पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



संघटनेच्या ताकदीवर त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामगारांची परिस्थिती भाग्यवंतांच्या पातळीवर आणली. आता राजकीय सत्तेला हात घालावा अशा प्रयत्नात डावे असतानाच, मळकी धोतरे नेसलेले लक्षावधी शेतकरी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी डाव्यांची सर्व समीकरणे विस्कटून टाकली. गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाण्याची डाव्यांची मक्तेदारी संपली. आर्थिकदृष्ट्या त्या कामगारापेक्षाही हीन अवस्थेत असलेला एक समाज प्रचंड संख्येने उठतो आहे, 'भाववाढ कमी करा' अशा कानाला सवय पडलेल्या घोषणेऐवजी भाववाढ मागतोआहे, ही अनपेक्षित घटना होती. संघटित कामगार आणि त्यांचे नेते यांना आपण 'डावे' राहिलो नसून उजवे' झालो आहोत, हा पालट पेलण्यासारखा नव्हता. अशा परिस्थितीत प्रस्थापितांची जी सहज प्रतिक्रिया असते तीच डाव्यांची झाली. उपहास, शिवीगाळ, इतिहासाने खोट्या ठरवलेल्या आपल्या श्रद्धांची वारंवार पुनरुक्ती,आरोपांच्या फैरी यांची झोड उठवण्यात आली. अशा आशेने, की ही नवी चळवळ मुळात खुडून टाकली, तर आपल्या डावेपणाला आव्हान निर्माण होणार नाही

(प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश - भाग दुसरा, शेतकरी प्रकाशन,अलिबाग, पहिली आवृत्ती, डिसेंबर १९८५, पृष्ठ २८)


  जोशी स्वतः पूर्णतः अर्थवादी होते. सुरुवातीच्या काळात सर्व शेतकरी आंदोलनच 'शेतीमालाला रास्त भाव' या एकमेव आर्थिक मागणीवर आधारित होते. पण तरी अर्थतज्ज्ञानी त्यांची कधी दखल घेतली नाही. अर्थतज्ज्ञांच्या बैठकीत वक्ता म्हणून तर सोडाच, पण केवळ एक सहभागी म्हणून यायचेही आमंत्रण जोशींना कधीच नसे. खरे म्हणजे शेतीचे अर्थशास्त्र सर्वप्रथम शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत मांडले ते जोशीनीच. पण विद्यापीठीय वर्तुळात, तेथील चर्चा-परिसंवादांत, अर्थशास्त्राशी संबंधित परिषदांत जोशींना काहीही स्थान कधी दिले गेले नाही.
  या साऱ्याची जाणीव जोशींनाही नक्कीच होती. ते एकदा सांगत होते, "आज इथले अर्थशास्त्रातले तथाकथित विद्वान प्राध्यापक मला अर्थशास्त्रज्ञ मानायलाही तयार नसतात! ते मला एक 'चळवळ्या' (activist)मानतात! जणू माझी मांडणी त्यांच्या विद्यार्थ्यांनी फारशी गांभीर्याने घ्यायचं कारण नाही! पण मी स्वित्झर्लंडला असताना हेच प्राध्यापक माझ्याशी संपर्क साधायचे आणि युएनची एखादी असाइनमेंट मी त्यांना मिळवून द्यावी म्हणून मस्का लावायचे!"
 टीकाकारांच्या संदर्भात सुरुवातीच्या काळातला एक प्रसंग नोंदवायला हवा. पुण्यातील टिळक स्मारक मंदिराच्या प्रेक्षागृहातला. दिवस होता रविवार, २० फेब्रुवारी १९८३. जोशींच्या भारतीय शेतीची पराधीनता (पृष्ठे ४०), शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (पृष्ठे १७०) आणि प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश (पृष्ठे ७५) या तीन संकलित पुस्तकांचे प्रकाशन त्यादिवशी प्रख्यात अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांच्या हस्ते झाले. जोशींची ही पहिलीच तीन पुस्तके. प्रकाशक होते शेतकरी प्रकाशन, अलिबाग.


सहकारी आणि टीकाकार . ३९७