पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



करता येईल, हा अलीकडे त्यांच्या सततच्या चिंतनाचा विषय असे.
 उदाहरणार्थ, एकीकडे सगळे जग एक बाजारपेठ बनावे म्हणून प्रयत्न चालू आहेत आणि त्याचवेळी आपल्या देशात देशापुरतीसुद्धा शेतीमालाची एक बाजारपेठ नाही ह्याची त्यांना खंत असे. इथला ऊस तिथल्या कारखान्याला देता येणार नाही आणि इथले धान्य त्या प्रांतात विकता येणार नाही अशा तरतुदी आजही आहेत. करआकारणी खुप क्लिष्ट असल्यामळे साठवणुकीची व वाहतुकीची सोय नीट नसल्याने शेतकरी बाजारपेठेचे स्वातंत्र्य उपभोगू शकतच नाही. शासनाने उभारलेल्या ह्या देशांतर्गत कृत्रिम भिंती पाडून टाकाव्यात आणि निदान आपल्या देशापुरती तरी एकच एक मोठी बाजारपेठ तयार करावी अशी त्यांची मागणी असे.
 वायदे बाजार (Futures Market) आणि त्यानंतरचे डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट (Derivatives Market) यांच्यात त्यांना रस होता व शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने ह्या क्रांतिकारक घडामोडी आहेत असे त्यांचे मत होते. घरच्या घरी आपल्या संगणकासमोर बसून, जागतिक बाजारपेठेतील चढउतारांचा फायदा त्यामुळे आपला शेतकरी मिळवू शकतो. ना त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीची गरज, ना कोणा अडत्याची. शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीसाठी हे एक वरदान ठरणार होते. त्यासाठी आवश्यक ते संगणकाचे व इंटरनेटचे कार्यक्षम जाळे देशभर शक्य तितक्या लौकर उभारायला हवे असे ते म्हणत.
 'भीक नको, हवेघामाचे दाम' ही शेतकरी संघटनेची मूळ घोषणा. आता जोशींची नवी घोषणा होती, भीक नको, घेऊघामाचे दाम'. हवे'ऐवजी 'घेऊ' शब्द आला. आता हमीभाव नको, स्वत:च्या प्रयत्नांने आम्ही हवे ते मिळवू. केवळ एका शब्दाच्या बदलातून जोशींची नवी भूमिका सुस्पष्ट होते.
 भविष्याच्या अशा चिंतनातूनच त्यांनी इथेनॉलचा उत्साहाने पाठपुरावा केला. निपाणीच्या तंबाखू आंदोलनातील एक बिनीचे सैनिक व शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीचे एक सदस्य श्यामराव देसाई यांनी इथेनॉल प्रश्नाचा खोलात जाऊन अभ्यास केला होता. 'लढा इथेनॉलचा' नावाचे एक ६८ पानांचे पुस्तकही देसाई यांनी लिहिले आहे. ते त्यांनी शरद जोशींनाच अर्पण केले आहे. श्यामराव देसाई यांचे विचार जोशींना पटले होते. भारताचा मोठा खर्च हा पेट्रोलच्या आयातीचा आहे व ही आयात दिवसेंदिवस अधिकच वाढते आहे. ह्याला इथेनॉल हे एक चांगले उत्तर आहे असे ते म्हणत. उसापासून अल्कोहोल तयार करणे हे आता सर्रास होते. ह्या अल्कोहोलमधला पाण्याचा थोडासा उरलेला अंश काढून टाकला, की जे रसायन तयार होते ते म्हणजे इथेनॉल, जोशींनी त्याला 'शेततेल' असे नाव दिले होते.
 उसाच्या रसापासून ७५% इथेनॉल तयार होते, साखर कारखान्यातील मळीपासून ४०% इथेनॉल तयार होते. सडकी फळे, भाज्या, अगदी पालापाचोळा आणि गवत यांपासूनही इथेनॉल तयार होऊ शकते. आपल्या देशात पेट्रोलमध्ये ५% इथेनॉल मिसळता येते; ब्राझिलसारख्या देशात हे प्रमाणे ४०% आहे. जेव्हा पेट्रोलची किंमत ५५ रुपये प्रतिलिटर होती तेव्हा इथेनॉलला सरकार २१ रुपये प्रतिलिटर देत होते. जोशी यांच्या मते सरकारने ३०

अंगाराकडून ज्योतीकडे : शोध नव्या दिशांचा - ४२३