पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शेतीतून व्यापक आर्थिक विकास कसा होतो याचे उदाहरण म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्री यांचा उल्लेख केला आहे. उसाचे गु-हाळ चालवून आणि गुळाची विक्री करून जो पैसा आला, त्यातूनच म्हादबा मिस्त्री उभे राहिले; जोशींना अभिप्रेत असलेल्या ग्रामीण औद्योगिकीकरणाचे ते उत्तम प्रतीक आह
.  पंजाबमध्येही हेच घडले. तेथील उद्योगांत सरकारी गुंतवणूक अशी जवळजवळ अजिबात नाही. शेतीतले पैसे गुंतवून शेतकऱ्यांच्या मुलांनी आपापल्या गावात छोटे-छोटे कारखाने उभारले, साधी स्वस्तातली लेथ मशीन्स बसवून उत्पादन सुरू केले. वाहतुकीचा, वाहनदुरुस्तीचा व इतरही असेच बारीकसारीक व्यवसाय सुरू केले. अशा असंख्य व्यक्तींनी घेतलेल्या स्थानिक पुढाकारांतूनच तेथील ग्रामीण भागाचे आर्थिक चित्र पालटायला सुरुवात झाली.
  ह्या संदर्भात त्यांनी दिलेले जपानचे उदाहरण लक्षणीय आहे. खुल्या अर्थव्यवस्थेकडे खुल्या मनाने ह्या आपल्या पुस्तकात ते म्हणतात, की जपानी सरकार १९२१ सालापासन सातत्याने त्यांच्या शेतकऱ्याला भाताची जी आंतरराष्ट्रीय किंमत असते, तिच्या तिप्पट भाव देत आले आहे. त्याशिवाय, तांदळाचा एक दाणाही आयात होणार नाही असे त्यांचे धोरण आहे. त्यामुळे जपानी शेतकरी भातशेती करूनही चांगल्या प्रकारे जगू शकतो.
 हाच प्रकार चीनमधेही अलीकडच्या काळात घडून आला आहे. आज चिनी वस्तूंनी सगळ्या जगाची बाजारपेठ जणू काबीज केली आहे; इतके त्यांचे उत्पादनक्षेत्र (manufacturing) प्रबळ आहे. पण चीनने खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यावर सर्वांत आधी शेतीमालाला अधिक किंमत द्यायला सुरुवात केली. त्यातून निर्माण झालेल्या ग्रामीण समृद्धीतूनच त्यांची विकासदौड सुरू झाली. देशातील बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती शेतीविकासातूनच वाढू शकते व ही क्रयशक्ती वाढल्याशिवाय औद्योगिक किंवा इतर वाढीला बाजारपेठच उपलब्ध होत नाही. तीही वाढ मग खुट्ते. आधी शेतीचा विकास. त्यातून स्थानिक बाजारपेठेतील वाढणारी मागणी व मग औद्योगिक विकास हाच क्रम जगभर राहिलेला दिसतो. म्हणूनच शेतीमालाला वाजवी भाव मिळायला हवा, ही शेतकरी संघटनेची मागणी केवळ शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नसून सगळ्या देशाचाच विकास त्यात सामावलेला आहे असे जोशी म्हणतात.

शरद जोशी यांचे चौथे प्रमुख वैचारिक योगदान म्हणजे त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा हिरिरीने आणि नि:संदिग्धपणे केलेला पुरस्कार.
  शेतकऱ्याच्या जीवनात असलेले तंत्रज्ञानाचे महत्त्व जोशींनी प्रथमपासून अधोरेखित केले आहे व त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या प्रशिक्षणाचा तो अगदी पहिल्या शिबिरापासून एक महत्त्वाचा भाग होता. शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती (नोव्हेंबर १९८२) या पुस्तकात ते म्हणतात,


                                      साहित्य आणि विचार - ४५७