पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्रीच्या मार्गातील सर्वांत मोठी अडचण आहे. बाहेरच्या अत्याचारापेक्षा घरचा अत्याचार परवडला, या जाणिवेने स्त्री घरातले दुय्यमत्व चालवून घेते, इतकेच नव्हे तर गोडही मानून घेते.
 पराभूत समाजाप्रमाणे जेत्या समाजातही स्त्रियांवर गुलामगिरी लादली गेली. हल्ला करणाऱ्या जेत्यांनाही त्यांच्या समाजाची रचना युद्धपातळीवरच करावी लागली; म्हणजे पर्यायाने स्त्रीकडे दुय्यमत्व आलेच. स्त्रियांची परिस्थिती जेत्या समाजात वाईट असायचे आणखी एक कारण होते. लुटून आणलेल्या मालमत्तेची मालकी वारसाहक्काने कोणाकडे जायची ह्या चिंतेतून जेत्या समाजात स्त्रियांवर विशेष कडक बंधने लादली गेली. परपुरुषांशी त्यांचा दूरान्वयानेही संबंध येऊ नये, चार भिंतींच्या बाहेर त्यांनी शक्यतो पडूच नये याची खबरदारी घेतली जाऊ लागली. जेत्या समाजातील स्त्रियांच्या अंगावर भारीवाली भरजरीची वस्त्रे, दागदागिने, हिरेमोती आढळत असतील, पण ते केवळ वरवरचे नटवणे होते; दरवेशाने आपण पाळलेल्या माकडाला मखमलीचे रंगीत कपडे घालून नाचवावे असाच काहीसा तो प्रकार. प्रत्यक्षात 'इंडियातील' स्त्रीही दुःखी होती व 'भारतातील स्त्रीही दुःखी होती. 'इंडिया' 'भारता'चे शोषण करतो असे शेतकरी संघटना म्हणते, पण स्त्रियांचा विचार केला तर 'इंडियातील स्त्रिया फारशा सुखी बनल्या असेही दिसत नाही हे जोशी कबूल करतात. एकूणच शेतीतील लुटीच्या व्यवस्थेमुळे सगळाच समाज नासला. लुटीत कोणीही जिंकले, कोणीही हरले, तरी प्रत्येक लढाईत पराभव झाला तो दोन्हीकडच्या स्त्रियांचा; त्यांच्या स्वातंत्र्याच्या कक्षा अधिकाधिक आक्रसत गेल्या.
 म्हणूनच जोशी म्हणतात की स्त्रियांचा प्रश्न हा मूलतः शेतीतील वरकड उत्पन्नाच्या लुटीतून सुरू झालेल्या शोषणयुगाचाच एक अवशेष आहे. वेगवेगळ्या स्वरूपांत आजही सुरू असलेली ती लूट थांबेस्तोवर हा प्रश्न मिटणार नाही. मार्क्सप्रणीत समाजवादी पद्धतीने मुलांसाठी पाळणाघरे काढणे व त्यातून अपत्यसंगोपनाच्या जबाबदारीतून स्त्रियांना मोकळे करणे अथवा सर्वांना जिथे जेवता येईल असे सामुदायिक रसोडे सुरू करणे व त्यातून स्वैपाकाच्या जबाबदारीतून स्त्रियांना मोकळे करणे यातून स्त्रीप्रश्न कधीच मिटणे शक्य नाही.

 लुटालुटीच्या ह्या व्यवस्थेने समाजजीवनाप्रमाणे कुटुंबजीवनहीं नासले. समाजात आणि कुटुंबात कामाची ठोकळेबाज वाटणी झाली. मुलांचे आदर्श वेगळे, मुलींचे वेगळे; मुलांनी असेच वागावे व मुलींनी तसेच वागावे असे आडाखे तयार झाले. खरे तर स्त्री व पुरुष या दोघांनाही ममता, प्रेम, ऋजुता, सौंदर्य, बुद्धी, धाडस, शौर्य या सर्व गुणांचा समुच्चय कमीअधिक प्रमाणात मिळालेला आहे; कारण मागे सांगितल्याप्रमाणे त्यांच्यात जनुकीय साम्य हे जनुकीय फरकांपेक्षा खूपच जास्त आहे. पण लुटीच्या व्यवस्थेत या गुणांची चुकीची विभागणी झाली. त्यातून स्त्रीकडे विकृत मृदुतेची भूमिका आली, तर पुरुषांकडे विपरीत क्रौर्याची. ममता, प्रेम, ऋजुता, सौंदर्य इत्यादी गुणांचे अतिशयोक्त रूप स्त्रीवर लादण्यात आले; तर बुद्धी, धाडस, शौर्य इत्यादी गुणांचे राक्षसी विडंबन पुरुषांवर लादण्यात आले.

किसानांच्या बाया आम्ही...२८७