पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६

साहित्य आणि विचार


 शरद जोशींना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती आणि त्यांची वैचरिक बैठक घडवण्यात वाचनाचे योगदान मोठे आहे.
 नाशिकला रुंगठा हायस्कूलमध्ये असताना जोशींनी पुस्तकांच्या जगात प्रवेश केला व त्यानंतर तीन-चार वर्षांतच त्यावेळच्या उपलब्ध होऊ शकलेल्या बहुतेक प्रमुख मराठी पुस्तकांचा त्यांनी फडशा पाडला. बालसाहित्यात ते रमले नाहीत कारण वयाच्या मानाने त्यांची वैचारिक वाढ खूपच जास्त झालेली होती. साहजिकच त्यांचे वाचनही बरेच प्रौढ होते. खांडेकरांच्या ध्येयवादी नायकांचा पगडा कुमारवयात त्यांच्यावर बराच होता. समाजातील अन्याय आणि शोषण, सामान्य माणसांची होणारी फरफट, अनेक व्यक्तिगत अडचणींवर मात करून समाजसेवेसाठी स्वतःला झोकून देणारे ध्येयवादी तरुण वगैरे चित्रण या कादंबऱ्यांत असे. आपणही आयुष्यात समाजासाठी असेच काहीतरी केले पाहिजे असे त्यांना फार वाटे. शरच्चंद्र चटर्जीच्या अनुवादित कादंबऱ्याही त्यांनी लहानपणीच वाचल्या होत्या. त्यांतली पाथेर दाबी ही त्यांना विशेष आवडलेली कादंबरी. या कादंबरीचा नायक डॉ. सब्यसाची नावाचा एक क्रांतिकारक डॉक्टर आहे; जतींद्रनाथ ऊर्फ बाबा जतीन या बंगाली क्रांतिकारकाच्या जीवनावर बेतलेला. एका सशस्त्र बंडखोर संघटनेचा तो प्रमुख आहे. अत्यंत धाडसी, बुद्धिमान, प्रतिभावंत, अफाट ताकदीचे आणि बरेचसे गूढ असे हे व्यक्तिमत्त्व आहे. या डॉ. सब्यसाचीच्या जागी आपल्या भावविश्वात त्यांनी अनेकदा स्वतःला कल्पिले होते.
 जे वाचले, ते जोशी वाचून सोडून देत नसत, तर त्यावर मनन करत; त्याचे संस्कार साहजिकच मनावर व म्हणून वागण्यावरही होत. त्या संस्कारांचा प्रभाव दर्शवणारा त्यांनीच सांगितलेला हा एक शाळकरी वयातला अनुभव -

 ओगलेवाडीला असलेल्या त्यांच्या मामाकडे सुट्टीत ते खूपदा जात. तिकडे भटकणे, आसपासच्या मुलांबरोबर खेळणे, टिवल्याबावल्या करणे यांतच सुट्टी संपायची. एकदा सुट्टीत कोणी काय काय केले ह्याची चर्चा वर्गातल्या मुलांमध्ये सुरू होती. ते तेव्हा सातवी-आठवीत असतील. त्यावेळी आपण इतर सर्वांपेक्षा अगदी वेगळे असे काहीतरी केले असे दाखवण्याचा जोशींना फार मोह झाला व कल्पनेनेच एक चित्र त्यांनी मित्रांसमोर रंगवले, ओगलेवाडी काच कारखान्याच्या बाजूला मोठी झोपडपट्टी होती. बहुतेक औद्योगिक वसाहतींच्या आसपास असते तशी. कारखान्यात रोजंदारीवर काम करणारे किंवा एखाद्या कंत्राटदाराकडे काम करणारे

४३२अंगारवाटा... शोध शरद जोशींचा