पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्णन जोशी आपल्या घरात करत होते, त्यावेळी सामाजिक कामात बऱ्यापैकी सक्रिय असलेल्या त्यांच्या उच्चशिक्षित मेहुणीची प्रतिक्रिया होती, "अहो, ह्या गोष्टींचा तुम्हांला जितका त्रास वाटतो, तितका त्यांना नाही वाटत. त्यांना अशा सगळ्या अडचणींची सवयच असते!" मध्यमवर्गीयांची ही तशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया होती.
 पुण्यातल्या काही जणांशी जोशींचे व्यावसायिक संबंध आले. उदाहरणार्थ, त्यावेळी सीडॅकमध्ये असलेले व पुढे एमकेसीएल कंपनीमुळे ख्यातकीर्त झालेले विवेक सावंत. जोशींचा त्यांनी स्वित्झर्लंडहून आणलेला प्रिंटर बिघडला होता व तो फक्त सावंत दुरुस्त करू शकतील असे त्यांना कोणीतरी सांगितले. त्यानुसार तो दुरुस्त करून घेण्यासाठी जोशी सावंत यांच्याकडे गेले होते. सावंतांनी तो दुरुस्त करून दिलाही! जोशींना तांत्रिक गोष्टींत बराच रस असल्याने दोघांच्या गप्पाही खूप होत, पण पुढे दोघांच्या कार्यबाहुल्यामुळे फारसा संबंध राहिला नाही.
 आणखी एक व्यावसायिक संपर्क म्हणजे गोपाळ परांजपे. मुंबई-पुणे रस्त्यावर फुगेवाडीत, अल्फा लव्हाल कंपनीसमोर त्यांचे शारदा मोटर वर्क्स नावाचे गॅरेज होते. योगायोगाने गॅरेजसमोरच एकदा जोशींची जुनी अँबेसडर गाडी बंद पडली. गाडीत ते एकटेच होते. कशीबशी ढकलत त्यांनी ती गॅरेजमध्ये आणली. दुरुस्तीला एक-दोन तास लागणार होते व तो सगळा वेळ जोशी गॅरेजमध्येच थांबले. एकीकडे कामगार दुरुस्तीचे काम करत होते व दुसरीकडे जोशी व परांजपे गप्पा मारू लागले. शरद जोशींच्या थोरल्या भगिनी सिंधुताई यांचे यजमान वसंतराव व परांजपे हे मुंबईच्या व्हीजेटीआयमधले वर्गमित्र असल्याचे गप्पांच्या ओघात कळले! परांजपे सांगत होते,
 “पहिल्याच भेटीत मी जोशीसाहेबांकडे आकृष्ट झालो. खरं तर वयाने मी त्यांच्याहून मोठा, पण मी त्यांना कायम 'जोशीसाहेब' म्हणत आलो. संघटनेच्या अनेक सभांना नंतर मी हजर राहू लागलो. तीन वेळा रास्ता रोकोत भाग घेतला. २ ऑक्टोबर १९८९च्या बोटक्लबवरच्या मेळाव्यातही मी होतो. आंबेठाणच्या प्रशिक्षण वर्गांत मी इतिहास विषय शिकवायचो. संघटना उभारण्यासाठी जोशीसाहेबांनी जे कष्ट घेतले त्याला खरोखरच तोड नाही.”
 पण त्याचबरोबर परांजपे स्पष्टवक्तेदेखील होते. शेतकरी संघटनेवर खरपूस टीका करणारे त्यांचे एक विस्तृत पत्र शेतकरी संघटकच्या ६ जुलै २००९ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे.

 पुण्यातले एक तरुण स्नेही नितीन भोसले म्हणजे बळीराजा हे शेतीला वाहिलेले मासिक चालवणाऱ्या प्र. बा. भोसले यांचे चिरंजीव. फर्गसन कॉलेजात ते शिकत होते. वयात खूप अंतर असूनही जोशींशी त्यांची चांगली गट्टी झाली. खूपदा डेक्कनवर कॅफे डिलाइटमध्ये कॉफी पिता पिता त्यांच्या गप्पा रंगत. बहुतेकदा लीलाताईदेखील सोबत असत. फर्गसनमध्ये एकदा त्यांनी जोशींचे भाषणही ठेवले होते; भाषणाला चांगले पाच-सहाशे विद्यार्थी हजर होते. २५ नोव्हेंबर १९९४ रोजी जोशींनी पुण्यात कृषिअर्थतज्ज्ञांची एक परिषद भरवली होती. तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग तिला संबंध दिवस हजर होते. परिषदेत न बोलण्याच्या अटीवर' हजर राहण्याची अनुमती नितीननी मिळवली होती. नितीन म्हणतात, "तो दिवस माझा वाढदिवस असल्याचे कोणीतरी शरद जोशींना सांगितले. त्यांनी लगेच माझ्यासाठी केक

३७६अंगारवाटा... शोध शरद जोशींचा