पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमच्या जास्त लोकांची सोय असली पाहिजे; तुम्ही कार्यक्षम असला, तरी शेवटी तुम्हांला राज्य आमचे चालवायचे आहे आणि त्यासाठी तुम्ही आमच्या काही लोकांना घेतले पाहिजे. या एतद्देशीय लोकांचा हेतू काही राज्य चांगले चालवावे आणि देशाचे भले व्हावे, असा नव्हता; आपल्यातल्या काही लोकांना उड्या मारून, सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने बसता यावे एवढाच हेतू त्यामागे होता. आजसुद्धा राखीव जागांचे भांडवल करून, आरडाओरडा करणाऱ्यांचा हेतू यापेक्षा काही वेगळा असू शकत नाही.

(पोशिंद्यांची लोकशाही, पृष्ठ १६८-९)

 उजव्या पक्षांना राग येईल असे लेख त्यांनी अनेकदा लिहिले. जातीयवादाचा भस्मासुर हे त्यांचे छोटे पुस्तक कुठच्याही प्रकारच्या संकुचिततेच्या विरोधात उदारमतवादी भूमिका मांडणारे आहे. पुढे भाजपचे समर्थन मिळवून जोशी राज्यसभेवर गेले, पण तरी त्यानंतरही कडव्या हिंदुत्वनिष्ठांना त्यांनी सतत विरोधच केला. उदाहरणार्थ, भाजपच्या समर्थकांनी उठवलेल्या गोवंशहत्याबंदीच्या मुद्द्यावर जोशींनी सातत्याने धारदार टीका केली. 'भाकड गाय पोसत राहणे कोणाही शेतकऱ्याला परवडणारे नाही; गायीला अखेरपर्यंत खाऊ घालायची जबाबदारी त्या शेतकऱ्यालाच खाऊन टाकेल. अशा अव्यवहार्य कायद्यामुळे शेतकरी गोपालन करणेच बंद करतील; एका अर्थाने ही गोवंशहत्याच ठरेल, असे त्यांचे मत होते. त्याचबरोबर 'वशिंड असलेल्या तथाकथित देशी गाईंचे दूध विविध गुणांनी परिपूर्ण, पण परदेशी हायब्रीड गाईंचे दूध मात्र प्रकृतीला हानिकारक' ह्या मतालाही त्यांनी कायम विरोध केला. 'अशा वशिंड असलेल्या गाई फक्त दक्षिण आशियात व एकेकाळी दक्षिण आशियाला जोडून असलेल्या पूर्व आफ्रिकेत आढळतात, तर जर्सी गाई युरोपात आढळतात आणि त्या जर्सी गाईंचे दुध पिणारे समाज अधिक विकसित आहेत, तर देशी गाईंचे दुध पिणारे भारतीय वा बांगलादेशी वा पूर्व आफ्रिकेतील समाज अविकसित आहेत' ह्या वास्तवाकडेही ते लक्ष वेधतात.
 उजव्या पक्षांप्रमाणे डाव्या पक्षांनाही न आवडणारी पावले त्यांनी अनेकदा उचलली. उदाहरणार्थ, बँक संपला त्यांनी एका आगळ्या प्रकारे केलेला विरोध.

 संघटित नोकरदार आपल्या प्रबळ संघटनांच्या जोरावर समाजाला वेठीला धरतात आणि आपल्या मागण्या मंजूर करून घेतात आणि तरीही शेतकऱ्यांना चिरडणारे सरकार त्यांच्यापुढे मात्र नेहमीच नांगी टाकते याची जोशींना चीड होती. ११ मे १९९४ रोजी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. जोशींचे खाते चाकणच्या बँक ऑफ इंडियामध्ये होते. त्या दिवशी १०,००० रुपये काढायला जोशी बँकेत गेले. पण 'बँक कर्मचारी हजर नसल्याने आपण पैसे देऊ शकत नाही,' असे शाखाप्रमुखांनी सांगितले. जोशींनी ते त्यांच्याकडून लिहून घेतले व पुणे जिल्हा ग्राहक मंचाकडे आपल्या झालेल्या गैरसोयीपोटी एक लाख रुपये नुकसानभरपाईचा दावा दाखल केला. पुढे ग्राहक मंचाने जोशींच्या बाजूने निकाल दिला व त्यांना नुकसानभरपाई

३४०अंगारवाटा... शोध शरद जोशींचा