पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

मांडणी मुळात मायकेल लिप्टन याने केलेली आहे व ती स्वतःचीच आहे असे चित्र जोशींनी जाणूनबुजूनच प्रसृत केले' असे म्हटले आहे. अन्य कोणीही त्यापूर्वी किंवा त्यानंतरही हा मुद्दा मांडलेला नाही; त्यावर कधी काही चर्चा झाल्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही. त्याबद्दल काय म्हणता येईल?
 प्रस्तुत लेखकाला तो मुद्दा ग्राह्य वाटत नाही. याचे एक कारण म्हणजे अशी कुठलीही व्यापक विचारसरणी ही अनेकांच्या चिंतनातून जन्म घेत असते; जग फार मोठे आहे आणि आपण करतो तसा विचार करणारी दुसरी कुठलीही व्यक्ती भूतकाळात नव्हती वा आज नाही, असे समजणेच अवास्तव आहे.
 लिप्टन यांचे उपरोक्त पुस्तक १९७७मधले आहे, पण त्याच्याही खूप पूर्वी कार्ल मार्क्सपासून इतर अनेकांनी 'टाउन आणि कंट्री' यांच्यातील विषमतेचा मुद्दा मांडला आहे आणि 'अर्बन बायस' वगैरे पारिभाषिक शब्द त्यांनी लिप्टनसारखे वापरले नसतील, पण राज्यकर्त्यांच्या धोरणाचा एक परिपाक म्हणून ती विषमता निर्माण झाली असणार हे उघड आहे. राजवाडा आणि झोपडी किंवा हिरवीगार शेती' आणि 'धुराड्यांतून प्रदूषण ओकत चाललेल्या गिरण्या' यांच्यातील अंतर्विरोध हा साहित्यिकांच्या प्रतिभेला तर कायम आव्हान देत आला आहे. The Grapes of Wrath किंवा How Green was my valley यांसारख्या अगदी १९४०च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या, गाजलेल्या, चित्रपटांत रूपांतरित झालेल्या कादंबऱ्यांत हेच ग्रामीण भागाचे उजाडीकरण चित्रित झाले आहे व तोही विशिष्ट धोरणाचाच भाग आहे हे उघड आहे.
  हा विरोध तसा खूप जुनाच, अगदी औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली तेव्हापासूनच चर्चेचा विषय आहे. इंग्लंडच्या संदर्भात हाच भेद 'टाउन आणि काउंटी' या स्वरूपात मांडला गेला आहे. (काउंटी म्हणजे परगणा व टाउन म्हणजे प्रशासनाच्या दृष्टीने प्रमुख असलेले त्यातले गाव, या अर्थाने.) औद्योगिकीकरणासाठी आवश्यक ते भांडवल हे शेतीतूनच घ्यायला हवे, म्हणजेच खेड्यांतील पैसा शहरांकडे वळवायला हवा, हे जुन्या काळातील साम्यवादी विचारवंत प्रिओब्रेझन्स्की आणि रोझा लुक्झेम्बर्ग यांनीही यासंदर्भात लिहिले आहे व 'जग बदलणारी पुस्तके' या आपल्या पुस्तकात जोशींनी त्याचा विस्तृत आढावाही घेतला आहे. (प्रश्न रशियातील विकासाचा प्रचंड अनुशेष अल्पावधीत भरून काढण्यासाठी कशाला प्राधान्य द्यायचे हा होता आणि त्या काळानुरूप व स्थानिक परिस्थितीनुरूप स्टालिनने शेतीपेक्षा उद्योगांना प्राधान्य दिले - ते चूक किंवा बरोबर हे विशिष्ट स्थळ-काळाच्या संदर्भचौकटीतच तपासावे लागेल. असो.) रॉबर्ट बेट्स (Robert Bates) यांनीही या 'अर्बन बायस'बद्दल विस्ताराने लिहिले आहे. नोबेल लॉरेट व जगप्रसिद्ध स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ गुणार म्युरडाल (Gunnar Myrdal) यांनीही अशा स्वरूपाची मांडणी Asian Drama - an enquiry into the poverty of nations या आपल्या पुस्तकात केली आहे व जगदीश भगवती यांनीही 'गुणार म्युरडाल व अर्बन बायस' या विषयावर लिहिले आहे. इंटरनेटवर हे सारे उपलब्ध आहे. प्रत्येकाची शब्दरचना वेगळी असेल, पण आशयसूत्रातील समान धागा

सहकारी आणि टीकाकार - ४०१