पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 एखाद्याचे व्यक्तिगत जीवन आणि त्याचे व्यावसायिक जीवन हे दोन्ही कप्पे तसे स्वतंत्र असतात हे मान्य केले, तरी व्यक्तिगत आणि व्यावसायिक हे दोन्ही घटक तसे अपरिहार्यपणे एकमेकांवर परिणाम करतच असतात. शरद जोशींच्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वात त्यांच्या व्यावसायिक कामात बाधा घालेल असे काही होते का?
 विचारार्थ एक उदाहरण घेता येईल. आपल्या त्या वेळच्या अधिकृत राजकारणप्रवेशाचे समर्थन करताना जोशींनी १९८४ साली लिहिले होते,

संघटनेच्या निर्णयात काहीही पक्षीय संबंध नाही. शेतकऱ्याच्या दृष्टीने सर्व राजकारणी सारखेच चोर आहेत. पण आज छातीवर बसलेल्या चोराला दुसऱ्या चोराच्या मदतीने दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. दुसरा चोर छातीवर बसण्याआधी सावधपणे उठता येते का, ते पाहावयाचे आहे

.

(शेतकरी संघटक, १४ डिसेंबर १९८४)

  पण ह्या समर्थनातही एक गोम आहे हे बारकाईने बघताना जाणवते – ज्यांना त्यांनी पाठिंबा दिला, त्यांनाही जोशींनी चोरच ठरवले होते; फार तर छोटा चोर ठरवले होते; आणि ज्यांना त्यांनी समर्थन दिले त्यांना ही भूमिका खूप खटकणारी असणार हे उघड आहे. 'बाकी सगळेच चोर, पण मी मात्र साव' हा या भूमिकेत अनुस्यूत असलेला अहंकारही तसा फारसा लपून राहणारा नाही. हा अहंकार कदाचित आत्मविश्वासापोटीही आला असेल; पण ते काहीही असले तरी एकूण सर्वच राजकारण्यांमध्ये जोशी अप्रिय ठरले याचे एक मोठे कारण इथे आपल्याला जाणवते.
 यशवंतराव चव्हाण म्हणायचे ते बेरजेचे राजकारण जोशींना कधीच का खेळता आले नाही? चांगुलपणातूनही एक प्रकारचे औद्धत्य येत असेल का? संन्यस्ताचा अहंकार अधिकच दाहक असतो म्हणतात, तसे काही असेल का? तत्त्वांना मुरड घालणे मान्य नव्हते म्हणून असेल का?
 काहीतरी भव्यदिव्य, आणि मुख्य म्हणजे इतरांपेक्षा अगदी वेगळे असे करून दाखवायची, तशी काहीतरी सैद्धांतिक मांडणी करायची त्यांची लहानपणापासूनची तीव्र महत्त्वाकांक्षा होती. याबद्दल मागे लिहिलेलेच आहे. एका अर्थाने स्वतःचे कर्तृत्व निर्विवादपणे सिद्ध करायचाही हा प्रकार असू शकतो. इतरांना जराही न आवडणाऱ्या संस्कृतात त्यांनी इतकी रुची घेणे, पुन्हा नंतर ते सोडून कॉमर्सला जाणे, त्यातही पोद्दारऐवजी सिडनम कॉलेज निवडणे, सकृतदर्शनी कुठचेही व्यावहारिक कारण नसताना स्वित्झर्लंडमधले सगळे वैभव सोडून भारतात परतणे, पूर्वानुभवाचा विचार करून अन्य एखादी वाट निवडणे सहजशक्य असताना चक्क कोरडवाहू शेती सुरू करणे या सगळ्यामागेही ही वेगळेपणाची आस जाणवते. ही भावनाही कदाचित इतरांशी जुळवून घेण्याच्या आड येणारी असू शकेल.
 एक लक्षणीय उदाहरण म्हणजे विचारवंतांचे बुद्धिदारिद्रय हा त्यांचा लेख - ज्यात त्यांनी प्रथम नैतिक हास हे आपल्या अवनतीचे मुख्य कारण नाही' ही भूमिका मांडली. लोणावळा


४८४ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा