पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रथमच उभे राहत होते.
 सभास्थानी साधारण चार ते पाच लाख शेतकरी जमले होते; सभा सुरू व्हायची आतुरतेने वाट पाहत होते. दुर्दैवाने सभा सुरू होणार त्याचवेळी टिकैत व त्यांच्या सहकाऱ्यांनी तो मेळावा उधळून लावला. खरे तर सगळे काही टिकैत यांच्या कलाने घेतले गेले होते; अगदी व्यासपीठावर त्यांचा तो प्रसिद्ध हुक्काही विराजमान झाला होता. पण हा मेळावा होऊच द्यायचा नाही, सभा उधळून लावायची असा जणू काही टिकैत यांनी कटच रचला होता. बोटक्लबवरील या सभेच्या पूर्वी सकाळीसकाळीच शरद जोशी राजीव गांधी यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले होते व त्यांच्यात काही गुप्त खलबते झाली होती, असे कोणीतरी टिकैतना सांगितले होते. देवी लाल यांनी त्यांचे कान फुकले असावेत, असेही काही जणांचे म्हणणे होते. कदाचित टिकैतना जोशी यांचा मत्सरदेखील वाटला असेल. कारण मेळाव्याचे वैचारिक नेतृत्व जोशींकडे जाणार, त्यांच्याच भाषणाला वृत्तपत्रे प्रसिद्धी देणार हे स्पष्ट होत गेले होते. नेमके काय घडले, ते सांगणे अवघड आहे; पण एवढे खरे, की टिकैत यांच्या सहकाऱ्यांनी सरळ स्टेज उखडून टाकायला सुरुवात केली. एकेक करत ते व्यासपीठाचे खांब काढून बाजूला फेकून देऊ लागले. मंचावर धक्काबुक्की सुरू झाली. सगळीकडे एकच गोंधळ माजला. काय होते आहे, कोणालाच कळेना. एकूण रागरंग ओळखून व ह्यात आपल्या नेत्याच्या जिवाचे काही बरेवाईट होऊ शकेल ह्याची जाणीव होऊन, जोशी यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची कशीबशी मागच्या बाजूने स्टेजवरून सुटका केली. खाली मैदानावर बद्रीनाथ देवकर व इतर काही निष्ठावान सहकारी उभे होते. त्यांनी हातांची झोळी करून जोशींना सुखरूप व्यासपीठापासून दूर नेले. त्यामुळे खरे तर ते बचावले. पण छातीत दुखू लागल्याने त्यांना थेट रुग्णालयातच न्यावे लागले; पुढचे दोन दिवस तिथेच काढावे लागले.
 हा मेळावा म्हणजे गेली दहा वर्षे जोशी लढवत असलेल्या शेतकरी आंदोलनाचा कळसबिंदू होता. माध्यमेही यावेळी त्यांना बऱ्यापैकी जागा देत होती; विशेषतः इंग्रजी माध्यमे. दिल्लीत पदार्पण करणे त्यादृष्टीने उपयुक्त ठरले होते.

 तसे पहिले तर मराठी पत्रकारांपेक्षा इंग्रजी व हिंदी पत्रकारांनीच ह्यावेळेपावेतो जोशींची जास्त दखल घेतली होती. सुरुवातीच्या काळात आंदोलनाचा झपाटाच इतका तीव्र होता, की कितीही म्हटले तरी जोशींना पूर्णतः डावलणे मिडीयाला (त्या काळाच्या संदर्भात वृत्तपत्रकारांना) अवघड होते. अगदी प्रथम, म्हणजे ऑगस्ट १९८१ मध्ये, डेबोनेर या उच्चभ्रू वर्गात वाचल्या जाणाऱ्या इंग्रजी मासिकात सुधीर सोनाळकर यांनी घेतलेली त्यांची पाच-पानी मुलाखत प्रसिद्ध झाली होती. बिझिनेस वर्ल्ड या कलकत्यातील आनंद बझार ग्रुपच्या इंग्रजी पाक्षिकाने त्यांच्यावर 'Why Bharat has declared war on India' या शीर्षकाची मुखपृष्ठकथा केली होती (जुलै १६ ते २९, १९८४चा अंक). स्वतः संपादक दिलीप ठाकोर यांनी त्यात त्यांच्यावर तब्बल आठ पानांचा उत्तम लेखही लिहिला होता. त्याच वर्षी सोसायटी मासिकाच्या वार्षिक विशेषांकात 'भारतातील ५० सर्वांत प्रभावशाली व्यक्तींमध्ये जोशींचा

राष्ट्रीय मंचावर जाताना३५५