पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पहिलाच तुरुंगवास. त्यांचे मनोधैर्य कायम राहावे म्हणून रोज एकदातरी जोशी प्रत्येकीशी बोलत, तिची चौकशी करत, तिला धीर देत. त्यावेळी शैलाताईंचा अगदी दुपट्यात असलेला लहान मुलगाही त्यांच्याबरोबर होता. जोशी त्याच्याशीही बोलायचे, त्याला तुरुंगात उपलब्ध होऊ शकेल असा काही छोटा खाऊ द्यायचे. सामान्य कार्यकर्त्याचीही ते किती काळजी घेतात ते पाहून शैलाताईंचे मन भरून यायचे. तुरुंगातून बाहेर आल्यावर शैलाताई चळवळीत सक्रिय सहभाग घेऊ लागल्या. एकूण तीन वेळा त्यांनी तुरुंगवास भोगला. पुढे जेव्हा जेव्हा जोशी विदर्भात आर्वीमार्गे कुठे जात असतील, तेव्हा आवर्जून शैलाताईंच्या घरी थोडावेळतरी थांबत.
 शैलाताईंनी आंदोलनात अनेक दिव्यांना तोंड दिले. आयुष्यात प्रथमच पंजाबी ड्रेस घालून रेल्वे रुळांवर स्वतःला झोकून देण्यापासून ते तुरुंगात जाताना नियमाप्रमाणे गळ्यातले मंगळसूत्र काढून ठेवण्यापर्यंत. पुढे त्या शेतकरी महिला आघाडीच्या अध्यक्षही झाल्या. ८, ९ व १० नोव्हेंबर २००१ रोजी भरलेल्या रावेरी अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते. अधिवेशनाच्या प्रचारासाठी सतत तीन महिने त्या घराबाहेर होत्या. अधिवेशनानंतर सर्व उपस्थित वर्ध्याला गेले व तेथे त्यांनी रेल रोको केले.
 त्यानंतर १ ते ७ डिसेंबर २००१ या दरम्यान सर्वजण वर्ध्याहून नागपूरला पदयात्रेने गेले 'धडक मोर्चा' म्हणून. विशेष म्हणजे त्या वयातही हे सर्व अंतर शरद जोशी इतर सर्वांबरोबर पायी चालले. शेतकरी आंदोलनातील ती एक संस्मरणीय घटना होती. रावेरी येथील सीतामंदिराच्या उभारणीतही शैलाताईंचा मोठा सहभाग होता. मंदिराचे बांधकाम नांदेडचे रमेश पाटील हंगरगेकर यांनी पार पाडले. मंदिरामागचा विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शैलाताई सगळा विदर्भ फिरल्या. मंदिराचे लोकार्पण होणार त्या २ ऑक्टोबर २०१० रोजी अयोध्याप्रकरणीच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे प्रचंड तणाव होता; स्वतः सोनिया गांधी यांची सेवाग्राम येथे ठरलेली सभाही रद्द करावी लागली होती. लोकार्पणालातरी किती लोक येतील याविषयी शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांच्या मनात चांगलीच धाकधूक होती. पण प्रत्यक्षात समारंभाला रावेरीसारख्या आडबाजूला असलेल्या छोट्या गावीही २५,००० लोक जमले होते. शैलाताईंनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे हे फळ होते.

 चेतना गाला सिन्हा यांनी इकॉनॉमिक्स विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून एमकॉम केले. एकेकाळी त्या मुंबईत छात्र युवा संघर्ष वाहिनीत होत्या. संघर्ष वाहिनीच्या बऱ्याच कार्यकर्त्यांचा त्यावेळी प्रस्तुत लेखकाशी संबंध आला होता. लेखनाच्या निमित्ताने इतक्या वर्षांनी त्यांना पुन्हा भेटणे हा आनंददायी अनुभव होता. त्यांच्या काही आठवणी पुढीलप्रमाणे :

 "संघर्ष वाहिनीतील एक कार्यकर्ता विजय सिन्हा यांच्याशी माझे लग्न झाले व मी आमच्या गावी जाऊन घरची शेती करायला लागले. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील म्हसवड हे आमचे गाव, आम्ही प्रथम कांदा लावला होता व कांद्याचे बी खरेदी करण्यापासूनच्या सगळ्या खर्चाची मी काळजीपूर्वक नोंद ठेवत होते. कांदा विकायलाही मीच

किसानांच्या बाया आम्ही...३०५