात्म्यांची वाण नसते. जन जितके अधःपतित, तितके त्यांचा उद्धार करण्याचा डौल मिरवणारे 'थोर' लोक अधिक संख्येने उपलब्ध. त्यांचा मानही मोठा. सारा देश दैन्यावस्थेतला, पण दैवी गुणांच्या महात्म्यांचा उदो उदो प्रचंड! मग कुवतीची तरुण मुले आइनस्टाइन होऊ पाहत नाहीत, आयफेल होण्याची धडपड करत नाहीत, व्हॅन गॉग होऊ पाहत नाहीत, बिल गेट्स किंवा पीट सँग्रस होण्याचे स्वप्न बाळगत नाहीत. उलट असल्या सगळ्या कर्तबगारीचा 'ततः किम' म्हणून उपहास करतात. आणि काही शाब्दिक वाचाळपणा करण्याच्या कामाला राष्ट्रसेवा म्हणतात. आपणही तसेच करणार काय?

 पत्राला निरफराके यांनी उत्तरही दिले होते, पण मग हा पत्रव्यवहार जोशींनी पुढे वाढवला नाही. हा सारा पत्रसंवाद पुण्याच्या वंचित विकास संस्थेचे विलास चाफेकर यांनी प्रसिद्धही केला आहे व तो जोशींच्या एकूण विचारसरणीची, त्यांच्या वर्ल्डव्ह्यूची ओळख पटवणारा आहे.
 साधारण अशाच स्वरूपाची मते जोशींनी हेरंब कुलकर्णी हे शिक्षक-कार्यकर्ते त्यांना भेटायला आंबेठाण येथे गेले होते, त्यावेळी मांडले होते. त्यांच्या अमृतमहोत्सव स्मरणिकेत एका लेखात ते प्रकाशित झालेले आहेत (पृष्ठ ४१ ते ४५). कुलकर्णी यांनी त्या भेटीच्या साधारण बारा वर्षांपूर्वी, १९९७ मध्ये, पाचव्या वेतन आयोगाने दिलेल्या वेतनवाढीला विरोध केला होता व एक शिक्षक म्हणून स्वतःला मिळालेली ही पगारवाढ गैर समजून नाकारली होती. जोशींना त्याचे खूप कौतुक वाटले होते व आपणहून नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील कुलकर्णीच्या शाळेत खास जाऊन त्यांनी कुलकर्णी यांचा जाहीर सत्कारही केला होता. शिक्षणक्षेत्रातले एक कार्यकर्ते म्हणून आणि त्याविषयी लेखन करणारे म्हणून कुलकर्णी प्रसिद्धआहेत. मेधा पाटकरांपासून बाबा आमटेंपर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांविषयी त्यांना उत्कट आदरभाव आहे. आंबेठाणच्या भेटीत जोशी त्यांना म्हणाले होते,
 "तुम्हां तरुणांना समाजसेवेचे इतके वेड का? त्यापेक्षा उद्योजक होऊन पैसा कमवा व गरिबांना वाटा. गरिबांसाठी रोजगार निर्माण करावा, असे तुम्हाला का वाटत नाही? तात्त्विक वटवट करण्यात रस का वाटतो?"
 सगळ्यांनीच सामाजिक कार्यकर्ता बनायला हवे असे जोशींना कधीच वाटत नसे.
 बहुतेक सर्व जुन्या कार्यकर्त्यांबरोबर जोशींचे कौटुंबिक स्वरूपाचे संबंध होते. त्या अर्थाने शेतकरी संघटना हे एक कुटुंबच होते. शेतकरी आंदोलन ही एका अर्थाने जोशींच्या दृष्टीने 'सेकंड इनिंग' होती; एकूणऐंशी साली संघटनेला सुरुवात करताना ते स्वतःही ४४

३९२ -- ‌अंगारवाटा...‌ शोध शरद जोशींचा