पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



परिणाम म्हणून शेतकरी संघटनेच्या धोरणात काही बदल घडायची वेळ केव्हाच निघून गेली होती.

 जोशींना लाखो शेतकऱ्यांनी अलोट प्रेम दिले, पण अभिजनवर्गातील अनेक जण मात्र कायम त्यांच्या विरोधात राहिले. संघटनेतून बाहेर पडलेले काही साथी, राजकारणी, डावे विचारवंत, अर्थशास्त्री वगैरेंच्या टीकेबद्दल चौदाव्या प्रकरणात लिहिलेच आहे; पण त्याव्यतिरिक्त असे काही समाजघटक होते का ज्यांचा विरोध काहीसा गैरसमजातून निर्माण झाला होता व थोडे प्रयत्न करून जोशी तो टाळू शकले असते?
 असा एक महत्त्वाचा समाजघटक म्हणजे स्वयंसेवी संस्था किंवा ज्यांना एनजीओ म्हटले जाते अशा संस्था. पत्रकारांमध्ये व एकूणच समाजात या स्वयंसेवी संस्थांबद्दल बरीच सदभावना होती. जोशींनी स्वयंसेवी संस्थांवर सतत तोफ डागल्यामुळे तो मोठा प्रभावशाली घटक त्यांच्या कायम विरोधात गेला.
 समाजसेवी कार्यकर्त्यांवरील जोशींची टीका अत्यंत धारदार आहे; कार्यकर्त्यांच्या साऱ्या आयुष्यभराच्या श्रद्धा हलवून टाकणारी आहे.
 त्यांनी जेव्हा शेतीला सुरुवात केली त्यावेळी महाराष्ट्रात व एकूणच भारतात एनजीओ मोठ्या प्रमाणावर सुरू होत होत्या. त्यांना अनेकदा विदेशी फंडिंग असायचे, तसेच युनायटेड नेशन्सचे जोरदार पाठबळही असायचे. विकासकामासाठी उपलब्ध केला जाणारा बराचसा सरकारी निधी त्यांच्यामार्फत वितरित व्हायचा. स्वतः युनायटेड नेशन्सचे काम करत असताना जोशींनी या साऱ्यातील भ्रष्टाचार अगदी जवळून पाहिला होता. त्याकाळात बऱ्याच स्वयंसेवी संस्थांत अपप्रवृत्ती शिरल्या होत्या, त्यांच्यावर टीका करणे गैर नव्हते; पण साऱ्याच स्वयंसेवी क्षेत्राला इतके मुळापासून तोडायचे जोशींना खरे तर काहीच कारण नव्हते.
.  रेड क्रॉससारख्या स्वयंसेवी संस्थांबद्दल जोशींना आदर होता; निपाणी आंदोलनानंतर त्यांनी रेड क्रॉसची मदतही मागितली होती.
 शीख गुरुद्वारांमधील लंगरचे त्यांना कौतुक होते. लंगरमध्ये कोणाही गरजू व्यक्तीची जेवण्याची व राहण्याची सोय काही दिवसांकरितातरी नक्की होते. त्या कालावधीत त्याला स्वतःचा रस्ता शोधायची सवड मिळते. म्हणूनच पंजाबमध्ये भिकारी दिसत नाहीत; उलट छोटे छोटे व्यावसायिक मात्र खेडोपाडी दिसतात. 'दारिद्र्यनिर्मुर्लनाचा या देशातील यशस्वी झालेला एकमेव कार्यक्रम म्हणजे शिखांचे लंगर,' असे त्यांनी म्हटले आहे.
 अनेक स्वयंसेवी कार्यकर्त्यांबद्दलही त्यांना व्यक्तिशः आदर होता. स्वतःचा उत्तम चालणारा इंजिनिअरींग व्यवसाय सोडून पाणीप्रश्नावर काम करणारे विलासराव साळुखे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडून म्हैसाळला स्वतःच्या बळावर ग्रामसुधार प्रकल्प उभारणारे मधुकर देवल. राजकारणात शिखरावर असतानाच त्यातून निवृत्त होऊन चित्रकूटला ग्रामोद्धाराचे काम उभारणारे नानाजी देशमुख. महिला कामगारांची आणि फेरीवाल्यांची Self Employed Women's Association (SEWA) ही प्रबळ संघटना उभारणाऱ्या


४७४ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा