पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

हालचाली, गुप्ततेने निरोप पाठवणे, प्रसंगी वेष पालटून आंदोलनाच्या ठरलेल्या जागी वेगवेगळ्या ठिकाणांहून सत्याग्रहींनी जमा होणे वगैरे गोष्टी अपरिहार्य असायच्या. 'शेतकऱ्यांचे रॉबिन हूड' असे काही जण त्याकाळात जोशींना म्हणत ते त्याचमुळे. पण हे प्रकार प्रदीर्घ काळ करत राहणे अवघडच होते. त्यांचे अनेक कार्यकर्तेही आता मध्यमवयीन होत चालले होते. शारीरिक धावपळीला मर्यादा होत्या.

 इतरही काही मर्यादा स्पष्ट होत गेल्या. आंदोलनाला शेतकऱ्यांकडून कितीही मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला, तरी सरकार मनात आणले तर किती क्रूरपणे कुठलेही आंदोलन दडपू शकते याचाही पुरेपूर अनुभव त्यांना आला होता. एव्हाना त्यांनी स्वतः निदान वीसबावीस वेळा तुरुंगवास भोगला होता आणि त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी निदान शे-सव्वाशे खटले दाखल केले गेले होते. आंदोलनात त्यांची व त्याहून अधिक म्हणजे सर्वच कार्यकर्त्यांची पुरती दमछाक झाली होती. पुन्हा बलदंड सरकारविरुद्ध केलेले कुठलेही संघर्षपूर्ण आंदोलन हे अंतिमतः यशस्वी होणार तरी कसे? २२ फेब्रुवारी १९८५ रोजी 'शेतकरी संघटक'मध्ये जोशींनी लिहिले होते,

फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी शेतकऱ्याच्या हातातील शस्त्रे आणि सैन्याच्या हातातीलशस्त्रे जवळजवळ सारखी होती; पण आज सैन्याच्या हातातील शस्त्रे आणि सामान्य माणसाच्या हातातला शस्त्रसामग्रीचा अभाव हे पाहिले, तर केवळ आंदोलनाच्या ताकदीवर सशस्त्र सैन्य हाती असलेल्या शासनाशी मकाबला करून जिंकता येईल अशी परिस्थिती नाही.

 गेल्या दहा-पंधरा वर्षांत परिस्थिती खूपच पालटली होती. आता संगणक-इंटरनेट आले होते. टीव्हीमळे माध्यमक्रांती झाली होती. ग्रामीण भागातही शिक्षणाचा प्रसार झाला होता. उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण यांच्या एकत्रित परिणामांमुळे जग पूर्वीपेक्षा खूप अधिक जवळ आले होते. समृद्धीची फळे, कितीही नाही म्हटले तरी, ग्रामीण भागातही झिरपू लागली होती. अहमदाबादच्या एका नामांकित संस्थेने केलेल्या पाहणीनुसार टूथपेस्ट, साबण, शांपू, रेडियो, टेलेव्हिजन, तयार कपडे, पादत्राणे, सौंदर्यप्रसाधने, शीतपेये वगैरेंच्या देशातील एकूण मागणींपैकी सुमारे ४० टक्के मागणी ही ग्रामीण भागातून होती; पूर्वी ती २० टक्केही नव्हती. ग्रामीण भागातील अनेक जण आता शेअर खरेदी-विक्रीतही नियमित भाग घेऊ लागले होते. परिस्थिती फार सुधारली होती अशातला भाग नव्हता, पोटाला चिमटा बसतच होता; पण अगदी कळवळून उठावे असा चिमटा बसेनासा झाला होता. शेतकरी आंदोलनामुळे शेतीमालाच्या किमतीत जी वाढ झाली व त्यामुळे ज्यांचा आर्थिक फायदा झाला, अशा अनेकांनी आंदोलनात रस घेणे पुढे कमी केले. कोणाची मुले नोकरीला लागली होती, कोणी कुठला जोड-व्यवसाय सुरू केला होता. बेकार तरुण जितक्या बेदरकारपणे दगड फेकेल, तितक्या बेदरकारपणे संसारात स्थिरावलेला माणूस ते करणार नाही. हा शेतकऱ्यांचा दोष नव्हता, ही एक स्वाभाविक मानवी प्रवृत्ती होती.


४१६ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा