पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असे. दोघांचा बँक अकौंटदेखील एकत्रच. आयुष्यभर दोघे एकत्र राहिले. एकाच घरात. दोघांचीही कुटुंबेही एकाच घरात राहिली. आज दोघेही हयात नाहीत.
 गुणवंतभाईंचे एकुलते एक चिरंजीव परिमलभाई. ते सिव्हिल इंजिनिअर असून व्यवसायाने बिल्डर आहेत, पण सामाजिक कामात आस्था ठेवून वडलांचा वारसा पुढे चालवतात. या चरित्रलेखनासंदर्भात काही माहिती गोळा करण्याच्या निमित्ताने त्यांना भेटायचा व प्रत्यक्ष जाऊन नर्मदा धरण (सरदार सरोवर प्रकल्प) बघण्याचा योग आला. परिमलभाई सांगत होते,
 "बिपीनभाई व गुणवंतभाई या दोघांनाही शरद जोशींबद्दल फार प्रेम. १९८० सालच्या नाशिक ऊस आंदोलनाबद्दल ऐकल्यानंतर दोघेही मुद्दाम आंबेठाणला जाऊन जोशींना भेटले. पहिल्या भेटीतच मनं जुळली. शेतकरी संघटनेच्या नंतरच्या सगळ्या प्रमुख आंदोलनांत गुजरातचे काही प्रतिनिधी घेऊन दोघे आवर्जून सामील होत. जमेल तेवढी आर्थिक व सर्व प्रकारची मदतही करत. १९८४मध्ये चंडीगढ आंदोलनात जोशींना जेव्हा अटक झाली, तेव्हा त्यांच्याबरोबर हे दोघेही होतेच."
 पुढे परिमलभाई सांगू लागले,
 "१९९९मध्ये जोशींना हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा महाराष्ट्रात त्यांना विश्रांती मिळेना. गुणवंतभाईंनी त्यांना आंबेठाणला फोन केला. 'सरळ आमच्या घरी या. इथेच तुम्हाला खरी विश्रांती मिळेल.' जोशी आनंदाने आले. आठ दिवसांनी दोघांनी स्वतःबरोबर त्यांना बडोद्याला एका निसर्गोपचार केंद्रात नेलं. तिथल्या उपचारांवर त्या दोघांचा पूर्ण विश्वास. तेथील मुक्कामात जोशींना आणखीच बरं वाटलं."
 अधूनमधून ते भेटीगाठींसाठी जवळपास मोटारने जात असत. ते पावसाळ्याचे दिवस होते व एकदा तिघे बडोद्यावरून सुरतच्या दिशेने येत होते. वाटेत तुफान पाऊस झाला व त्याचवेळी नर्मदेला आलेल्या पुरामुळे रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. जागोजागी गुडघाभर पाणी. एक दिवस त्यांना वाटेतच मुक्काम करावा लागला. आश्चर्य म्हणजे त्याचवेळी उत्तर व पश्चिम गुजरातमध्ये, विशेषतः कच्छ व सौराष्ट्रात, टिपूसभरसुद्धा पाउस नव्हता. पाण्याअभावी तडफडणाऱ्या गाईगुरांची छायाचित्रे, अहमदाबादेत गृहिणींनी पाण्यासाठी काढलेले मोर्चे यांनी वृत्तपत्रांची पाने भरली होती. त्याचवेळी शेजारी दक्षिणेतील या भयानक दुष्काळाच्या बातम्याही छापलेल्या होत्या. महाराष्ट्रात जसा एकेकाळी दुर्गादेवीचा दुष्काळ पडला होता, तसाच एक भीषण दुष्काळ पूर्वी गुजरातेत पडला होता, ज्याला 'छप्पनिया' दुष्काळ म्हणतात. १९९९ सालच्या दुष्काळातही त्या 'छप्पनिया' दुष्काळाची शेतकऱ्यांना आठवण होत होती. अतिशय विचित्र परिस्थिती होती - एकीकडे महापूर तर दुसरीकडे अवर्षण. बिपीनभाई आणि गुणवंतभाईंशी जोशींची तीच चर्चा सतत सुरू होती.

 इतर अनेक गांधीवाद्यांप्रमाणे त्या दोघांचाही एकेकाळी 'नर्मदा बचाव' आंदोलनाला पाठिंबा होता. चर्चेत तो मुद्दा पुनःपुन्हा येत होता. दक्षिणेतील ह्या महापुराला अतिपाऊस हे कारण होतेच; पण आणखीही एक कारण म्हणजे नर्मदा बचाव आंदोलनाने अगदी आंतरराष्ट्रीय

राष्ट्रीय मंचावर जाताना३५७