पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२००७च्या अंकात स्वतःच्या सहीनिशी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात जोशी लिहितात,

शेतकरी संघटनेवर आणि व्यक्तिशः माझ्यावर प्रेम करणाऱ्या पाइकांचे पैसे अडकून पडले याचे शल्य गेली पंधरा वर्षे माझ्या मनात डाचत आहे. माझ्या शब्दाखातर गुंतवलेली ही रक्कम परत करणे ही मी माझी व्यक्तिगत जबाबदारी समजत असून १ एप्रिल २००७च्या आत त्यातून मुक्त व्हायचे मी ठरविले आहे. त्यासाठी, आंबेठाण येथील माझ्या जमिनीतील काही हिस्सा विकून मी तरतूद केली आहे. कंपनी सुरूच न झाल्यामुळे आज कंपनीच्या भागांचे बाजारमूल्य काहीच नसले तरी शेतकरी संघटनेच्या पाइकांकडील भागांचे दर्शनी मूल्य त्यांना परत करण्याचा निर्णय मी घेतला आहे. ज्या भागधारकांना आपली रक्कम परत हवी आहे, त्यांनी आपले भाग खालील पत्त्यावर २० मार्च २००७च्या आत पाठवून द्यावेत; म्हणजे कंपनीच्या दस्तावेजांमध्ये पडताळणी करून त्यांची रक्कम पाठवणे शक्य होईल.

 ज्यांनी 'शिवार'मध्ये पैसे गुंतवले होते त्यातले बरेच संघटनेच्या कुटुंबातलेच होते, त्यांच्या रकमाही तशा छोट्या होत्या व ते पैसे परत मिळावेत अशी त्यांची काही अपेक्षाही नव्हती. संघटनेशी फारसा संबंध नसलेले किंवा ज्यांना पैशाची खूप गरज होती अशा काही जणांनी आपले मूळ गुंतवणुकीचे पैसे परत मागितले व कबूल केल्याप्रमाणे ते जोशींनी लगेच पाठवूनही दिले. एकूण परत केलेली रक्कम १,७९,००० रुपये होती. खरे तर कायदेशीरदृष्ट्या अशा प्रकारची कुठलीच जबाबदारी जोशींवर नव्हती; ना ते कंपनीचे प्रवर्तक होते, ना संचालक, कंपनी उभी राहू शकली नाही ह्यात व्यक्तिशः त्यांचा काही दोषही नव्हता व कोणीही त्यांना तसा दोष कधी दिलाही नव्हता. पण तरीही स्वतःच्याच पुढाकारातून याची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी हे पैसे परत केले.   या सांजपर्वात सुरुवातीच्या काळात ठणठणीत असलेली जोशींची प्रकृती हळूहळू त्रास देऊ लागली. २० डिसेंबर १९९८ रोजी पुण्याहून दिल्लीला जाताना विमानातच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर दीड महिन्यानी, ४ फेब्रुवारी १९९९ रोजी, दिल्लीलाच इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर (दुसऱ्यांदा) अँजिओप्लास्टी करण्यात आली; मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या एका वाहिनीत स्टेंट बसवण्यात आला. दोनच महिन्यांनी, ५ एप्रिल १९९९ रोजी, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डॉ. सुबोध भट्टाचार्य यांनी त्यांच्यावर बायपास सर्जरी केली. जोशी स्वतःच्या तब्येतीची डॉक्टरांच्या सूचनांनुसार काळजी घेत; नियमित तपासण्या करून घेत. आदली काही वर्षे कमी कमी करत आणलेली सिगरेटही त्यांनी बायपासनंतर पूर्णतः व‌र्ज्य केली होती. मधुमेहाचा त्रास पूर्वीपासून होताच, पण औषधोपचारांनी सगळे नियंत्रणाखाली होते.
 परंतु १० फेब्रुवारी २०११ रोजी डॉ. अशोक गुलाटी यांनी 'अन्नसुरक्षा' या विषयावर आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिसंवादासाठी दिल्लीला गेले असताना हॉटेलच्या लॉबीतील जिन्यावरून ते पडले. पहिल्या पायरीपासून जमिनीपर्यंत गडगडत आले;


सांजपर्व - ४६७