पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मराठी साहित्यातील कोणती पुस्तके त्यांना विशेष आवडली होती किंवा कोणते लेखक त्यांना महत्त्वाचे वाटतात, ह्याविषयी जोशींनी कुठे लिहिल्याचे माझ्यातरी वाचनात आलेले नाही. कुठल्या लेखकाची त्यांनी कधी भलावण केल्याचेही मी ऐकलेले नाही. भालेराव किंवा आणखी एखाददुसऱ्यांचे त्यांनी केलेले कौतुक हा अपवाद म्हणता येईल. इतर कुठल्या मराठी पुस्तकांविषयी किंवा लेखकांविषयी त्यांनी कधीच का लिहिले नाही हा एक प्रश्नच आहे. एकूणच मराठी साहित्य व साहित्याविषयी त्यांचे मत फारसे चांगले नसावे.
 याउलट इंग्रजी साहित्याविषयी त्यांनी बरेच लिहिले आहे. सॉमरसेट मॉम हा त्यांचा अतिशय आवडता लेखक. त्याचा तुच्छतावाद (सिनिसिझम) त्यांच्या स्वतःच्या वृत्तीशी मिळताजुळता होता, हे त्याचे एक कारण असू शकेल. त्याच्या अनेक कथांचे संदर्भ त्यांच्य लेखनातून आढळतात. 'ज्याला कोणाला लेखक बनायचे आहे, त्याने मॉमच्या निदान सहातरी कथा आधी वाचाव्यात अशी मी शिफारस करेन' असे त्यांनी लिहिले आहे. मॉमच्या साहित्यातील संदर्भ जोशींच्या भाषणांत आणि लेखनात अनेकदा आले आहेत. 'त्याचा सिनिसिझम (तुच्छतावाद) मला खूप आवडतो, असेही ते म्हणाले होते. इतरांवरील जोशींच्या टीकेतही कधीकधी हा सिनिसिझम जाणवतो.
 पण मॉमचा तो सुप्रसिद्ध सिनिसिझम आपल्याला लोकप्रियता मिळाल, पण आपल्याला समीक्षकांनी कधीच श्रेष्ठ मानले नाही, या डंखातून तर आला नव्हता? आणि कुठल्याही निर्मितीसाठी स्वप्ने आवश्यक नाहीत का? केवळ सिनिसिझममधून कधी निर्मिती होऊ शकेल का? असले विचार जोशींच्या मनात कधी आले होते का हा प्रश्न पडतो.
 पी. जी. वुडहाउस हा विनोदी लेखकही त्यांना फार आवडायचा. त्यांच्या पलंगाशेजारी वुडहाउसचे एखादे पुस्तक कायम ठेवलेले असे. 'वुडहाउसमुळे माझे ब्लडप्रेशर नॉर्मल राहते, असे ते एकदा म्हणाले होते. त्याशिवाय त्यांना अनेक वैचारिक पुस्तकेदेखील प्रिय होती व तीही ते पुनःपुन्हा वाचत असत. रोज झोपण्यापूर्वी काही ना काही वाचायचा त्यांचा प्रघात होता व त्यांच्या उशाशी नेहमीच काही पुस्तके ठेवलेली असत.
  जग बदलणारी पुस्तके या त्यांच्या पुस्तकात त्यांना खूप महत्त्वाच्या वाटणाऱ्या अशा वीसेक इंग्रजी पुस्तकांचा त्यांनी अल्पपरिचय करून दिला आहे. त्यात लायोनेल रॉबिन्सचे विद्यापीठांतून वर्षानुवर्षे पाठ्यपुस्तक म्हणून अभ्यासले जाणारे The Nature and Significance of Economic Science आणि जॉन मेनार्ड केन्सचे Economic Consequences of Peace, तसेच महात्मा फुलेंना प्रभावित करणाऱ्या थॉमस पेनचे Common Sense, चार्ल्स डार्विनचे उत्क्रांतिवादाची मांडणी करणारे' On the Origin of Species यांचा परिचय आहे. अ‍ॅडम स्मिथच्या वेल्थ ऑफ नेशन्स ह्या विख्यात पुस्तकाचे त्यांना खूप अप्रूप होते व मुक्त अर्थव्यवस्थेचा पाया म्हणता येईल अशी त्यातील विचारसरणी त्यांना पूर्ण पटणारी होती; पण त्याचबरोबर The theory of moral sentiments हे त्याचे तुलनेने कमी परिचित असलेले पुस्तकही त्यांना महत्त्वाचे वाटे व त्या


                                             साहित्य आणि विचार - ४४१