पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उभारण्याची धडपडही त्यांनी केली. जेपींचे एक निकटचे समाजवादी सहकारी सुरेंद्र मोहन ह्यात त्यांच्याबरोबर होते व दिल्लीत त्यांच्या बैठका होत असत. त्यावेळी दिल्लीत असलेल्या अनंत बागाईतकर यांनी लिहिलेल्या एका आठवणीनुसार (साप्ताहिक सकाळ, २६ डिसेंबर २०१५) त्याच दरम्यान एकदा सुरेंद्र मोहन त्यांना मधु लिमये यांच्या घरी घेऊन गेले होते. सोबत बागाईतकरदेखील होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत कोणतीही चळवळ ही कायम स्वरूपात चळवळ म्हणून किंवा आंदोलन म्हणून टिकू शकत नाही; केव्हा ना केव्हा तिला राजकीय रूप द्यावेच लागते, संसदेत यावेच लागते; तुम्हीही केवळ 'चळवळ एके चळवळ' असे करत बसू नका, असा सल्ला लिमयेंनी त्यांना दिला. लिमये हे एक अतिशय व्यासंगी खासदार म्हणून प्रख्यात होते. सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदर होता. जोशी यांनाही. केवळ त्यांच्या सल्ल्याचा परिणाम म्हणून जोशींनी आपली भूमिका बदलली व राजकारणात शिरायचा निर्णय घेतला असे म्हणणे धाष्ट्ाचे होईल, त्यासाठी मागे लिहिल्याप्रमाणे इतरही कारणे होतीच; स्वतःला जे पटेल तेच करायचे हाही जोशींचा स्वभाव होताच; पण लिमयेंच्या सल्ल्यानंतर ही नवी वाट त्यांना अधिकच स्वीकारार्ह वाटू लागली असेल असे म्हणता येईल.
 कोणीतरी राजीव यांच्या विरोधात उभे राहायलाच हवे, नाहीतर त्यांचा एकछत्री अंमल सुरू होईल आणि पुढची पाच वर्षे तो कायम राहील ह्याची जोशींना भीती होती. सरकार जर प्रचंड बहुमताने निवडून आलेले असेल, तर अशा सरकारविरुद्ध शेतकरी आंदोलनच काय, कुठलेच अन्य आंदोलन उभे करणे फारच अवघड होणार होते. देशातील लोकशाही टिकावी म्हणूनही सत्ताधारी पक्ष व विरोधी पक्ष यांच्यात एक राजकीय समतोल राखला जाणे आवश्यक आहे असेही त्यांना वाटत होते. पण राजीवलाटेविरुद्ध उभे राहायची कुठल्याच राजकीय पक्षाची त्यावेळी तयारी नव्हती. अशा परिस्थितीत आपण हे आव्हान स्वीकारले पाहिजे असे त्यांनी ठरवले.


 गुरुवार, २२ नोव्हेंबर १९८४ रोजी पुणे येथील पुणे विद्यार्थी गृहाच्या सभागृहात शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची एक विशेष तातडीची बैठक झाली. संघटनेच्या राजकारणप्रवेशावर ह्याच बैठकीत शिक्कामोर्तब झाले व त्यामुळे ही बैठक ऐतिहासिक महत्त्वाची ठरली. बैठकीला कार्यकारिणीचे सोळापैकी चौदा सदस्य व सर्व जिल्हासंपर्क कार्यकर्ते आपापल्या सहकारी तालुका कार्यकर्त्यांसह हजर होते. रामचंद्रबापू पाटील अध्यक्षस्थानी होते. 'येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण निश्चित राजकीय भूमिका घ्यावी व काँग्रेस(आय)ला प्रखर विरोध करावा' अशी भूमिका जोशींनी सुरुवातीला मांडली. त्यानंतर चर्चा सुरू झाली. उपस्थित असलेल्या सुमारे तीनशे कार्यकर्त्यांपैकी बहुतेकांचा अशा उघड राजकीय भूमिकेला विरोध होता. या भूमिकेमुळे आपली राजकारणविरहितता संपुष्टात येईल, शेतकऱ्यांच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाला तडा जाईल व म्हणून तशी राजकीय भूमिका घेण्याऐवजी आपण एखादे प्रखर शेतकरी आंदोलन उभारावे असे मत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. आठ

३२०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा