पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेले, तसाच काहीसा प्रकार अनेक स्त्रीमुक्ती चळवळीतील नेत्यांनी केला. पुरुष आणि स्त्री हे जणू दोन वर्गच आहेत, त्यांचे हितसंबंध परस्परविरोधीच आहेत, अशी संघर्षमूलक भूमिका त्यांनी घेतली. शेतकरी महिला आघाडीला असा वर्गविग्रह पूर्णतः अमान्य होता. जोशी म्हणतात,
 "एका बाजूला पुरुष आणि दुसऱ्या बाजूला स्त्रिया असा लिंगभेदावर आधारित संघर्ष जगाच्या इतिहासात कधीच कुठे झालेला नाही. जर्मनी व इंग्लंड यांच्यात युद्ध झाले, तेव्हा जर्मन बायका इंग्लंडमधील बायकांच्या बाजूने लढल्या किंवा इंग्लंडमधील पुरुष जर्मन पुरुषांच्या बाजूने लढले असे कधीच झालेले नाही. उलट इंग्लंडमधील स्त्री-पुरुष एकत्र व त्याविरुद्ध लढणारे जर्मनीमधील स्त्री-पुरुष एकत्र असेच इतिहासात दिसते. यामध्ये एक जैविक सत्य आहे; जे वर्ग ह्या संकल्पनेत कधीच विचारात घेतले गेले नाही. समानांमध्ये समुदायनिर्मिती होत नाही, ती असमानांमध्येच होते. तसे नसते, तर सर्व लग्ने समलिंगीच झाली असती. पण प्रत्यक्षात लग्ने विषमलिंगीच होतात. याचाच अर्थ समुदायनिर्मितीसाठी समानता हा निकष नसून असमानता हा निकष आहे."
 महिला कार्यकर्त्या घडवण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम काही बोलू शकणाऱ्या महिलांचे आंबेठाण इथे एक दहा दिवसाचे निवासी शिबिर घेण्यात आले. त्या शिबिरात स्त्रीप्रश्न समजून घेणे, त्याची मांडणी कशी करायची याचा अभ्यास करणे यावर कसून मेहनत घेतली गेली. त्यानंतर या सर्व महिला कार्यकर्त्या आपापल्या भागात जाऊन, शक्य तितक्या महिला गोळा करून, शिबिरे घेऊ लागल्या. फेब्रुवारी १९९२ मध्ये झालेल्या महाराष्ट्रातील पंचायत राज निवडणुकीत महिला आघाडीच्या ४०० उमेदवार उभ्या होत्या व त्यांतील १०० निवडून आल्या होत्या. या सर्व महिला अशा शिबिरांचा परिणाम म्हणूनच प्रथम घराबाहेर पडलेल्या होत्या; नवऱ्याच्या नावावर निवडून आलेल्या नव्हत्या! त्यांच्यातील या नव्यानेच प्रकट झालेल्या नेतृत्वगुणांचे त्यांना व त्यांच्या घरच्या माणसांनीही अप्रूप वाटायला लागले होते.
 आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःच्या घरच्या महिलांनाही सन्मानाने वागवावे यावर जोशी यांचा कटाक्ष होता. त्याचा परिणाम कार्यकर्त्यांच्या वागण्यात लौकरच दिसू लागला. शेतकरी संघटनेच्या बैठकीतले वातावरण त्यामुळे इतर संघटनांच्या बैठकीतील वातावरणापेक्षा खूप वेगळे असे. बाहेरून जी माणसे अशा बैठकींना हजर असतात त्यांच्या लक्षात तो फरक पटकन येत असे.

 भारतातील कामगार चळवळीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाचे हे एक वेगळेपण पटकन उठून दिसणारे आहे. साम्यवाद्यांची मुंबई गिरणी कामगार युनियन, इंटकचा राष्ट्रीय मिल मजदूर संघ, समाजवाद्यांची हिंद मजदूर सभा, शिवसेनेची भारतीय कामगार सेना, एस. आर. कुलकर्णी यांची ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, दत्ता सामंत यांची असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग वर्कर्स, जॉर्ज फर्नांडिस यांची हिंद मजदूर किसान पंचायत, गुलाब जोशी यांची कामगार उत्कर्ष सभा या सर्व समकालीन कामगार युनियन्स खूपच बलाढ्य होत्या, दीर्घ काळ

३०८अंगारवाटा... शोध शरद जोशींचा