पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकृती ठीक नसतानाही व्यासपीठावर चार तास एकाच प्लास्टिकच्या खुर्चीत जोशी बसून होते. अखंड चाललेली भाषणे, भोवतालची प्रचंड गजबज, असह्य उकाडा हे सारे तसे त्रासदायकच वाटत होते; पण जोशींच्या चेहऱ्यावर त्रासाची बारीकशी छटाही नव्हती. वाटले, ऐन उमेदीत ह्या माणसाचा झपाटा काय जबरदस्त असला पाहिजे! आणि दोन दिवस त्यांना भेटणाऱ्यांची अखंड रांग. आमदार शंकर धोंडगेंपासून लांबन लांबून आलेल्या अगदी सामान्य शेतकरी बंध आणि भगिनींपर्यंत. पुन्हा तेच प्रेम. शेतकरी आंदोलनाचा बहर ओसरून अनेक वर्षे लोटल्यानंतरही टिकून राहिलेले! ऐन वसंतात त्या प्रेमाचा आविष्कार किती उत्कट असला पाहिजे! वाटले, 'शेतकऱ्यांचे पंचप्राण' असे जोशींचे वर्णन केले जायचे ते यथार्थच होते.
 २५ नोव्हेंबर २०१४ ही यशवंतराव चव्हाण यांची तिसावी पुण्यतिथी. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा एक लाखाचा मानाचा पुरस्कार प्रतिष्ठानच्या मुंबईतील सभागृहात प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात जोशींना दिला गेला. कार्यक्रमाला जोशी अर्धा-एक तास उशिरा पोचले, पण आले हेच विशेष. त्यावेळी ते फारच थकलेले दिसले. जोशींचा हा जवळजवळ शेवटचाच मोठा असा कार्यक्रम. पंजाबबद्दलच्या प्रकरणात सुरुवातीलाच त्याचा उल्लेख झालेला आहे.
 आयुष्यात भेटलेल्या व्यक्तींपैकी कोणाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला या विषयावर आम्ही काही वेळा बोललो. एक लेखक म्हणून, संपादक म्हणून आणि माजी केंद्रीय मंत्री म्हणून अरुण शौरी प्रख्यात होते. साहजिकच त्यांचा विषय निघाला होता. "मी आणि शौरी साधारण एकाच सुमारास भारतात परतलो," बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा जोशी सांगत होते. "तो वर्ल्ड बँकेतून आणि मी यूएनमधून. दिल्लीत आमची कधीकधी गाठ पडते. तेव्हा या तीस वर्षांत आपण काय कमावले ह्या विषयावर चर्चा होते." त्या चर्चेचा निष्कर्ष जोशींनी सांगितला नाही. विषय बदलला. या मुद्द्यावर खोलात जाऊन अधिक काही विचारणे मलाही अप्रशस्त वाटले. दिल्लीत राजीव गांधींच्या विरोधात एखादी आघाडी स्थापन करायच्या उद्देशाने त्यांनी बोलावलेल्या एका बैठकीत त्यांनी शौरींना 'तुम्ही देशाचे पंतप्रधान होऊ शकता' असे सुचवल्याचे आठवत होते. त्या बैठकीचा संदर्भ मागे आला आहे. संघटनेने आयोजित केलेल्या दोन-तीन परिसंवादांतही शौरींचा सहभाग होता. पुढे पुण्याजवळ लवासा येथेच ते राहायलाही आले होते.
 शौरी हे केवळ एक उदाहरण म्हणून लिहिले; पण दिल्लीइतकी नसली तरी मुंबई-पुण्यातही राष्ट्रीय पातळीवर नाव असलेली बरीच मंडळी होती. परंतु पुण्यात आल्यावर व बऱ्यापैकी निवांत वेळ उपलब्ध असतानाही त्यांच्यापैकी कोणाशी मैत्री जोडायचा जोशींनी प्रयत्न केल्याचे जाणवत नाही. फारसे कोणी भेटायला आलेले त्यांना आवडतही नसे आणि तसे कोणी येतही नसत. भेटायला येणाऱ्यांमध्ये संघटनेतील जुने साथीदारच प्रामुख्याने असत. नाही म्हणायला लिबरल ग्रुपच्या लोकांशी त्यांचा संपर्क असायचा. Down to Earth हे त्यांचे हिंदुच्या 'बिझिनेस लाइन'मधील सदरलेखनाचे हार्ड बाउंड संकलन याच लोकांनी


४७० - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा