पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 जोशींच्या कामाचे मूल्यमापन करताना अंजली कीर्तने लिहितात,

समाजवादाला कडवा विरोध करणारा हा विचारवंत! तो समाजाच्या पचनी पडला नाही. अनुल्लेखानं मारणं, कार्याची दखल न घेणं हे एखाद्याला नेस्तनाबूत करायचं, अवमानित करायचं, अगदी सुलभ आणि प्रभावी शस्त्र असतं. जोशींना ज्यांचा वैचारिक विरोध होता त्यांनी हे धारदार शस्त्र त्यांच्यावर मुबलक चालवलं. जोशींच्या कार्याला विरोध केला असता, तर विरोधाला तेजस्वी प्रतिकार करून जोशींनी विरोध परतवला असता. त्यापेक्षा सोपा मार्ग म्हणजे कार्याची दखल न घेणं, दुर्लक्ष करणं. प्रसिद्धीचे मार्ग बंद झाल्यानं जोशी ग्रामीण भागाच्या वर्तुळाबाहेर, शहरी संस्कृतीत फारसे पोहोचले नाहीत. उलट कांद्याचे भाव उगाचच वाढवणारा माणूस म्हणून शहरी माणसानं त्यांचा रागच केला.


 छात्र युवा संघर्ष वाहिनीचे एकेकाळचे पूर्णवेळ कार्यकर्ते व आपल्या मार्मिक विश्लेषणात्मक लेखनाकरिता प्रसिद्ध असलेले यवतमाळचे सुधाकर जाधव 'शांत वादळाचा अंत' या आपल्या मृत्युलेखात म्हणतात,

शरद जोशींचे वेगळेपण कोणते असेल, तर ते म्हणजे त्यांनी समाजवादी विचाराच्या कैदेतून विचारकांची आणि सामान्य जनांची सुटका करण्याचा शतकातील सर्वांत मोठा प्रयत्न आणि प्रयोग केला.


 जे व्यक्तिशः जोशींच्या संपर्कात आले त्यांना त्यांची वास्तविक बाजू कळली, पण बहुसंख्य विचारवंत केवळ माध्यमांतून त्यांच्याविषयी जे प्रसृत होत गेले त्यावरच विश्वास ठेवत गेले व अशा मंडळींच्या मनात जोशींबद्दलचे गैरसमज कायम राहिले.
 यातले अनेक गैरसमज जोशींना प्रयत्नाने दूर करता आलेही असते; पण आश्चर्य म्हणजे त्यांनी त्यादृष्टीने फारसे काही प्रयत्न केल्याचे दिसत नाही; एकूणच प्रतिमानिर्मिती हा प्रकार त्यांनी कायम टाळला. हीदेखील 'प्रत्यक्षाहुनि प्रतिमा अद्भुत' असलेल्या आजच्या जगात चूकच म्हणावी लागेल. टीकेकडे दुर्लक्ष करत राहायचे धोरण त्यांना महाग पडले असेच मागे वळून पाहताना वाटते.

 सिंहावलोकन करताना जोशींचे प्रसारमाध्यमांशी (मिडियाशी) जे नाते होते, त्याबद्दलचे काही विचारही मनात येतात.
पूर्वी जयप्रकाश नारायण व बाबा आमटे यांना किंवा अलीकडे अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांना मिडियाने जसे उचलून धरले, तसे जोशींच्या बाबतीत कधीच घडले नाही. कारण कदाचित मिडिया हाही शेवटी 'इंडिया'चाच भाग होता, 'भारताचा' भाग नव्हता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यामुळे माध्यमांमध्ये फारसे स्थानच नव्हते; तसे ते आजही नाही आहे. पण आपली प्रतिमा व्यापक समाजमनावर ठसवायची असेल, तर त्यासाठी आजच्याप्रमाणे


४७८ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा