पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१२



राजकारणाच्या पटावर



 १९७९ मध्ये जेव्हा शेतकरी संघटनेच्या कामाला सुरुवात झाली, तेव्हा राजकारणापासून दूर राहण्याचा शरद जोशींचा निर्धार होता व तो त्यांनी सुरुवातीच्या सभांमध्ये स्पष्ट शब्दांत मांडलाही होता. सरकार कुठल्याही पक्षाचे आले तरी एकूण आर्थिक धोरण कायमच राहते, कारण ते बदलणे व त्यासाठी अपरिहार्यपणे अर्थव्यवस्थेची संपूर्ण रचना बदलणे, हे त्या रचनेत हितसंबंध गुंतलेले असल्याने अभिजनवर्गातील कोणालाच परवडणारे नाही, ह्याची कल्पना असल्यामुळे सर्वच पक्ष चोर' ही भूमिका जोशी सतत मांडत असत. त्या काळात ते शेतकऱ्यांना पटतही होते.
 शेतकऱ्यांच्या गरिबीचे, आणि म्हणून एकूण देशाच्या गरिबीचे, सर्वांत महत्त्वाचे कारण शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही हे आहे, ह्याविषयी त्यांची जेवढी खात्री होती, तेवढीच हा रास्त भाव न मिळण्याचे कारण सरकारने स्वीकारलेले विकासाचे विशिष्ट धोरण हे आहे ह्याविषयीदेखील त्यांची खात्री होती. हे धोरण समाजवादाच्या रशियन प्रयोगावर बेतलेले होते व उद्योगक्षेत्राला केंद्रीभूत मानणे व त्यासाठी शेतीमालाच्या किमती मुद्दाम कमी ठेवणे, जेणेकरून शहरी कामगारवर्ग व मध्यमवर्ग संतुष्ट राहील, हा त्या धोरणाचा पायाभूत भाग होता. ह्या रशियन प्रयोगात रशियन शेतीची किती अपरिमित हानी झाली, शेतकऱ्यांवर किती अनन्वित अत्याचार केले गेले, ही सारी माहिती त्यावेळी भारतातील बहुसंख्य विचारवंतांपर्यंत नीटशी पोचली नव्हती.
 अर्थात हा अपघात नव्हता; समाजवाद हा साधारण १९४५ ते १९७५ ह्या काळात जवळपास जगभर जणू युगधर्मच बनला होता. पुढे ब्रिटनमध्ये मार्गरेट थैचर यांनी, अमेरिकेत रोनाल्ड रेगन यांनी व चीनमध्ये डेंग झियाओ पिंग यांनी जे मूलभूत आर्थिक बदल केले, त्यामुळे ही परिस्थिती पालटली, पण भारतात मात्र तसे कुठलेच बदल त्या काळात घडले नाहीत; इथले धोरण आणि धोरणकर्ते हे सोव्हिएत प्रतिमानाच्या प्रभावाखालीच राहिले. त्याच प्रभावाखाली आखल्या गेलेल्या शासकीय धोरणात शेतकऱ्यांवरील अन्याय हा त्यामुळे तसा अनुस्यूतच होता.

 त्या वेळची देशातील एकूण राजकीय परिस्थिती तशी निराशाजनकच होती. आणीबाणीनंतर मार्च १९७७मध्ये दिल्लीत सत्तेवर आलेले जनता पार्टीचे सरकार अंतर्गत दुफळीमुळे लौकरच कोसळले. नंतर इंदिरा गांधी यांच्या पाठिंब्यावर आलेले चौधरी चरणसिंग

राजकारणाच्या पटावर३१३