पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संघटक'च्या २१ मे २००३च्या अंकात त्या भाषणाच्या शब्दांकनाचे पुनर्मुद्रण करण्यात आले आहे. त्याचा संपादित सारांश असा :
1. व्यक्तीची अनन्यसाधारणता

अब्राहम लिंकनच्या काळापासून 'सर्व मानवप्राणी समान जन्माला आला आहे' या फ्रेंच राज्यक्रांतीतील तत्त्वाला मान्यता मिळाली. विषमतानिर्मूलनाच्या कार्यक्रमात 'माणसे समान आहेत म्हणजे, ती एकसारखीच आहेत' असे मानले गेले आणि माणसाकडे व्यक्ती म्हणून पाहण्याऐवजी समाजाच्या अनेक घटकांपैकी एक, हे स्थान त्याला मिळाले. व्यक्ती हरपली, गर्दीत दडपली गेली. समानतेचे तत्त्व फ्रेंच राज्यक्रांतीतील पहिल्या तत्त्वाचे शत्रू बनले. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्त्वत्रयीतील स्वातंत्र्य आणि समता यांच्या क्रमाची उलटापालट झाली, स्वातंत्र्यापेक्षा समता महत्त्वाची ठरली. ही ऐतिहासिक चूक आता सुधारली जाणार आहे. माणसे समान आहेत' हे खरे, पण त्याचा अर्थ ती एका मुशीतील, एकसारखी बाहुली आहेत असे नव्हे. एका माणसासारखा हुबेहूब दुसरा कोणी असतच नाही; अगदी जुळाभाऊसुद्धा नाही. प्रत्येक मनुष्य त्याच्या स्थलकालात अनन्यसाधारण असतो. प्रत्येक व्यक्ती अनन्यसाधारण असते व म्हणूनच मनुष्यप्राणी समान असतो. व्यक्तीची अनन्यसाधारणता हाच समानतेचा पाया आहे.

२. माणसाचा शोध स्वातंत्राच्या कक्षा रुंदावण्याचा

प्रत्येक अनन्यसाधारण व्यक्ती त्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे आपले जाणिवांचे आणि अनुभवांचे विश्व व्यापक करण्याच्या धडपडीत असते. आयुष्य विविधतेने संपन्न व्हावे, निवड करण्याची संधी क्षणाक्षणाला मिळावी, प्रत्येक निवडीच्या वेळी जास्तीत जास्त विकल्प हात जोडून हजर असावेत आणि ते विकल्पही विविध पठडीतील असावेत यासाठी मनुष्यप्राण्याची धडपड चालू असते. माणसाचा शोध स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याचा आहे; सुखाचा नाही, शांतीचा नाही, समाधानाचा नाही, सत्याचा नाही, शिवाचा नाही, सुंदराचा नाही, संपत्तीचा नाही, सत्तेचा नाही, दुःखी जनांच्या सेवेचा नाही आणि मोक्षाचाही नाही.

३. स्वार्थ हेच उद्दिष्ट

कोणाला स्वार्थ पैशात दिसेल, कोणाला विद्येत, कोणाला शुद्ध आळशीपणे पडून राहण्यात. या व्यापक अर्थाने प्रत्येक व्यक्ती आपापला स्वार्थ साधण्यासाठी धडपडते. लक्षावधी, कोट्यवधी स्वार्थी व्यक्तींच्या धडपडीतून नकळत परमार्थ संपादिला जातो. शरीरातील एकेक पेशी तिच्या तिच्या स्वभावाप्रमाणे धडपडत असते. अशा धडपडीतूनच सबंध शरीराची एकात्मता बनते.

अंगाराकडून ज्योतीकडे : शोध नव्या दिशांचा४२७