पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपस्थित होते. स्वतः पंतप्रधान सिंग त्यासाठी खास दिल्लीहून आले. आपले सरकार शेतकरी हितालाच प्राधान्य देणार असल्याचे सिंग यांनी पुन्हा एकदा जाहीर सभेत घोषित केले. शेतीमालाला वाजवी भाव आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हे शेतकरी संघटनेचे दोन्ही मुद्दे सिंग यांना व्यक्तिशःदेखील पूर्ण पटले होते व त्यासाठी स्वतःही आंदोलनात उतरायची त्यांनी तयारी दाखवली. पुढे १५ ऑगस्ट १९९० रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात 'आगामी दशक हे आम्ही किसान दशक म्हणून राबवणार आहोत' असे त्यांनी जाहीरही केले.
 साधारण याच सुमारास १९९०मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रातील या निवडणुकीत जनता दलाच्या चिन्हावर शेतकरी संघटनेचे ३७ उमेदवार उभे होते आणि त्यांव्यतिरिक्त जनता दलाचे अधिकृत उमेदवार म्हणूनही संघटनेचे इतर १३ कार्यकर्ते उभे होते. त्यावेळी शेतकरी संघटनेचे पुढील पाच उमेदवार विजयी झाले : अॅडव्होकेट मोरेश्वर टेमुर्डे (मतदारसंघ भद्रावती, जिल्हा चंद्रपूर) ॲडव्होकेट वामनराव चटप (मतदारसंघ राजुरा, जिल्हा चंद्रपूर), डॉ. वसंतराव बोंडे (मतदारसंघ हिंगणघाट, जिल्हा वर्धा), सौ. सरोजताई काशीकर (मतदारसंघ पुलगाव, जिल्हा वर्धा) आणि श्री. शिवराज तोंडचिरकर (मतदारसंघ हेर, जिल्हा लातूर). आपल्या राजकारणातील संपूर्ण प्रवासात शेतकरी संघटनेला निवडणुकीत मिळालेले हे सर्वांत मोठे यश.
 पुढे विश्वनाथ प्रताप सिंग यांच्याशी जोशी यांची जवळीक होती त्या काळात, म्हणजे १९९० साली 'राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी तुमची दोन नावे द्या,' असे सिंग यांनी त्यांना सांगितले होते. त्यावेळी जोशींनी भूपिंदर सिंग मान व प्रकाश आंबेडकर ही दोन नावे पुढे केली होती; राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले जोशींचे काही निकटचे सहकारी त्यामुळे खूप दुखावले गेले; पण जोशींनी खासदारकीसाठी स्वतःचे नाव मात्र पुढे केले नव्हते हे लक्षात घ्यायला हवे.
 सुरुवातीला सिंग यांनी शेतकऱ्यांना संपूर्णत: कर्जमुक्त करायची तयारीही जाहीररीत्या दर्शवली होती. पण अशा कर्जमुक्तीला त्यांचे अर्थमंत्री मधु दंडवते यांचा जोरदार विरोध होता. दंडवते व जोशी यांचे पूर्वीही कधी सख्य नव्हतेच. निपाणीत सुभाष जोशी यांच्या प्रचाराच्या वेळी हे दोघेही एकमेकांच्या विरोधातच होते. कर्जमाफीला दंडवते यांनी विरोध केल्याचा निषेध म्हणून दंडवते यांचे पुतळे जाळण्याचा कार्यक्रमही संघटनेला हाती घ्यावा लागला. पण आपले अर्थमंत्री स्वतः ह्या कर्जमाफीच्या इतके विरोधात आहेत हे लक्षात आल्यावर पुढे सिंग यांचाही उत्साह कमी झाला असावा.

 कर्जमुक्तीची शेतकरी संघटनेची संकल्पना बाजूला सारून सिंग यांनी देवी लालपुरस्कृत शेतकऱ्यांसाठीची एक योजना स्वीकारली. शेतकऱ्यांना पंचतारांकित हॉटेलांत फक्त १०० रुपयांत पोटभर जेवण दिले जाईल अशा अनेक उथळ तरतुदी त्यात होत्या. पण देवी लालना खूष ठेवणे ही सिंग यांची सत्ता टिकवण्यासाठीची गरज होती. दुर्दैवाने सिंग यांना स्वतःला फारसा व्यापक असा जनाधार नव्हता; उपपंतप्रधान चौधरी देवी लाल यांचे पाठबळ त्यामुळे त्यांना अत्यावश्यक होते.

राजकारणाच्या पटावर३३३